हार्मोनियम : सुषिर वाद्यांपैकी एक लोकप्रिय वाद्य. त्याला’ बाजाची पेटी’ असेही म्हणतात. ते सुषिर असले, तरी त्यामध्ये आवाज पत्तीतून उत्पन्न होतो आणि पत्तीला कंपित करण्याचे काम हवा करते. हार्मोनियम हे यूरोप खंडातून इंग्रजांच्या आगमनाबरोबर भारतात प्रविष्ट झालेले पाश्चात्त्य वाद्य आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जर्मनी व फ्रान्स या देशांमध्ये हार्मोनियम बनविण्याचे प्रयोग झाले. इंग्लंडमधील जॉन ग्रीन कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर १८३३ मध्ये हे वाद्य बनविले. त्यानंतर फ्रान्समधील आलेक्सांद्र डेबिन (१८०९–७७) याने १८४० मध्ये या वाद्याला मूर्त स्वरूप दिले. पुढे एल्. पी. ए. मार्टिन या फ्रेंच संशोधकाने डेबिन याच्या प्रारूपात काही सुधारणा करून १८४३ मध्ये हे वाद्य विक्रीस आणले व त्याचा प्रचारही केला.

हार्मोनियमचे मुख्य प्रकार

हार्मोनियममध्ये दोन घटक महत्त्वाचे असतात : स्वराची पत्ती व हवेचा भाता. आवाज निघतो तो पत्तीतून. पत्तीत भरल्या जाणाऱ्या हवेला नियंत्रित करण्याचे काम भाता करतो. प्रत्येक स्वरासाठी एक लांबट चौकट असते. चौकटीच्या खाचेत पत्ती खाली-वर होऊ शकते. ह्या स्वरचौकटी एका ओळीत एक फळीवर चिकटवितात व ती फळी पेटीत अशा रीतीने बसवितात की, भात्यातून येणारी हवा त्या फळीतून शिरेल. उच्च प्रतीच्या स्वरचौकटी पूर्वी परदेशांतून, विशेषतः जर्मनी व फ्रान्समधून मागवीत असत; पण आता त्या भारतात तयार होऊ लागल्या असून पालिताणा ( गुजरात) येथे मोठ्या प्रमाणावर तयार होतात. भाता दाबला म्हणजेे त्यातून निघालेली हवा स्वरपत्तिकेच्या खाली बंद असलेल्या चौकटीत कोंडली जाते. या चौकटीत चार-पाच मोठी छिद्रे अंतराअंतरावर असतात व ती छोट्या लाकडी पट्ट्यांनी बंद असतात. त्यांना लोखंडी सळ्या जोडून त्या सळ्यांची टोके पेटीच्या बाहेर काढलेली असतात. हार्मोनिअम वाजविताना ह्या सळ्या ओढून बंद चौकटीतील एक किंवा अधिक छिद्रे उघडतात त्यामुळे भात्यातून आलेली हवा या छिद्रांतून स्वरपत्तिकेत शिरते. स्वर-पत्तिकेच्या वर, पेटीच्या बाहेर, वरच्या चौकटीत प्रत्येक स्वरचौकटीला जोडणारी एक अशा खाचा केलेल्या असतात व त्यांवर प्रत्येक स्वराची एक अशा, समोर काळ्या व पांढऱ्या रंगांच्या आणि मागे टणक तारेने दाबून धरलेल्या लांब पट्ट्या असतात. एक एक पट्टी बोटाने दाबली की, तिच्याखालची खाच उघडी पडते व तिच्यातून तसेच आतल्या स्वरचौकटीतून आलेली हवा बाहेर पडते. हवेच्या या संचलनामुळे स्वरचौकटीतील पत्ती कंपित होऊन आवाज निघतो. स्वरपट्टीवरून बोट काढले की, मागची खाच बंद होते व हवेला बाहेर पडण्यास वाव न मिळाल्यामुळे पत्ती कंपित होत नाही. यात साडेतीन सप्तकाचे स्वर मिळतात. हार्मोनियममध्ये स्वर टेंपर्ड स्केलमध्ये लावलेले असतात. टेंपर्ड स्केलमध्ये स्वरसप्तकातील कोमल व शुद्ध स्वरांचे स्वरूप सप्तकाचे समान बारा भाग करून योजलेले असते; कारण सप्तकात प्रमुख स्वरसात म्हणजे शुद्ध किंवा तीव्र व उपप्रमुख किंवा कोमल मिळून बारा, सात पट्ट्या पांढऱ्या व पाच काळ्या रंगाच्या असतात. स्वरभरणा आणि हाताळण्यास सुलभता यांमुळे भारतात या वाद्याचा प्रसार व प्रचार झपाट्याने झाला.

हार्मोनियमचा गुणधर्म एकच असला, तरी त्या वाद्याचे विविध प्रकार आढळतात. उदा., सिंगल रीड हातपेटी, डबल रीड हातपेटी, ट्रिबल लाइन्स हातपेटी, पायपेटी इत्यादी. पायपेटीची बांधणी हातपेटीप्रमाणेच असून भाते पायाने हलविण्याची सोय असलेली ही पेटी घडी करून मिटवून ठेवता येते. हातपेटी ही छोट्या प्रवासी बॅगेप्रमाणे सहज कुठेही नेता येते. याशिवाय कपलर, कपलट या प्रकारांत एका सप्तकातील स्वरपट्टीचा दुसऱ्या सप्तकातील त्याच स्वरपट्टीशी तारेच्या साह्याने संबंध जोडल्याने दोन्ही सप्तकांतील म्हणजे मंद्र सप्तकातील व मध्य सप्तकातील स्वर एकाच वेळी वाजू शकतात. यात दोन्ही हातांनी वाजविण्याची क्रिया एक हात करू शकतो. आवाजाचा भरणा हा येथे उद्देश असतो.

हार्मोनियममध्ये भारतीय रागसंगीतासाठी आवश्यक असणारे सूक्ष्म श्रुत्यंतरे असणारे स्वर मिळत नाहीत. त्यामुळे भारतीय अभिजात संगीताला हे वाद्य अपूर्ण व गैरसोयीचे ठरले आहे. भारतीय अभिजात संगीत श्रुती व गमक यांच्या पायावर उभे आहे. वेगवेगळ्या रागांत एकाच स्वराच्या वेगवेगळ्या श्रुती वापरल्या जातात. उदा., जौनपुरी रागातील धैवताहून भैरव रागातील धैवत वेगळा असतो. हे वेगळेपण त्याच्या श्रुतिभेदामुळे येते; मात्र हार्मोनियममध्ये या दोन धैवतांसाठी एकच स्वरचौकट असते व तिचा नाद निश्चित असतो. त्यातून हा श्रुतिभेद निर्माण करता येत नाही. तसेच एका स्वरावरून दुसऱ्यावर सावकाश व बेमालूमपणे आरूढ होणारी मींडही पेटीत वाजविता येत नाही; कारण पेटीत त्या दोन स्वरांचे दोन स्थिर आवाज असतात, त्यांचा मोड घेता येत नाही. अशा प्रकारे श्रुती, गमक, मींड, आंदोलन वगैरे भारतीय संगीताची प्राणभूत तत्त्वे हार्मोनियममधून उमटविता येत नाहीत. त्यामुळे हे वाद्य भारतीय संगीताला निरुपयोगी असल्याचे संगीतज्ञांचे मत आहे; तथापि स्वरांमधली श्रुत्यंतरे योजून भारतीय रागगायनाला अतिशय उपयुक्त असे या वाद्याचे स्वरूप व्हावे, म्हणून काही कल्पक हार्मोनियमवादकांनी कुशल वाद्यकारकांच्या मदतीने अधिक पट्ट्या योजून श्रुतिहार्मोनियम बनविले आहे. त्यामुळे टेंपर्ड स्केलमुळे उत्पन्न होणारे दोष कमी झालेले आहेत. काही कुशल वादक मींड व गमक इ. स्वरालंकारही काही प्रमाणात या वाद्यातून निर्माण करतात. बावीस श्रुती बोलणारी बाजाची पेटी तयार करण्याचे प्रयत्न झाले आहेत. तसेच वा. दा. मोहिते (सांगली) यांनी ४८ श्रुतींवर आधारलेल्या सप्तकाची बाजाची पेटी तयार करण्यात यश मिळविले आहे. बाजाच्या पेटीच्या रागदारीतील संगीतविषयक मर्यादा लक्षात घेऊनही उत्तर भारतात ती लोकप्रिय आहे. खेड्यांतून भजन-कीर्तनातून तिचा सर्रास वापर होतो. काही गायक अभिजात संगीतासाठी पेटीची साथ घेताना दिसतात.

मुजुमदार, आबासाहेब