गोहरजान : (सु. १८६७–सु. १९२७). प्रसिद्ध ठुमरी-गायिका. रामपूरवाले नजीरखाँ, ठुमरी-गायक प्यारासाहेब व मौजुद्दीनखाँ या उस्तादांकडे तिने संगीताची साधना केली. पन्नाशीनंतर ती म्हैसूर दरबारी राहिली. तिथेच तिचे निधन झाले.

‘पुरब बाज’ म्हणून प्रख्यात असलेल्या हिंदुस्थानी गायनपद्धतीमध्ये गोहरजानचे गायन आदर्श मानले जाई. ठुमऱ्या, भजने, कव्वाल्या यांसारख्या ललित संगीतावर तिचा विशेष भर होता. अतिशय गोड, सुरेल व मोकळा आवाज, बोलांचा स्वच्छपणा व लाडिकपणा आणि मुख्यत्वेकरून भावपूर्णता हे तिच्या गायनाचे गुणविशेष होत. हावभावांसहित ठुमरी पेश करण्यात तिची विशेष प्रसिद्धी होती. तिने स्वतः अनेक ठुमऱ्या, गझला व भजने रचली. कलकत्ता, मद्रास, मुंबई, पुणे इ. शहरांतून तिचे जलसे होत. ज्या प्रदेशात गावयाचे, त्या प्रदेशाच्या भाषेतील एक तरी लोकप्रिय पद मैफलीमध्ये म्हणावयाचे, हे तिचे वैशिष्ट्य होते. मराठी श्रोत्यांसाठी ‘वद जाऊ कुणाला शरण’ सारखी नाट्यगीते ती म्हणत असे. तिच्या गाण्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका लोकप्रिय होत्या. तिचे अनुकरण करणारे नवोदित गायकही पुष्कळ होते. 

देसाई, व. शां.