उस्तादबिस्मिल्लाखाँ : (२१ मार्च १९१६- ). अखिल भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सनईवादक. पूर्ण नाव अमरूद्दिनखाँ बिस्मिल्ला.⇨सनई म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाखाँ, असे समीकरणच ज्या कलावंताच्या श्रेष्ठ व अभिजात कलागुणांमुळे सिद्ध झाले, त्या खाँसाहेब बिस्मिल्लाखाँ यांचा जन्म शहनाईवादकांच्या कुटुंबातच. बिहार प्रांतातील शहाबाद जिल्ह्यातील दुमराव या गावी झाला. शहनाईवादन हा त्यांच्या घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे लहानपणीच त्यांना आपल्या वडिलांकडून – खाँसाहेब पैगंबर बक्ष यांच्याकडून – शहनाईवादनाचे संस्कार लाभले. त्यांनी आपल्या मामांकडे – खाँसाहेब अलिबक्ष यांच्याकडे – वयाच्या सहाव्या वर्षापासून पद्धतशीर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तसेच विलायत हुसेन आणि सादिक अली यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले. हळूहळू आपल्या मामांबरोबर, त्यांची साथ करण्यासाठी लग्नासारख्या उत्सवप्रसंगी तसेच संगीतसंमेलनांत ते जाऊ लागले. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आपल्या मामांबरोबर अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पहिल्यांदा सनईवादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला (१९३०). दुसरा कार्यक्रम लखनौ येथे, प्रदर्शनानिमित्त झालेल्या संगीतसंमेलनात करून उत्तम वादनाबद्दल सुवर्णपदक मिळवले. तद्वतच १९३७ मधील कलकत्त्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी तीन सुवर्णपदके मिळवून असंख्य रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. १९३८ मध्ये लखनौ येथे ऑल इंडिया रेडिओ केंद्रावर प्रथम कार्यक्रम सादर केला. येथून पुढे त्यांच्या सनईवादनाच्या उज्ज्वल कारकीर्दीला सुरुवात झाली. १९४० साली बिस्मिल्लाखाँ व त्यांचे बंधू खाँसाहेब शमसुद्दीनखाँ यांनी एक संगीत मंडळी स्थापन करून कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. पुढे अल्पावधीतच प्रथम श्रेणीचे शहनाईवादक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला.

शहनाईसारख्या वाद्यावर गायकीचे सर्व प्रकार लीलया निर्माण करणारा अत्यंत सुरेल वादक म्हणून बिस्मिल्लाखाँ ख्यातनाम आहेत. गायन-वादनाच्या शैलींचा अपूर्व समन्वय त्यांच्या ठिकाणी दिसून येतो. मींड, गमकादींचाही त्यात अंतर्भाव होतो. ख्याल, ठुमरी वगैरे संगीतप्रकारांप्रमाणेच कजरी, चैती, पूरबी अशा लोकधुनीही ते विलक्षण कौशल्याने हाताळतात. शहनाईच्या फुंकीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व असून, त्यांचे वादन अत्यंत भावपूर्ण असते. लयीच्या साथीसाठी ते खोरदक नावाचे वाद्य घेत असून ते छड्यांनी वाजवले जाते. त्यांच्या असामान्य कलागुणांमुळे १९५५ मध्ये त्यांना ’नॅशनल कल्चरल ऑर्गनायझेशन’ या राष्ट्रीय सांस्कृतिक संघटनेकडून ’अखिल भारतीय शहनाई चक्रवर्ती’ हा किताब मिळाला. १९५६ मध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे सन्मान लाभला आणि १९६१ मध्ये शासनाकडून ’पद्मश्री’ व १९८० मध्ये ’पद्मविभूषण’ हे किताब लाभले. उस्ताद बिस्मिल्लाखाँ यांनी शहनाईवादनाला बैठकीत स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ’रॉयल नेपाळ आर्ट अकॅडमी’तर्फेही त्यांना सर्वोच्च मान लाभला.

ते १९६२ मध्ये अफगाणिस्तान व पाकिस्तान येथे गेले आणि १९६४ मध्ये एडिंबरो संगीतमहोत्सवात त्यांनी भाग घेतला. १९६७ मध्ये ते अमेरिकेला गेले. तसेच ’इंटरनॅशनल म्यूझिक कौन्सिल’च्या निमंत्रणावरून त्यांनी यूरोपचा दौरा केला (१९६९-७०). त्यांच्या सनईवादनाच्या ध्वनिमुद्रिका परदेशांतही अत्यंत लोकप्रिय आहेत. गूंज उठी शहनाई या चित्रपटातील त्यांचे सनईवादनही फार लोकप्रिय ठरले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सनईवादनात व कनिष्ठ चिरंजीव नाझिम तबला व सनई-वादनात निपुण आहेत.

आठवले, वि. रा.