लोकवाद्ये : लोकसंगीतात मुख्यत्वेकरून योजिली जाणारी वाद्ये, ही लोकवाद्ये होत. आकारवैविध्य, नाद आणि संख्या या बाबतींत लोकवाद्ये ही अभिजात संगीतातील वाद्यांपेक्षा खूपच अधिक प्रमाणात आहेत. त्या त्या प्रदेशांतील लोकच ती तयार करतात. याउलट अभिजात वाद्ये तज्ज्ञ कारागीर बनवतात. गायन व नृत्य यांच्या अनुषंगाने लोकवाद्ये वाजविली जातात. प्रत्येक वाद्याची स्वतःची मर्यादा असल्याने त्या त्या लोकवाद्याची स्वतःची शैली निर्माण होते. लोकवाद्यांची विपुल संख्या, शिवाय समान वाद्यांची प्रादेशिक भाषांनुसार भिन्नभिन्न नावे पाहता केवळ प्रातिनिधिक स्वरूपात ,वैशिष्ट्यनिदर्शक माहिती देणे येथे शक्य आहे.

भारतीय वाद्यांच्या बाबतीत रूढ वर्गीकरणाचा आधार घेऊन त्या त्या वाद्यांचे वैशिष्ट्य थोडक्यात दिले आहे.

घनवाद्ये : भारतातील घनवाद्ये टाळ, झांज, चिपळ्या, झंगट, घट इ. होत. टाळात मध्ये खोलगट भाग असून झांजेचा आकार मोठा आणि मध्ये कमी खोलगट भाग असतो. चपट्या गोलाकार अशा तालवाद्यांची जोडी ‘ब्रह्मतालम्’ या नावाने केरळात प्रचारात आहे. झांजेचा व्यास सामान्यपणे आठ ते दहा इंच (सु. २० ते २५ सेंमी.) असतो. ‘घुंगरू’ दोरीत किंवा कातडी पट्ट्याला बांधून नर्तक नाचताना पायात बांधतात. नुपूर किंवा पैंजण यात धातूच्या पोकळ कडीत आतल्या बाजूला शिशाच्या लहान गोळ्या ठेवतात. पायात पैंजण बांधून स्त्रिया चालतात, तेव्हा रूणूझुणू असा नाद उत्पन्न होतो. पंजाबमधील ‘चिमटा’ या वाद्यात दोन टोकदार लोखंडी पट्ट्या असतात. एकाच बाजूची दोन टोके एका लोखंडी कड्यात जोडलेली असतात. दोन्ही पट्ट्यांना धातूच्या गोल कड्या सैलसर बसवलेल्या असतात. दोन्ही पट्ट्यावर दाब देऊन लयदार आवाज उत्पन्न करतात. ‘चिपळ्या’ किंवा ‘करताल’ या वाद्यात एका बाजूने सपाट व दुसऱ्या बाजूने गोलाकार, असे दोन बळकट लाकडी तुकडे योजलेले असतात. प्रत्येक तुकडा वीतभर लांब व दोन बोटे रूंद असतो. हे लाकडी तुकडे मध्यापासून दोन्ही बाजूंना निमुळते असून शेवटी हाताच्या बोटाच्या टोकासारखे असतात. शेवटी घुंगरू बांधलेले असतात किंवा लाकडी तुकड्याला खाचा पाडून त्यात धातूच्या पातळ गोल चकत्या घातलेल्या असतात. पश्चिम महाराष्ट्रातील ‘खुळखुळा’ या वाद्यात दोन लंबचौकोनी लाकडी चौकटी दांड्याच्या दोन्ही बाजूंना जोडलेल्या असतात. या चौकटींत तारांमधून धातूच्या पातळ गोल चकत्या घातलेल्या असतात. दांडा हातात धरून हलवल्याने लयबद्ध खुळखुळ नाद उत्पन्न होतो. ‘मोरचंग’ अथवा

काही भारतीय लोकवाद्ये

‘मूरसिंग’ या वाद्याचा दांडा घोड्याच्या नालाच्या आकाराचा असतो. जिमलीच्या आकाराची लहानशी लोखंडी पट्टी वाकलेल्या भागाच्या मध्यावर बसवलेली असते. ती इकडून तिकडे हलते. या वाद्याचा प्रसार हिमाचल प्रदेश, आसाम, हैदराबाद इ. प्रदेशांतील आदिवासी जमातींत आहे. लाकडी सुशोभित ‘दांडिया’ म्हणजे टिपऱ्या, यांना गुजरात व राजस्थान येथील लोकनृत्यांत महत्त्वाचे स्थान आहे. वेगवेगळ्या भाषिक नावांनी यांचा उपयोग त्या त्या प्रदेशांत दिसून येतो. करताल व चिपळ्या यांचा उपयोग ताल दाखवण्यास केला जातो. त्यांच्या लाकडी बनावटीतही आकाराचा वेगळेपणा आढळतो. धातूची घनवाद्ये सर्वत्र आहेत. मध्य प्रदेशातील ‘खिरखिरी’ हे वाद्य लाकडी आणि बांबूचे असते. खुळखुळ्यासारखे असणारे हे वाद्य वन्य जमातींत प्रचारात आहे.


अवनद्ध (भांड) वाद्ये :  मृदंगासारखी वाद्ये तालाबरोबर आधारस्वरही दाखवतात. हे आगळे वैशिष्ट्य आहे. मृदंगाचे प्रादेशिक रचनेनुसार भिन्न प्रकार आहेत. डमरूचा मध्यभाग लहान असून त्याची लांबी सहा ते बारा इंचांपर्यंत (सु. १५ ते ३० सेंमी.) असते. वाजविण्यासाठी दोन दोऱ्या बांधलेल्या असून त्यांच्या टोकांना मेण व माती मिसळून केलेल्या दोन गोळ्या असतात. हाताने मध्यभागी धरून तो हलवला असता गोळ्या तोंडावरच्या कातड्यावर आपटून डुमडुम असा नाद उत्पन्न होतो. हे वाद्य अनेक प्रदेशांत प्रचारात आहे. ‘घुमट’ हे एकमुखी भांडवाद्य पश्चिम महाराष्ट्रात आढळते. भाजलेल्या मातीच्या घुमटाकार भांड्याचे रूंद उजवे तोंड कातड्याने मढवलेले असते. दुसरे अरूंद तोंड मोकळे असते. मोकळ्या तोंडावर डावा हात ठेवून त्याच्या उघडझापीने हवेचा दाब नियंत्रित करून नादवैविध्य निर्माण केले जाते. देवदेवतांच्या उत्सवप्रसंगी वादक हे वाद्य वाजवत गाणी म्हणतात. नगारा व दुंदुभी ही एकमुखी मोठी वाद्ये होत. मोठा ढोल हे द्विमुखी वाद्य धनगरांसारख्या आदिवासी लोकांत उत्सव, मिरवणूक इ. प्रसंगी जोरदारपणे वाजवले जाते. ‘एडक्क’ हे मध्यभाग लहान असणारे केरळातील वाद्य आहे. पट्टीने डाव्या खांद्यावरून लोंबणारे हे वाद्य उजव्या हातातील काठीने तोंडावर प्रहार करून वाजवतात. डाव्या हाताने मध्ये बांधलेल्या पट्टीवरचा ताण कमीजास्त केल्याने स्वराचा चढ-उतार निर्माण होतो. कुशल वादक या वाद्यामधून दोन सप्तकांपर्यंत स्वर उत्पन्न करू शकतो. ‘तिमिल’ या केरळीय वाद्याचा आकार डमरूसारखा असतो. हाताने ते एका तोंडावर वाजवले जाते. ‘खंजरी’ हे वाद्य अनेक प्रदेशांत आढळते. या वाद्यात सु. अडीच इंच (सु. ६.२५ सेंमी.) रूंदीच्या गोलाकार लाकडी चौकटीच्या एका बाजूला घोरपडीचे कातडे ताणून बसवलेले असते. काही वेळेला यात धातूच्या चकत्या बसवलेल्या असतात. डफ हे वाद्य गोलाकार सहा इंच (सु. १५ सेंमी.) रूंदीच्या लाकडी पट्टीचे असते. लहान-मोठे आकार असणारे हे वाद्य अनेक प्रदेशांत प्रचारात आहे. संबळ या वाद्यात नगारा या प्रकारातील दोन लहान वाद्ये असतात. दीड वीत लांबीच्या दोन वेताच्या छड्यांनी ते वाजवतात. देवीच्या भक्तिपर गायनात याचा वापर होतो. घटाकार वाद्यांत केरळमधील ‘मिळावु ’ हे वाद्य विशेष प्रकारचे आहे. ते ब्राँझ धातूचे असून त्याचे तोंड लहान असते. कातडे ताणून बसवलेल्या या तोंडावर हातांनी आघात करून ते वाजवतात. राजस्थानातील ‘पाबूजीकी माटे’ या वाद्यात मोठ्या आकाराची दोन वाद्ये असतात. दोन वादक हातांनी ती वाजवतात. ‘मादल’ हे द्विमुखी वाद्य अनेक प्रदेशांत आढळते. काश्मीरमधील ‘नूट’ या वाद्यात भाजलेल्या मातीचे भांडे मांडीवर ठेवून एका हाताने भांड्यावर प्रहार करून व दुसऱ्याने भांड्याच्या तोंडावर आघात करून ते वाजवतात.

सुषिरवाद्ये :  राजस्थान व पंजाब या प्रदेशांत ‘अलगोजा’ हे वाद्य प्रचारात आहे. यात दोन उभ्या बासऱ्या तोंडात धरून एकच वादक वाजवतो. प्रत्येक बासरीत सहा भोके असतात. ज्यांचा उपयोग करायचा नसतो, ती भोके मेणाने बंद करतात. ‘सातारा’ या वाद्यात अशाच पण जास्त लांबीच्या दोन बासऱ्या असतात. एकीत फक्त आधारस्वर वाजतो आणि दुसरीत गीताचे वादन केले जाते. ‘शहनाई’ची नळी शिसवीच्या लाकडाची असते. तिच्यात आठ किंवा नऊ भोके असतात. या वाद्याची जिभली विशिष्ट गवतापासून तयार केलेली असते. हे लोकवाद्य व अभिजात वाद्य आहे. ‘सुंदरी’ वीतभर लांबीची शहनाई होय. दक्षिणेत याचसारखे ‘नागस्वरम्’ हे वाद्य प्रसिद्ध आहे. यात बारा भोके असून त्यांतली सात वाजवण्यासाठी वापरतात. ‘पुंगी’ मध्ये भोपळ्याला वर एक किंवा दोन आणि खाली दोन नळ्या जोडलेल्या असतात. एका टोकाला फुंकण्यासाठी भोक असते. नळ्या पोकळ बांबूच्या किंवा लाकडी असतात. वरच्या नळीत जिभली असते. जादूगार, गारूडी इत्यादींत पुंगीचा प्रसार आहे. गुजरातमध्ये व महाराष्ट्रातील पावरी भिल्ल जमातीत पुंगी प्रकारातील ‘तारपो’ या वाद्याचा प्रसार आहे. याशिवाय शंख, शिंग, तुतारी इ. वाद्ये भारतात प्रचलित आहेत. ‘कर्णा’ या वाद्याची पितळी नळी लांब असते. ‘मसक’ या वाद्यात कातडी पिशवीला दोन नळ्या जोडलेल्या असतात. त्यात एकीला सहा भोके असून एकेरी जिभल्या असतात. दुसरी नळी आधारस्वर देते.

तंतुवाद्ये :  भारतीय तंतुवाद्यांत एकतारी, तुणतुणे, रावणहत्यो, सारंगी, सारिंदा, पेना, संतूर, नंदुण्णी इत्यादींचा समावेश होतो. एकतारीमध्ये खाली भोपळा आणि वर दांडी असून खुंटीला तार बांधलेली असते. तर्जनीने लयबद्ध आधारस्वर देत ती वाजवतात.महाराष्ट्रातील तुणतुणे या वाद्यात खालच्या बाजूला लाकडी नळकांडे असून त्याचे खालचे तोंड कातड्याने मढवलेले असते. नळकांड्याच्या बाहेरच्या बाजूला सु. दोन ते अडीच फुट (सु. ६० ते ७५ सेंमी.) लांबीच्या बांबूच्या दांडीचे एक टोक घट्ट बसवलेले असते. दांडीच्या दुसऱ्या टोकाला लाकडी खुंटी असते. नळकांड्याच्या खालच्या बाजूच्या मध्यातून तार बाहेर निघून येणार नाही, अशी घेऊन तिचे दुसरे टोक खुंटीला ताणून बांधतात. यातही आधारस्वर व लय मिळते.‘गोपीचंद’ हे वाद्य तुणतुण्यासारखे आहे. सारंगीचे अनेक प्रकार आहेत. ही वाद्ये लाकडाच्या ठोकळ्यापासून बनवलेली असून ती धनुकलीने वाजवतात. यांपैकी ‘जोगिया सारंगी’ उत्तर प्रदेश व हरयाणा येथे प्रचारात आहे. हिच्यात तातीच्या तीन तारा असून सर्वांत वरच्या भागातील खाचेतून तारा आत नेलेल्या असतात. हा भाग वरून जवळजवळ संपूर्ण बंद असतो. या सारंगीच्या काही नमुन्यांत अनुध्वनीसाठी तारा असतात. ‘सारिंदा’ मध्ये खालच्या अर्ध्या भागाच्या पोकळीवर कातडे मढवलेले असते. तातीच्या तीन किंवा चार तारा असतात. ‘चिकारा’ हे वाद्य खालच्या भागात नासपती फळासारखे असून राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील आदिवासींत प्रचारात आहे. राजस्थानामध्ये या वाद्याला तीन व मध्य प्रदेशात दोन तारा असतात. ‘रावणहत्यो’चा भोपळा नारळाच्या अर्ध्या करवंटीचा असून त्याच्या दोन तारांपैकी एक घोड्याच्या केसांची व दुसरी लोखंडी असते. वाजवायच्या धनुकलीच्या दांडीला घुंगरू लावतात. ‘पेना’ हे मणिपूरमधील वाद्य रावणहत्योसारखे असते. बांबूच्या दांडीला जोडलेल्या वक्राकार लोखंडी धनुकलीने ते वाजवतात. लोखंडी दांडीला ओळीने घुंगरू लावलेले असतात. केरळमधील ‘नंदुण्णी’ ला दोन तारा व ५/६ पडदे असतात. मन्नन जमातीत हे वाद्य धार्मिक गीतात साथीला घेतात. काश्मीरमधील ‘संतूर’ हे मूळचे लोकवाद्य शेवटी वक्राकार असणाऱ्या दोन नाजुक छड्यांनी तारांवर आघात करून वाजवतात. सध्या या वाद्याला अभिजात वाद्याचा दर्जा प्राप्त झाला आहे.

पहा : लोकसंगीत वाद्य व वाद्य- वर्गीकरण.

संदर्भ : 1. Bandyopadhyaya,  S. Musical Instruments of India, Varanasi, 1980.

           2. Buchner, Alexander, Folk Music Instruments of the World, Prague, 1971.

           3. Kothari, K. S. Indian  Folk Musical Instruments, New Delhi, 1968.

           4. Krishnaswamy, S, Musical Instruments of India, Delhi, 1967.

           ५. तारळेकर, ग. ह. भारतीय वाद्यांचा इतिहास, पुणे, १९७३. 

           ६. देव, बी. चैतन्य, अनु. पारधी, मा. कृ. भारतीय वाद्ये, मुंबई, १९७६.

तारळेकर, ग. ह.