दीक्षितर, गोविंद : (१५५४–१६२६). दाक्षिणात्य संगीतज्ञांपैकी एक प्रमुख पंडित आणि संगीतशास्त्रकार. तंजावरच्या अच्युतय्या व रघुनाथ या दोन्ही पिता–पुत्र नायक राजांचा हा प्रधानमंत्री होता. रघुनाथ नायकाच्या नावे असलेला संगीत सुधा  हा संस्कृत ग्रंथ मूलतः याचा असावा, असे मानले जाते. आधुनिक चोवीस पडद्यांची ‘तंजावर वीणा’ अर्थात ‘रघुनाथ–मेल वीणा’ त्यानेच रूढ केली. दूरदृष्टीच्या या राजकारण धुरंधराने तिरुवैय्यरचे संस्कृत विद्यालय स्थापले व शेतीसुधारणेसाठी अनेक विहिरी व कालवे खोदले. ‘अय्यन’ हे त्याचे लोकमान्य प्रतिनाम. त्याची व त्याच्या पत्नीची मूर्तिशिल्पे कुंभकोणम्‌जवळील पट्टिश्वरम् मंदिरात आहेत. तो संगीतज्ञ अप्पया दीक्षिताचा समकालीन व मित्र होता. यज्ञनारायण व व्यंकटमखी हे त्याचे दोन पुत्रही संगीतक्षेत्रात ख्यातनाम होते.

गोंधळेकर, ज. द.