स्वातीस्वाती तिरूनल : (१६ एप्रिल १८१३ २७ डिसेंबर १८४६). कुलशेखर वंशातील त्रावणकोर संस्थानचा एक कलाभिज्ञ, संगीतप्रेमी कर्तबगार राजा. त्यांचा जन्म राजा रामवर्मा कोईल थम्पुरण आणि महाराणी गौरी लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव रुमिणी. त्यांचे धाकटे भाऊ उथरम तिरूनल मार्तंडवर्मा होत. तिरूनल दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मावशी गौरी पार्वतीबाई यांनी राज्य-कारभार हाती घेतला आणि राज-पुत्रांचे संगोपन केले. तिरूनल यांचे वडील संस्कृत पंडित होते. तिरूनल यांनी कुमारवयातच संस्कृत आणि मलयाळम् भाषा शिकायला सुरुवात केली. रेसिडेंट जेम्स मन्रो याच्याकडून ते इंग्रजी शिकले. पुढे त्यांनी हिंदी, तेलुगू , मराठी, कन्नड, तमिळ, बंगाली इ. भाषांचाही अभ्यास केला. तसेच विज्ञान आणि भूमिती या विषयांतही त्यांनी प्रावीण्य मिळविले.

स्वाती तिरूनल यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी त्रावणकोर संस्थानची विधिवत सूत्रे हाती घेतली (१८२९). त्यानंतर लगेचच त्यांनी त्रावणकोर संस्थानची राजधानी कोल्लमहून तिरुअनंतपुरम् येथे हलविली. त्यांनी १८३४ मध्ये तिरुअनंतपुरम् येथे प्रथम इंग्रजी शाळा सुरू केली. पुढे तिचे महाविद्यालयात ( विद्यमान युनिव्हर्सिटी कॉलेज ) रूपांतर झाले. तत्कालीन न्यायव्यवस्थेत कन्दन मेनन ( हुझूर दिवण पेश्कर ) यांच्या सल्ल्याने त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. संस्थानात मुन्सफ न्यायालये, जिल्हा न्यायालये व अपील न्यायालय स्थापन केले. शेतीस उत्तेजन देण्यासाठी आणि जमिनीच्या व्यवहारातील तंटे सोडविण्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व जमिनींचे पुनःसर्वेक्षण केले. १८३६ मध्ये त्यांनी त्रावणकोर प्रांताची प्रथम जनगणना केली. राज्यात रुग्णालये स्थापन करून आधुनिक वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. त्यांना खगोलशास्त्रातही खूप रस होता. कॅल्डेकॉट या यूरोपीय खगोलशास्त्रज्ञाच्या देखरेखीखाली त्यांनी सुरू केलेली त्रिवेंद्रम वेधशाळा सांप्रत केरळ विश्वविद्यालयाच्या पदार्थ-विज्ञान विभागाचा एक भाग आहे. त्यांनी कोट्टायम येथे सरकारी छापखाना आणि तिरुअनंतपूरम् येथे एक वस्तुसंग्रहालय व प्राणी संग्रहालय सुरू केले. त्यांनी सार्वजनिक अभियांत्रिकी खाते सुरू करून सिंचन विभागावर लक्ष केंद्रित केले. व्यापाराला प्रोत्साहन दिले. सुमारे १६० किरकोळ कर रद्द केले. गुन्हेगारांच्या अघोरी शिक्षा रद्द केल्या. भ्रष्टाचारी व्यक्तींना काढून टाकले. त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरू व नंतरचे संस्थानचे दिवाण सुब्बाराव यांनाही त्यांनी याबाबतीत दया दाखविली नाही.

स्वाती तिरूनल यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर नारायणी पिल्लाई कोचम्मा या नायर कुटुंबातील मुलीशी विवाह केला. ती एक उत्कृष्ट गायिका आणि वीणावादकही होती. कोचम्मापासून त्यांना एक पुत्र झाला. त्यानंतर १८४३ मध्ये त्यांनी मुदलियार कुटुंबातील एक नर्तिका सुंदर लक्ष्मी हिच्याशी विवाह केला.

स्वाती तिरूनल यांचा अनेक साहित्यिक व संगीतकार यांना राजाश्रय होता. त्यांपैकी एरईमान थंपी हे राजकवी होते तर वादिवेळू , शिवनंदन, चिन्मयाह, पोन्नयाह हे चार बंधू संगीतकार, नर्तक, वादक होते. त्यांनी हिंदुस्थानी संगीताचा एक चमूच तयार केला होता. त्यासाठी म्हैसूरहून अल्लाउद्दीन, उत्तरेतून सय्यद सुलेमान, तंजावरहून चिंतामणी वगैरेंना पाचारण केले होते. महाराजांना नृत्य आणि संगीताबरोबरच भरतनाट्यम् व मोहिनी-आट्टम्चा व्यासंग होता. ते स्वतः कर्नाटक आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे मोठे जाणकार होते. संगीताचे बाळकडू त्यांना त्यांच्या आई आणि मावशीकडून मिळाले होते. संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी कर्मणा सुब्रमण्यम् भागवतार आणि कर्मणा पद्मनाभ भागवतार या विद्वानांकडून घेतले. यांशिवाय सुब्बाराव या इंग्रज गुरूकडून ते संगीत शिकले. मोठमोठ्या कलाकारांचे गाणे ऐकून ते स्वतः सराव करीत असत. त्यांनी स्वतः चारशेहून अधिक रचना केल्या आहेत. त्यांपैकी काही रचना अलीकडच्या काळातील एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी, टी. एस्. सत्यवती, एम्. बालमुरलीकृष्ण यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी गायल्या आहेत. ‘ पद्मनाभ पाही पाही , ‘ देवा देवा , ‘ श्री रमण विभो ’ या त्यांपैकी काही प्रसिद्ध रचना होत.

त्रिवेंद्रम येथे ऐन उमेदीत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर लेनिन राजेंद्रन् यांनी स्वाती तिरूनल हा चित्रपट तयार केला (१९८७), तसेच केरळ येथे प्रतिवर्षी ‘ स्वाति संगीत महोत्सवम् ’ साजरा केला जातो.

कुलकर्णी, रागेश्री अजित