मैफल : कलावंताचे गायन अथवा वादन याचा रसास्वाद घेण्यासाठी जमलेला, कलावंतासह असलेला श्रोतृसमाज म्हणजे मैफल (मेहफिल) होय. आकाशवाणी केंद्रावर ती ’संगीतसभा’ म्हणून ओळखली जाते. अभिजात हिंदुस्थानी संगीतात गायक अथवा वादक हा मैफलीचा मध्यवर्ती आणि सर्वांत महत्त्वाचा घटक होय. गाताना गायकांच्या स्वरभरण्यासाठी किमान एक तंबोरा आवश्यक आहे. तथापि दोन तंबोरे हा सर्वसाधारण नियम. फार क्वचित चार तंबोरे दिसतात. धृपदगायक असल्यास तालसंगतीसाठी मृदंग आणि ख्यालगायक असल्यास तबला. दोन्ही तालवाद्ये गायकाच्या उजवीकडे. यांव्यतिरिक्त डावीकडे स्वरसाथ करण्यासाठी सारंगी, व्हायोलिन यांसारखे एखादे धनुर्वाद्य किंवा हार्मोनियम वा ऑर्गन असतो. तंबोऱ्याला असणाऱ्या साथीदारापैकी निदान एकतरी गायकाला अधूनमधून किमान स्वर देणारा किंवा त्याच्या पद्धतीनुसार गाणारा असावा लागतो. वादनाच्याही मैफलीत सर्वसाधारणपणे रचना अशीच-म्हणजे तंबोरा, तालवाद्य अशी—असते. मात्र तेथे स्वरसाथीसाठी आणखी स्वतंत्र वाद्य नसते.

मैफलीतील गायनाचे सर्वसाधारण स्वरूप पुढीलप्रमाणेः प्रथम धीम्या लयीतील बडा ⇨ ख्याल, नंतर मध्य लयीतील छोटा ख्याल, शेवटी द्रुत लयीतील ⇨ तराणा. येथपर्यंत रागगायन चालते. नंतर एखाद्या ललित म्हणजे हलक्या रागातील ⇨ ठुमरी किंवा होरी, मग ⇨ भजन किंवा मराठी पद, अथवा दोन्ही गाइली जातात. यानंतर पुन्हा पूर्वोक्त रीतीने बडा ख्याल, छोटा ख्याल, ठुमरी (वा होरी), भजन (वा मराठी पद), गझल (वा हलके गीत) आणि शेवटी भैरवीमधील ठुमरी किंवा भजन हा क्रम सामान्यतः गाताना पाळला जातो. महाराष्ट्रातील मैफलींमध्ये मराठी नाट्यपदे वा भावगीते गाइली जात असली, तरी अन्यत्र त्यांची जागा त्या त्या भाषांतील अथवा हिंदीतील गीते घेतील, हे उघड आहे. भैरवीने, क्वचित जोगियाने मैफलीचा शेवट व्हावा, हा आता जवळजवळ संकेत झाला आहे. परंतु भैरवी वाचून अन्य एखाद्या उत्तरांगप्रधान रागानेही कधीकधी मैफलीचा शेवट होतो. एखाद्या ठुमरीगायिकेची मैफल असल्यास तिचा आरंभ ख्यालाने होऊन मग सबंध मैफलभर तऱ्हेतऱ्हेच्या ठुमऱ्या गाइल्या जातात. लावण्यांचीही मैफल अशाच तऱ्हेने सजवली जाते.

सतार, सरोद, सनई, बासरी, व्हायोलिन, हार्मोनियम यांसारख्या एखाद्या वाद्याच्या मैफलीचे साधारण स्वरूप याहून फारसे भिन्न असत नाही. मात्र त्यात शब्दांचा आविष्कार नसतो. तबल्याच्या अथवा मृदंगाच्या मैफलीचे स्वरूप त्या त्या वाद्याला अनुसरून बदलावे, हे स्वाभाविक आहे. त्यावेळी निरनिराळे ठेके, प्रस्तार व बोल वाजवून, त्यांची बढत आणि पढंत करून मैफल साजरी होते. वृंदगायन वा समृहगायन हा प्रकार लोकसंगीतात जुन्या काळापासून विद्यमान आहे परंतु अभिजात संगीताच्या मैफलीत अलीकडे ⇨ जुगलबंदी नावाचा प्रकार पुष्कळ रूढ झाला आहे. जुगलबंदीत दोन गायक अथवा वादक आळीपाळीने रागाचा क्रमश : विस्तार करतात. हा विस्तार प्रत्येक वेळी जोडीतल्या दुसऱ्या कलावंताच्या पूर्वगामी स्वररचनेवर अवलंबून असतो. अशा प्रकारे दोहोंमिळून रागाचा संयुक्त रीत्या एकजिनसी आविष्कार होतो. सतार-सरोद (दोन्ही छेडवाद्ये), सतार-व्हायोलिन (एक छेडवाद्य, एक धनुर्वाद्य), सतार-सनई (एक छेडवाद्य, एक सुषिरवाद्य) इ. वाद्यांच्या जोडींची जुगलबंदीही प्रचारात आहे.

भजनाच्या फडांमध्ये तालवाद्य म्हणून मृदंगाच्या जोडीला टाळांचाही उपयोग करतात. फडामध्ये मध्यवर्ती भजनगायक असतो आणि ध्रुवपदाच्या वेळी सर्व गाणारे सामुहिक रीत्या गातात. त्यायोगे विविध आवाजांची रुंदी आणि स्वरमेळ वाढवून उत्कट परिणाम साधला जातो.

संगीताच्या मैफलीचा आणखी एक अत्यंत आवश्यक घटक म्हणजे श्रोता अथवा रसिक. श्रोते हे जर गायन-वादन-श्रवणात पारंगत आणि जाणकार असले, तर कलावंताच्या उत्तम आविष्काराला मिळणारी दाद अथवा ’वाहवा’ कलावंताला नुसते खुलविते, एवढेच नव्हे तर, त्याला ती उत्साहाचे अनिवार भरते आणते. अशा वेळी श्रोते हे गायकाकडून गाणे गाववून घेतात, असे म्हणता येईल. श्रोत्यांची ही दाद मैफलभर चाललेली असते. कलावंताची प्रत्येक उत्तम जागा ही रसिक श्रोत्याच्या मनात रुजू होऊन तिची त्याला जणू पावती मिळते. श्रोत्याचा दर्जा जितका श्रेष्ठ, तितका कलावंत कसोटीला लागण्याचा प्रसंग अधिक. तसेच कलावंत जितका श्रेष्ठ, तितकी श्रोत्यांची भूमिका उच्चत रकलात्मक पातळीवर पोहोचण्याचा योग अधिक, तात्पर्य, हिंदुस्थानी संगीताची मैफल हा कलावंत व श्रोते यांच्या जिवंत कलात्मक सहकार्याचा एक उत्स्फूर्त जल्लोष होय, असे म्हणता येईल.

अभिजात संगीतच्या मैफलीच्या शिष्टाचाराचे काही नियम आहेत. उदा., गायकाने आपले गाणे सुरू करण्यापूर्वी मैफलीचा आश्रयदाता जो यजमान त्याची आरंभ करण्यासाठी अनुज्ञा घ्यावी. मैफल जर सार्वजनिक असली, तर श्रोत्यांतील ’बुजुर्ग’ म्हणजे अनुभवी आणि थोर मंडळींची अनुज्ञा घ्यावी. साथीदाराशी तणातणीचा प्रसंग आणू नये. एकाच मैफलीत अनेक गायक गाणार असल्यास कनिष्ठ गायकाने अगोदर आणि नंतर क्रमवारीने वरिष्ठ गायकाने गावे (अथवा वादक असल्यास तदनुसार वादन करावे).

श्रोत्यांनीदेखील गवयाने आपण होऊन सूचना केल्यावाचून स्वतःच ’फर्माइश’ म्हणून विशिष्ट राग अथवा गीते गाण्याच्या सूचना करू नयेत. तसेच मैफल चालू असता मध्येच उठून जाऊ नये. जाणे आवश्यक असल्यास कलावंताची तशी अगोदरच सौम्यपणे अनुज्ञा घ्यावी इत्यादी. शिष्टाचाराचे हे नियम मैफलीचा एकंदर नूर, शान आणि गायकाची मर्जी सांभाळण्याच्या दृष्टीने आवश्यक असतात.

मंगरूळकर, अरविंद