अल्लाउद्दिनखाँ : (आलम्, ८ ऑक्टोबर १८६२—६ सप्टेंबर १९७२). सुप्रसिद्ध सरोदिये. जन्म शिवपूर (पूर्व बंगाल) येथे. हे सेनिया घराण्यातील असून सरोदाव्यतिरिक्त सुरसिंगार, रबाब, सतार, चंद्रसारंग, सुरबहार, व्हायोलिन, सनई, बासरी, पखवाज, तबला इ. वाद्येही तयारीने वाजवीत असत. गोपालचंद्र चतर्जी यांच्यापाशी गायन लोबो यांच्याकडे व्हायोलिन मुन्नेखाँकडे सनई आणि अहमद अलीखाँ व वजीरखाँ यांच्यापाशी सरोद शिकले. उदय शंकर यांच्या नृत्यसंघाबरोबर १९३५ साली त्यांनी यूरोपात दौरा केला. १९२४ मध्ये त्यांनी माइहरबँडची स्थापना केली. त्यांनी हेमंत, प्रभातकाली, हेमबिहाग, शोभावती, मदनमंजरी इ. नवीन रागांची रचना केली. त्यांच्या शिष्यशाखेमध्ये पुढील प्रसिद्ध कलावंत आहेत : अली अकबरखाँ (पुत्र), रवि शंकर (जामात), अन्नपूर्णा (कन्या), पन्नालाल घोष, निखिल बॅनर्जी, शरण राणी, तिमिर बरन आणि बहादुरखाँ. चालू शतकातील वाद्यवादनाच्या प्रसारात खाँसाहेबांची कामगिरी फार महत्त्वाची आहे. विविध वाद्ये वाजविणारे त्यांचे नामवंत शिष्य पाहता, विविध वाद्यांच्या सामर्थ्य-मर्यादांची त्यांना किती सूक्ष्म जाणीव असली पाहिजे हे लक्षात येते. त्यांच्या वादनातून अतिशय बंदिस्तपणे येणारे लयीचे काम, त्यांच्या वादनातील रागविस्तार आणि रागांचे वैविध्य यांवरून त्यांच्या संगीतक्षेत्रातील उत्तम जाणकारीची कल्पना येते. त्यांना पुढील मानसन्मान लाभले : संगीत नाटक अकादमीचे हिंदुस्थानी वादनातले पारितोषिक (१९५२) याच अकादमीची फेलोशिप (१९५४) पद्मभूषण (१९५८)  ‘देशिकोत्तम’(विश्वभारती, १९६१). माइहर येथे त्यांचे निधन झाले.

मंगरूळकर, अरविंद