सवाई गंधर्व : (१९ जानेवारी १८८६-१२ सप्टेंबर १९५२). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक थोर गायक व मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक-नट. मूळ नाव रामचंद्र गणेश कुंदगोळकर. जन्म कुंदगोळ ( जि. बेळगाव, कर्नाटक राज्य ) येथे. त्यांची गायनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना १८९७-९८ मध्ये बळवंतराव कोल्हटकरांकडे गाण्याची तालीम दिली. पुढे किराणा घराण्याचे प्रवर्तक ⇨ अब्दुल करीमखाँ यांच्याकडे त्यांनी गायनाची कसून तालीम घेतली (१९००-१९०७). त्याचप्रमाणे निसार हुसेनखाँ, हैदरबक्ष, मुरादखाँ यांच्याकडून त्यांनी चिजांचे शिक्षण घेतले. १९०८ मध्ये त्यांनी अमरावतीस ‘ नाटयकला प्रवर्तक मंडळी ’त गायक-नट म्हणून प्रवेश केला व ते स्त्रीभूमिका करू लागले. त्या काळात बालगंधर्व यांच्या स्त्रीभूमिका सवाई गंधर्वअत्यंत लोकप्रिय असतानाही, कुंदगोळकरांच्या रूपाने स्त्रीभूमिका करणारा एक नवा गायक-नट रंगभूमीवर अवतीर्ण झाला व अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या लोकप्रियतेमुळेच वऱ्हाडाचे नबाब म्हणून प्रसिद्ध असलेले दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे १९०८ साली त्यांना ‘सवाई गंधर्व’ ही पदवी दिली व या टोपण नावानेच ते पुढे जास्त ओळखले जाऊ लागले. सवाई गंधर्व यांचा विशेष लौकिक झाला, तो हरिभाऊ आपटे यांच्या संत सखू नाटकातील सखूच्या भूमिकेमुळे. या लौकिकाच्या पाठबळावरच त्यांनी स्वत:ची ‘नूतन संगीत नाटक मंडळी ’ स्थापन केली व ती पुढे दहा वर्षे चालविली. त्यानंतर ‘ यशवंत संगीत मंडळी ’मध्ये व शेवटी हिराबाई बडोदेकरांच्या ‘ नूतन संगीत विदयलया ’च्या नाटयशाखेत अशी स्थित्यंतरे करीत १९३२ मध्ये त्यांनी नाटयजीवनाला कायमचा रामराम ठोकला. या चोवीस वर्षांच्या नाटयजीवनात त्यांनी केलेल्या सुभद्रा, तारा, संत सखू, कृष्ण इ. भूमिका विशेष गाजल्या, तसेच ‘ बघुनी उपवनी ’, ‘ असताना यतिसन्निध ’, ‘ व्यर्थ छळिले ’ इ. त्यांची नाटयपदे खूपच लोकप्रिय झाली. तुलसीदास नाटकातील त्यांनी गायिलेले ‘ राम रंगी रंगले मन ’ हे भजनही अतिशय गाजले. १९३० नंतर संगीत रंगभूमीची सद्दी संपल्यावर सवाई गंधर्व शास्त्रीय संगीताच्या मैफलींकडे वळले. त्यांचा रंगभूमीवरील समृद्ध अनुभव, कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी, जास्त व विविध स्वनरंग वापरण्याची क्षमता व गायनातील समृद्ध भावरंगपट आदी अलौकिक गुणांमुळे त्यांचा संगीताविष्कार समृद्ध व प्रभावी ठरत असे. त्यांची रागाची बढत जास्त पद्धतशीर, तसेच तानांमध्ये वैविध्य व लयकारीत आक्रमकता दिसून येई.

सवाई गंधर्वांचा आवाज मुळात गोड नव्हता गळाही बोजड होता पण त्यांनी अथक परिश्रम करून आपला आवाज कमावला आणि तो झारदार व सुरेल बनविला. ते ख्याल, तराणा, ठुमरी, भजन, नाटयसंगीत असे विविध गानप्रकार उत्तम रीत्या सादर करीत असत. किराणा घराण्याच्या फिरतीत त्यांनी अधिक वैविध्य व गायकीत आक्रमकपणा आणून किराणा घराण्याची गानपरंपरा अधिक समृद्ध केली [⟶ किराणा घराणे]. त्यांच्या शास्त्रोक्त रागदारी गाण्यांच्या व नाटयपदांच्या अनेक ध्वनिमुद्रिका एच्. एम्. व्ही. कंपनीने काढल्या. १९४२ मध्ये त्यांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला व परिणामत: पुढील दहा वर्षे त्यांचे गाणे पूर्णत: थांबले. पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या शिष्यशाखेत गंगुबाई हनगल, भीमसेन जोशी, फिरोज दस्तुर, छोटा गंधर्व, मास्तर कृष्णराव इ. मान्यवर गायक-गायिकांचा समावेश होतो.

सवाई गंधर्वांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांतच त्यांच्या तैलचित्राचे अनावरण पुणे येथील भावे हायस्कूलमध्ये श्रीमंत बाबूराव देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच पुणे येथील संभाजी उद्यानात सवाई गंधर्व यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण दि. ९ जून १९६४ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. सवाई गंधर्वांची पहिली पुण्यतिथी १९५३ मध्ये ‘ आर्य संगीत प्रसारक मंडळा ’तर्फे संगीताचा कार्यक्रम करून साजरी करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत ‘ सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव ’ पुण्यामध्ये जोमाने साजरा केला जातो. पंचवीस वर्षांनंतर त्याचे नाव बदलून तो ‘ सवाई गंधर्व संगीत महोत्सव ’ या नावाने पुढे चालू राहिला. सवाई गंधर्वांचे शिष्य पं. ⇨ भीमसेन जोशी यांचा महोत्सवाच्या संयोजनात प्रमुख वाटा असून, त्यांनी सचिवपदाची धुरा आजतागायत समर्थपणे सांभाळली आहे. हा संगीत महोत्सव खूपच लोकप्रिय ठरला असून, त्यात प्रतिवर्षी देशभरातील मान्यवर, नामवंत गायक-वादक-नर्तकादी कलावंत आपली कला निष्ठापूर्वक सादर करून सवाई गंधर्वांना आदरांजली वाहतात. सवाई गंधर्वांच्या जन्मगावी कुंदगोळ येथेही प्रतिवर्षी असाच संगीताचा कार्यक्रम करून त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

संदर्भ : १. देशपांडे, अ. पां. संपा. स्वरयज्ञ : सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची पन्नास वर्षे, २००२.

२. देशपांडे, पां. ह. संपा. सवाई गंधर्व, पुणे, १९४६.

३. देशपांडे, वामनराव, संपा. सवाई गंधर्व आणि गांधर्व संगीत, पुणे, १९८६.

देशपांडे, वा. ह. इनामदार, श्री. दे.