ल्यूटल्यूट : एक तंतुवाद्य-प्रकार व वाद्यगट. हे प्राचीन व सर्वत्र प्रसृत तंतुवाद्य असून, ते बोटांनी (तिकोन्याने वा नखीने नव्हे) तारा छेडून वाजवले जाते. या वाद्याचा आकार पेअर फळासारखा असून बोटपट्टीवर पडदे असतात. वाद्यास घोडी नसून प्रत्येक तारेस तिच्या अष्टम् स्वरात मिळवलेल्या तारेची जोड असते. तारांच्या संख्येत निरनिराळ्या कालखंडांत बदल होत गेले आहेत. वाद्याच्या शीर्षभागास (म्हणजे खुंट्या ज्यात बसविल्या जातात त्या पेटीसारख्या विभागात) मानेपासून बाक असतो. आर्चल्यूटसारख्या मोठ्या आकारमानाच्या वाद्यापासून ते मँडोरापर्यंत अनेक तंतुवाद्यांचा ल्यूट कुटुंबात समावेश होतो. कीडरोनेसारख्या वाद्यप्रकारात दुहेरी खुंटीपेटी असते. एका पेटीस जोडलेला तारांचा समूह बोटपट्टीवरून जातो तर दुसरीस जोडलेला संच मोकळा असून त्यांतील तारा छेडल्या जातात. धातूच्या तारा, ताती वा पीळ दिलेले रेशीम वगैरेंचा ल्यूटसाठी वापर केला जातो.

ल्यूटसाठी असलेले संगीत स्वरलिपीवरून न वाजविले जाता ‘टॅब्लेचर’च्या (अक्षरे, संख्यांक इ. प्रतीकांनी तंतुवाद्यांचे संगीत लिहिण्याची पद्धती) साहाय्याने वाजविले जाई. सोळाव्या-सतराव्या शतकांत प्रत्येक तारेसाठी स्वतंत्र जागा ए, बी, सी ही छोटी अक्षरे वगैरेंचा टॅब्लेचरमध्ये अंतर्भाव होई.

यूरोपमध्ये प्रबोधन व बरोक काळात (साळावे-सतरावे शतक) लोकप्रिय संगीतात ल्यूट हे प्रमुख वाद्य होते. इंग्लिश संगीतरचनाकार जॉन डाऊलंड (१५६३-१६२६) हा यूरोपमधला सोळाव्या शतकातला सर्वात प्रसिद्ध ल्यूटवादक होता. या वाद्याचा उगम अल्-ऊद या अरबी वाद्यापासून झाला असावा. तेराव्या शतकात स्पेनमार्गे हे वाद्य यूरोपात पोहोचले. 

अरबी जमातींत ल्यूटचा वापर अजूनही रूढ आहे. मात्र सर्वसाधारणतः ल्यूट हे वाद्य आता मागे पडत चालले आहे. तथापि विसाव्या शतकात ज्यूलिअन ब्रीम (१९३३ – ) या इंग्लिश वादकाने या वाद्याच्या पुनरुज्जीवानाचे प्रयत्न चालवले आहेत. 

रानडे, अशोक दा.