सिद्धेश्वरी देवी

सिद्घेश्वरी देवी : (१९०८— १९७६). हिंदुस्थानी सुगम शास्त्रीय संगीतातील प्रसिद्घ गायिका. ठुमरी, टप्पा, दादरा, कजरी, चैती, भजन इ. सुगम शास्त्रीय संगीतप्रकारांत त्या अग्रगण्य कलाकार मानल्या जातात. बनारस घराण्याच्या त्या प्रमुख गायिका होत. त्यांचा जन्म वाराणसी येथे. शामू मिश्रा व चंदा यांच्या त्या कन्या आणि विख्यात कोठीवाली गायिका मैनाबाई या त्यांच्या आजी होत (मातृकुल). सिद्घेश्वरी देवींच्या बालपणी त्यांचे आईवडील निवर्तले. त्यामुळे त्यांचा सांभाळ मावशी राजेश्वरी यांनी केला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती व सुरूवातीच्या काळात संगीतक्षेत्रात पुढे येण्यासाठी त्यांना अपार मेहनत व साधना करावी लागली. बनारसच्या सुप्रसिद्घ गायिका विद्याधरी देवी यांच्याकडे सिद्घेश्वरींचे सुरुवातीचे गायनाचे शिक्षण झाले. तरुण वयात अभिनय करुन ठुमरी म्हणण्याचा सिद्घेश्वरींचा प्रघात होता पण पुढे या क्षेत्रात नामवंत गायिका म्हणून नाव कमविल्यावर त्यांनी अभिनय करण्याचे सोडले. विद्याधरी देवींकडे त्यांनी सुगम संगीत प्रकारांची तालीम घेतली तथापि आपल्या गायनाला शास्त्रीय रागदारी संगीताचे अधिष्ठान असावे, म्हणून त्यांनी बनारसचे सुप्रसिद्घ गायक बडे रामदास यांचे शिष्यत्व पत्करले. सियाजी महाराज, देवासचे रज्जब अली खाँ, इनायतखाँ अशा अन्य गुरुंकडेही त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

ह्या सर्व संस्कारांतून त्यांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण व अनन्यसाधारण अशी खास गायकी सिद्घ केली. त्यांना संगीतक्षेत्रात विशेष लौकिक १९४०-४१ च्या पुढे प्राप्त झाला. त्यांच्या सुरेल व वैशिष्ट्यपूर्ण गायकीने त्यांना विशेष ख्याती प्राप्त झाली आणि ती अखंड राहिली. १९६७-६८ पर्यंत त्या गाण्याच्या ऐन उमेदीत होत्या. त्यांच्या गाण्याच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या. भारतात अनेक शहरांतून त्यांच्या गायनाच्या मैफली गाजल्या. अफगाणिस्तानचा दौरा करुन तेथे त्यांनी गायनाच्या मैफली केल्या (१९६५). त्यांना वेगवेगळ्या राज्य शासनांकडून अनेक पुरस्कार व गौरव प्राप्त झाले. हिंदुस्थानी कंठसंगीतातील नैपुण्याबद्दल त्यांना संगीत नाटक अकादेमीचे पारितोषिक लाभले (१९६६). केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मश्री’ किताब देऊन गौरविले (१९६७). रवींद्र भारती विश्वविद्यालय, कोलकाताकडून डी. लिट्. (१९७३) व विश्वभारती विद्यालयाची ‘देशिकोत्तम’ ही उपाधी (१९७६) इ. बहुमान त्यांना प्राप्त झाले. त्यांच्या जीवनावर प्रसिद्घ दिग्दर्शक मणी कौल यांनी अनुबोधपट (१९८९) तयार केला असून त्याला पुरस्कार लाभला आहे. त्यांचे पती भारतीय लष्करात एक उच्च पदस्थ अधिकारी होते. आपल्या शांता व सविता या दोन मुलींना त्यांनी संगीतशिक्षणाबरोबरच विद्यापीठीय शिक्षणही दिले. त्यांपैकी सवितादेवी या त्यांच्या गायकीचा वारसा चालवीत आहेत.

यह कोठेवालियाँ या बहुचर्चित पुस्तकात त्यांचा समग्र जीवनवृत्तांत नमूद आहे. पक्षाघाताच्या दुखण्याने त्यांचे निधन झाले.

आठवले, वि. रा. इनामदार, श्री. दे.