जुगलबंदी : दोन कलावंतांनी एकत्रित रीत्या सादर केलेली मैफल म्हणजे जुगलबंदी. ‘जुगल’ हा शब्द ‘युगल’ (जोडी) या संस्कृत  शब्दावरून आलेला आहे. लोकसंगीतात वृंदगायन किंवा समूहगायन हे जुन्या काळापासून रूढ होते. त्याचाच दोन कलावंतांपुरता मर्यादित स्वरूपाचा आळीपाळीने केलेला आविष्कार जुगलबंदीत आढळतो. जुगलबंदीत स्पर्धा अथवा ईर्ष्या नसते तीत दोन कलावंत असतात व प्रत्येक कलावंताचा कलाविष्कार हा दुसऱ्याच्या पूर्वगामी स्वररचनेवर अवलंबून, तिच्याशी सुसंगत आणि पूरक असावा लागतो. अखेरीस दोघा कलावंतांचा संयुक्त पण एकजिनसी आविष्कार जुगलबंदीत प्रत्ययास येतो. जुगलबंदी दोन गायकांची, तशीच दोन वादकांचीही होते. डग्गरबंधू (धृपद गायन), सलामत आणि नजाकत अली (ख्याल गायन), रवी शंकर–अली अकबरखाँ (सतार–सरोद वादन), विलायतखाँ-बिस्मिल्लाखाँ (सतार–शहनाई वादन) इत्यादींच्या जुगलबंदी प्रसिद्ध आहेत.                                                   

मंगरुळकर, अरविंद