तिल्लाना : तिल्लाना हा दाक्षिणात्य संगीतातील एक छोटासा, खुसखुशीत गानप्रकार आहे. त्याच्या द्रुत, आकर्षक संगीतामुळे तो मैफलीच्या शेवटीशेवटी गायिला जातो. त्याचा प्रारंभ ‘जतीं’ नी (बोलांनी) होतो. ‘तिल्लाना’ ही संज्ञा ‘ति–ला–ना’ या लयबोलांवरून आलेली आहे.

तिल्लाना याचे समकक्ष रूप ‘तिरी तिल्लाना’ या देशी प्रकारामध्ये आहे. तिल्लाना प्रायः ‘मध्यमकाला’त (मध्यलयीत) असतो आणि त्याचे संगीत चटपटीत आणि जिवंत असते. तिल्लानाची ‘मातू’ (साहित्य) स्वरमिश्रित जती व सर्वसाधारण शब्द यांनी घडलेली असते.

तिल्लाना हा श्रवणमधुर गानप्रकार अठराव्या शतकातील अभिज्ञात संगीतरचनाकारांनी प्रथमतः निर्माण केला. मैफलीमध्ये प्रदीर्घ ‘पल्लवी’–नंतर तो येतो, तेव्हा एक आनंदी आणि रुचिवैचित्र्याचे वातावरण निर्माण होते. नृत्याच्या कार्यक्रमामध्येही प्रदीर्घ अशा ‘पदम्’ च्या अभिनयानंतर येणारा तिल्लाना असेच वातावरण निर्माण करतो. तसेच ‘हरिकथाकालक्षपम्’ मध्येही एकसुरी आणि कंटाळवाण्या अशा दीर्घ प्रवचनानंतर येणारा तिल्लाना स्वागतार्ह ठरतो.

तिल्लानाच्या लोकप्रियतेची पुढील कारणे आहेत : (१) त्यात ‘त क त रि किट नक’ असे लयीचे बोल गोविलेले असतात, (२) नित्याची स्वराक्षरे त्यात गुंफलेली असतात आणि (३) त्यातून साहित्याचा सुगंधही लाभतो. पूर्वीच्या प्रबंधांचा ‘सोलकट्टु’ (बोल) हा एक विशेष होता. त्याचा निर्देश ‘पाटम्’ असा केला जात असे. मध्ययुगीन प्रबंधांमध्ये ‘पाटव–खंड’ या नावाचा एक भाग असे. जती हा मुळातच एक वेधक भाग आहे पण अशा जतींची सांगड जेव्हा साहित्याशी घातली जाते, तेव्हा ती रचना स्वाभाविकच कमालीची चित्तवेधक होते.

तिल्लाना हा नृत्यकार्यक्रमामध्ये येणारा एक नित्याचा भाग आहे. नर्तकीला आपले पदन्यासांतील कौशल्य दाखविण्यासाठी तिल्लानाचा फार उपयोग होतो. हरिकथानिरुपणकारानेही ‘पूर्वपीठिका’ (पूर्वरंग) संपल्यावर तिल्लाना गावा, अशी परंपरा आहे. यावेळी तिल्लाना गायिल्याने जे संगीताचे वातावरण निर्माण होते, त्याने पुढे येणाऱ्या हरिकथास्वादनाचा जणू विसारच मिळतो.

तिल्लानाचे ⇨ पल्लवी, ⇨ अनुपल्लवी आणि ⇨ चरण असे तीन विभाग आहेत. त्यांचे ‘धातू’ (स्वरावली) वेगवेगळे असतात. तथापि नुसती पल्लवी आणि अनुपल्लवी किंवा पल्लवी आणि चरण ज्यांत आहेत, असेही तिल्लाना आहेत. असे तिल्लाना हे ‘द्विधातुप्रबंध’, ‘उगाभोग’ आणि ‘समष्ठिचरणयुक्त कृती’ यांप्रमाणे संपूर्ण असतात. पल्लवी आणि अनुपल्लवी प्रायः जतींनी घडतात, तर चरण हे शब्द, लयीचे बोल आणि जती यांनी घडतात. काही तिल्लांनाना सुंदर ‘संगती’ (स्वरवैचित्र्ये) असतात. पल्लवी शेषय्यरकृत ‘झम् झम् तरित झम्’ (राग वसंत, ताल आदिताल) हा धीम्या लयीतील एक उत्तम तिल्लाना आहे.

जावळीप्रमाणेच तिल्लाना हा एक मर्यादित गानप्रकार असून तो गाण्याला चार ते सहा मिनिटे पुरतात.

सांबमूर्ती, पी. (इं.) मंगरूळकर, अरविंद (म.)