फेलिक्स मेंडेल्सझोन : एक रेखाचित्र.मेंडेल्सझोन, फेलिक्स : (३ फेब्रुवारी १८०९–४ नोव्हेंबर १८४७). जर्मन संगीतकार, पियानोवादक व वाद्यवृंदनिर्देशक. हँबर्ग येथे जन्म. मोझेस मेंडेल्सझोन या तत्त्वज्ञाचा नातू. त्याचे आईवडील ज्यू होते व त्यांनीच त्याला पियानोवादनाचे सुरुवातीचे धडे दिले. पियानो व व्हायोलिन ही वाद्ये तो बालवयातच शिकला. १८११ मध्ये त्याच्या कुटुंबियांनी बर्लिनला स्थलांतर केले. तिथे त्‌याने लूट्‌व्हिख बेर्गर याच्याकडे पियानोचे तर के. एफ्. झेल्टरकडे संगीतरचनेचे शिक्षण घेतले. झेल्टरचा प्रभाव त्याच्यावर विशेषत्वाने पडला. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी (१८१८) त्याने बर्लिनमध्ये पियानोवादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. प्रख्यात जर्मन कवी ⇨ गटे (१७४९–१८३२ ) याच्या भेटीसाठी तो १८२१ मध्ये वायमारला गेला. गटेच्या दोन कवितांवर आधारित अ काम सी अँड अ प्रॉस्परस व्हॉयेज (१८२८) ही प्रास्ताविक संगीतरचना (ओव्हरचर) त्याने केली. तसेच आपली क्वार्टेट इन बी मायनर ही संगीतकृती त्याने गटेला अर्पण केली. वयोवृद्ध कवी गटे आणि बालसंगीतकार मेंडेल्सझोन यांच्यात एका आगळ्यावेगळ्या मैत्रीचे बंध या काळात जूळून आले. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्याने केलेली शेक्सपिअरच्या अ मिड्समर नाइट्स ड्रीम या नाटकाची प्रास्ताविक संगीतरचना (१८२६) फार गाजली. ही रचना पुढे अनेक संगीतसभांतूनही (कॉन्सर्ट) स्वतंत्ररीत्या प्रसृत झाली. त्याने कामाचोस् वेडिंग ही विनोदी संगीतिकाही त्या सुमारास संगीतबद्ध केली (१८२५). १८२६ मध्ये त्याने बर्लिन विद्यापीठात प्रवेश घेतला व तिथे तीन वर्षे शिक्षण घेतले. श्रेष्ठ जर्मन संगीतकार ⇨ बाख (१६८५–१७५०) याची सेंट मॅथ्यू पॅशन ही संगीतरचना पुन्हा सादर करून (१८२९) त्याने बाखच्या सांगीतिक पुनरुज्जीवनास चालना दिली. १८२९ मध्ये त्याने लंडनला आपली पहिली संगीतरचना सादर केली व तदनंतर इंग्लंडमध्ये पियानोवादक व संगीतरचनाकार म्हणून अफाट लोकप्रियता मिळवली. १८३५ मध्ये त्याची लाइपसिकमधील ‘गेवान्डहाउस ऑर्केस्ट्रा’ या वाद्यवृंदाचा संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्याच्या अन्य प्रमुख संगीतकृतींमध्ये इलायजा (१८४६) व सेंट पॉल या ⇨ ऑरेटोरिओ प्रकारातल्या संगीतरचना, इटालियन सिम्फनी (१८३३), व्हायोलिन काँचेर्टो (१८४४), तसेच पियानो वाद्यसंगीत, चेंबर म्यूझिक व चर्च-संगीत या प्रकारांत केलेल्या रचना आदींचा समावेश होतो. मर्यादित सांगीतिक आवाका व नाट्यमयतेचा अभाव असूनही त्याच्या संगीतरचनांना अमाप लोकप्रियता मिळाली व जर्मनीतील सांगीतिक जीवनावर त्याचा खूप प्रभाव पडला. निरनिराळ्या प्रकारच्या वाद्यसंचांसाठी गोड, आकर्षक रचना ही त्याची महत्त्वाची कामगिरी मानता येईल. तो एकोणिसाव्या शतकातील स्वच्छंदतावादी संगीतप्रणालीचा प्रमुख प्रवर्तक मानला जातो. लाइपसिक येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Blunt, Wilfred, On Wings of Song: A Biography of Felix Mendelssohn, Patterson, N.J. 1974.

            2. Young, Percy M. Introduction to the Music of Mendelssohn, 1949.

मोदी, सोराब रानडे, अशोक