बसून : पाश्र्चात्त्य संगीतपरंपरेतील ⇨ओबो वाद्यकुलातील, कंपित  वायुस्तंभ – वाद्यवर्गातील  एक  वाद्य.  त्यास  जर्मन ‘फॅगॉट’ व इटालियन ‘फागोत्तो’ अशा संज्ञा आहेत. वाद्यवृंद व सैनिकी वाद्यघोष यांत वाजवले जाणारे हे ढाल्या तारतेचे, काष्ठ-सुषिर (वुडविंड) वाद्य आहे. व्कचित प्रसंगी बसूनचे स्वतंत्र वादनही होते. ओवो या वाद्याशी संबंधित असल्यामुळे बसून हे द्विदल जिव्हाळीचे (डबल रीड) असणे स्वाभाविकच होय. त्याचा पल्ला सुमारे साडेतीन सप्तके असतो. बसूनचा सर्वात आद्य आविष्कार इटलीमध्ये सोळाव्या शतकात पाहावयास मिळतो. सतराव्या शतकात वाद्यवृंदातील पहिले काष्ठ-सुषिर वाद्य म्हणून त्याचा अंतर्भाव झाला. त्याला सध्याचे प्रचलित रूप फ्रान्स- मध्ये १७५०- १८५० च्या दरम्यान लाभले. एकोणिसाव्या शतकाआधी कमी प्रमाणात आढळणाऱ्या ‘डबल बसून’ चा पल्ला साध्या बसूनपेक्षा एक सप्तक कमी तारतेचा असतो. यास ‘कॉन्ट्रा बसून’ म्हणतात. अंत्यत द्रुत गतीने व सूर पाडून (स्टकाटो) वाजवल्यास हे वाद्य हास्यकारक ध्वनी उत्पन्न करते, म्हणून त्यास कित्येकदा वाद्यवृंदातील विदूषक असेही संबोधले जाते.⇨ बेथोव्हनने आपल्या सहाव्या (पास्टोरल) सिंफनीमध्ये त्याचा अशा प्रकारे उपयोग केल्याचे आढळून येते.

विद्यमान बसून

बसून वाद्याच्या ध्वनीशी तुल्य ध्वनी निर्माण करणाऱ्या ⇨ऑर्गनमधील चावीसही ‘बसून’ असे म्हणतात. याचे वादन पायपट्टी दाबून पायाने करतात. याची तारता सोळा फुटी नलिकेच्या ध्वनीइतकी खालची असते.

रानडे, अशोक