ब्राम्झ, योहानेस: (७ मे १८३३-३ एप्रिल १८९७). जर्मन संगीतकार. एकोणिसाव्या शतकातील पाश्चात्य संगीतपरंपरेत ⇨ बेधोव्हनच्या बहुधर्मी प्रतिभेची दोन खास अंगे जोपासणारे दोन समर्थ संगीतकार म्हणजे ब्राम्झ व ⇨ व्हानगर हे होत. ब्राम्झने गीतधर्मी, तर व्हागरने नाट्यधर्मी रचनांतून बेथोव्हनचा वारसा चालविला. स्वच्छंदतावादी सांगीतिक युगाचा ब्राम्झ हा एक प्रमुख प्रतिनिधी मानला जातो. त्याचा जन्म हँबर्ग येथे झाला. तेथील रंजनगृहांतून डबल बेस वाद्य वाजवून उपजीविका करणाऱ्या संगीतकाराचा हा मुलगा होय. तेथील स्थानिक शिक्षकांकडून त्याने संगीताचे धडे घेतले व उपाहारगृहे वगैरेंतून संगीताचे कार्यक्रम देऊन उपजीविका चालवली. वयाच्या विसाव्या वर्षी त्याची गुणवत्ता प्रख्यात हंगेरियन संगीतकार लिस्टच्या नजरेत भरली व त्याने त्याला खूप प्रोत्साहन दिले. जर्मन संगीतकार रोबेर्ट शूमान आणि त्याची पत्नी प्रसिद्ध पियानोवादक क्लारा शूमान या कुटुंबाचा गाढ जिव्हाळा त्याला लाभला १८५७ पासून पुढे चार वर्षे डेट्मोल्ड येथे त्याने दरबारी नोकरी केली. मग काही काळ त्याने स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्य केले. १८६२ मध्ये तो व्हिएन्ना येथे स्थायिक झाला. तेथेच त्याने कॅन्सरच्या विकाराने निधन झाले. आयुष्यभर अनेक स्त्रियांच्या सहवासात येऊनही तो अविवाहितच राहिला.

स्वच्छंदतावादी मनोवृत्तीबरोबरच त्याला गतकालीन पारंपारिक संगीतप्रकारांचेही आकर्षण होते व अभिजाततावादी प्रवृत्तींची ओढ होती. अभिजात संगीतप्रकारांच्या साच्यांचाच योहानेस ब्राम्झउपयोग त्याने अधिक भावपूर्णतेने केलेला दिसून येतो.⇨सिफनी संगीतप्रकाराच्या रूढ साच्याला बाजूला न सारता त्यात त्याने भावनात्मकता आणल्यामुळे ‘सिंफनिक पोएम’ वा ‘टोन पोएम’ (काव्य वा अन्य साहित्यप्रकार यांपासून स्फूर्ती घेऊन केलेली वाद्यवृंदरचना. हा प्रकार लिस्टने निर्माण केला.) रचण्याच्या वाटेस तो गेला नाही. त्याचप्रमाणे आवाहकतेसाठी एखाद्या दृश्याचा वा घटनेचा आधार घेऊन संगीताने आपली परिणामकारकता वाढवावी हेही त्याला मान्य नसल्याने, नाट्यात्म वा कथनात्म आविष्कारांस पूरक म्हणून संगीताचा वापर करणाऱ्या ‘प्रोग्रॅम म्यूझिक’ सारख्या प्रकारांपासूनही तो दूर राहिला. या तऱ्हेने निखळ शुद्ध संगीताद्वारे संगीताने अभिप्रेत परिणाम साधला पाहिजे, या भूमिकेतून त्याने आपल्या रचना केल्या, असे म्हणता येईल. यामुळे त्यावर शुष्क, भरताड इ. टीकाही झाली.

 

सिंफनी पद्धतीच्या चार संगीतरचना, दोन पियानो काँचेर्टो, एक व्हायोलिन काँचेर्टो शिवाय अनेक गीते इ. असा ब्राम्झचा रचनासंभार आहे.

संदर्भ :  1. Evans, Edwin,Historical Descriptive and Analytical Account of the Entire Works of Johannes Brahms, 4 Vols.,London, 1912 – 1936.

            2. Geiringer, Karl, Brahms : His Life and Work, New York, 1947.

रानडे, अशोक