पियानो : (पिआनो). स्वरपट्टी (कीबोर्ड) असलेले एक पश्चिमी तंतुवाद्य. संपूर्ण इटालियन नाव ‘पिआनोफोर्ते’. पिआनो म्हणजे मृदू व फोर्ते म्हणजे मोठा, असा याचा अर्थ आहे. आधुनिक ग्रँड पियानो

हातपट्ट्या, स्वरतारा व त्यावर आघात करून नाद निर्माण करणाऱ्या छोट्या हातोड्या हे या वाद्याचे प्रमुख घटक. लहानमोठा स्वर निर्माण करणे, स्वरघुमारा लांबविणे किंवा थांबविणे हे या वाद्यात साधता येते. संपूर्ण संगीतनिर्मितीसाठी तसेच संगीतसाथीसाठी वृंदवाद्य म्हणून त्याचा उपयोग करता येतो. या वैशिष्ट्यांमुळे पाश्चात्त्य संगीतविश्वात ते फार लोकप्रिय ठरले आहे.

पियानोचे आद्यरूप डल‌्सिमर या तंतुवाद्यात आढळते. तथापि आवाजनिर्मितीच्या पद्धतीत पियानोपूर्वीची, त्यासारखीच हातपट्ट्यांची व तंतुवाद्यप्रकारातील निराळी अशी ⇨ क्लॅव्हिकॉर्ड व ⇨हार्पसिकॉर्ड ही वाद्ये आहेत.

क्लॅव्हिकॉर्डमध्ये स्पर्शपट्टीने तार कंपित व ध्वनित होते; तर हार्पसिकॉर्डमध्ये छेडपट्टीने तारा छेडून आवाज निघतो. याउलट पियानोमध्ये हातपट्ट्या हळू किंवा जोराने आपटून त्यांना जोडलेल्या हातोड्यांनी स्वरमिलित तारांवर आघात केला जातो व त्या त्या आघातानुसार कमीअधिक प्रमाणात आवाज निर्माण करता येतो. तसेच आवाजाच्या गुणधर्मांत व जोरकसपणातही वैविध्य निर्माण करता येते.

बार्तोलोमेओ क्रिस्तोफोरी (१६५५–१७३१) या इटालियन वाद्यकाराने ‘ग्राव्हिचेंबालो कोल पिआनो ए फोर्ते’ या नावाचे आजच्या ‘ग्रँड पियानो’प्रमाणेच हातपट्ट्यांचे व आघात-हातोड्यांचे एक वाद्य सु. १७०९ मध्ये तयार केले. हातपट्टी पूर्वस्थितीत आल्याबरोबर स्वरघुमारा बंद होण्याची व्यवस्थाही त्या वाद्यात होती. त्यानंतर जर्मनीमध्ये सिल्बेरमान या वाद्यकाराने त्यात सुधारणा केल्या. इंग्लडमध्ये १७६०च्या सुमारास त्झुम्पे व ब्रॉडवुड यांनी ‘स्क्वेअर’ हा लहान चौकोनी पियानो तयार केला. तसेच हॉकिन्झ व वॉरनम यांनी ‘अप्राइट’ अथवा ‘कॉटेज’ हा उभा व घरगुती पियानो प्रचारात आणला. ऑस्ट्रियातील श्टाइन व श्ट्राइकर यांनी हातपट्ट्यांच्या वापरात सुलभता आणली. फ्रान्समध्ये एरार व प्लायेल यांचाही या वाद्याच्या विकासास हातभार लागला. अमेरिकेतील बॅबकॉक याने पियानोरचनेत क्रांतिकारक सुधारणा घडवून आणली. स्वरतारांसाठी सुरुवातीला वापरली जात असलेली लाकडी चौकट व नंतरची लोखंडी आधारपट्ट्या असलेली चौकट बदलून त्याऐवजी त्याने बीडाची चौकट उपयोगात आणली व जास्त जाडीच्या व ताणाच्या तारांचा वापर शक्य केला. अमेरिकेमधीलच मायर, चिकरिंग, स्टाइनवे यांनी या वाद्याचा आवाज जोरकस व मोठा करण्यासाठी त्यात अनेक सुधारणा करून अद्ययावत पियानोची निर्मिती केली. या वाद्यप्रकारातील वाद्यवृंदात वापरण्याच्या ‘ग्रॅँड’ (मोठा) किंवा ‘बेबी ग्रँड’ (ग्रँडपेक्षा लहान) पियानोमध्ये स्वरतारा ह्या हातपट्ट्यांच्याच दिशेत आणि समपातळीत असतात. तर स्क्वेअर (चौकोनी) पियानोमध्ये त्या त्यांच्याशी आडव्या पण समपातळीतच असतात. कॉटेज (घरगुती) अथवा अपराइट (उभा) या पियानोप्रकारांत त्या उभ्या व हातपट्ट्यांशी काटकोनात असतात, शिवाय वाद्याची उंची न वाढवता योग्य लांबीच्या तारा वापरण्यासाठी तारांचे दोन संच एकमेकांशी तिरकस लावलेले असतात. तारांच्या चौकटीखालील ध्वनिफलकामुळे स्वर जोरकस वाजतात. नादघुमारा चालू ठेवण्यासाठी किंवा थांबविण्यासाठी दोन पायपट्ट्या असतात. आधुनिक पियानोत मंद्र स्वरासाठी एक–एक, मध्य स्वरासाठी दोन–दोन व तार स्वरासाठी तीन–तीन अशा तारा असतात व त्यातील खर्जतारा ह्या घनभार वाढविण्यासाठी त्यावर तांब्याची तार गुंडाळलेल्या अशा धातूच्या तारा असतात. मध्य सप्तकाखाली तीन मंद्र सप्तके व दोन स्वर आणि वर तीन तार सप्तके व ‘सा’ हा स्वर हा पियानोतील स्वरांचा आवाका आहे. दोन्ही हातांच्या बोटांनी हळू किंवा जोरात आघात करून हे वाद्य वाजवितात. या वाद्यासाठी सर्वप्रथम संगीत लोदोव्हीको जूस्तिनी दा पीस्तॉया याने लिहिले. पुढे क्लेमेंटी, बेथोव्हन यांपासून ते आजतागायतच्या सुप्रसिद्ध संगीतकारांनी त्यात भरटाकली आहे. काही संगीतकार व वाद्यकार हे सुप्रसिद्ध वादकही होते. पाडेरेव्ह‌्स्की हा हमेलपासूनच्या वादकपंरपरेतील एक श्रेष्ठ आधुनिक वादक होते. यांत्रिक आणि विद्युत् पियानोमध्ये आपोआप व पुन:पुन्हा पूर्वनियोजित संगीत वाजविता येते. त्याच्या सुट्या व खंडीत स्वरांमुळे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये त्याचा उपयोग केला जात नाही.

गोंधळेकर, ज. द.