भार : दक्षिण भारतीय वा कर्नाटक संगीतातील एक संज्ञा ⇨ कथाकालक्षेपम् (कीर्तनाप्रमाणे संगीतसाथीसह धर्मप्रवचन करणे) करणाऱ्या कलाकारांना ‘भागवतर’ (कीर्तनकार) असे दक्षिण भारतात म्हटले जाते. ‘भागवतर’ ही सज्ञा तमिळ असून, तीस ‘भागवतुळू’ हा समानार्थी पर्याय तेलुगूमध्ये वापरला जातो. १८६० च्या सुमारास मोरकरबुवा आणि रामचंद्रबुवा या दोन महाराष्ट्रीय कीर्तनकारंच्या तंजावरच्या दौऱ्यामुळे तंजावूर कृष्ण भागवतर (१८४७-१९०३) या कथाकालक्षेपम्च्या जनकाने स्फूर्ती घेतली. मलबार विभागात संगीतकार आणि संगीतशिक्षक यांनाही भागवतर असे म्हणतात. भागवतर ह्यांनी संगीत व नृत्य कलांचा उपयोग ईश्वरोपासनेसाठी करुन घेतला व या कलांचे धार्मिक अधिष्ठान पक्के केले. गायन, वादन, नृत्य यांच्या आविष्काराबरोबरच कथानिवेदनाच्या खुसखुशीत शैलीने अनेकविध रसांचा परिपोष घडवत भागवतर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. भागवतरांच्या परंपरेत तंजावूर कृष्ण भागवतर यांच्या बरोबरच वराहूर गोपाळ भागवतर, पंडित लक्ष्मणाचार्यर, तिरुप्पयनम्, पंचपकेश शास्त्रीयार, नरसिंह भागवतर, शुलमंगलम्, वैद्यनाथ भागवतर, अनंतराम भागवतर इत्यादींचाही अंतर्भाव होतो.

रंगाचारी, पद्मा (इं) रानडे, अशोक (म.)