लता मंगेशकरमंगेशकर, लता : (२८ सप्टेंबर १९२९ – ). अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका. भारतीय चित्रपट-संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. इंदूर येथे जन्म. मराठी रंग भूमीवरील तेजस्वी गायकनट मास्टर दीनानाथ ह्यांच्या ह्या ज्येष्ठ कन्या होत. दीनानाथांच्या गायनकलेचा वारसा त्यांना लाभला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ च्या रंगमंचावर बालवयात लता मंगेशकरांनी छोट्या संगीत भूमिकाही केल्या. भावबंधन या नाटकातील ‘कुसूम’ च्या भूमिकेत ‘लाडकी असेच थोर’ या ‘देसकारा’ तील पदाला त्यांना हमखास टाळी पडे. ‘नवयुग’ व ‘प्रफुल्ल’ या मराठी चित्रसंस्थांच्या बोलपटांत त्यांनी अशाच छोट्या संगीत भूमिका केल्या. पहिली मंगळागौर हा त्यांचा पहिला चित्रपट. यातील ‘मनू’ च्या भूमिकेत ‘नटली चैत्राची नवलाई’, किंवा ‘श्रावण आला तरूतरूला’ अशा समूहगीतांत त्यांचा आवाज होता. किती हंसाल! वा चित्रपटातील ‘नाचू या गडे खेळू सारी’ हे त्यांचे स्वतंत्र ध्वनिमुद्रित गीत होय. सुप्रसिद्ध कथ्थक नर्तकी रोहिणी भाटे यांच्यासाठी आपकी सेवामें या चित्रपटात त्यांनी म्हटलेले ‘पा लागू कर जोरीरे’ हे त्यांचे हिंदी चित्रसृष्टीतील पहिले पार्श्चगीत होय.

मास्टर दीनानाथ यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होत.

अनेक ख्यातनाम संगीतकारांची, सु. १,८०० वर चित्रपटांतील विविध रंग-ढंगांची सु. २२ भाषांतील गाणी त्यांनी म्हटलेली असून, त्यांची संख्या सु. २५ ते ३० हजारांच्या घरात सहज जाते. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.

लता मंगेशकरांच्या अतीव सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी रसिक श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या गानपद्धतीचा जबरदस्त प्रभाव पार्श्वगायनावर व सुगम संगीतावर पडलेला असून त्यांच्यामुळे पार्श्वगायनाला विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. शास्त्रीय संगीताधिष्ठित भावरम्य अशा त्यांच्या शैलीचा नवा संप्रदाय निर्माण झाला आहे. त्यांच्या आवाजाच्या असामान्य उंची-खोलीमुळे, लवचिकपणामुळे, अलौकिक फिरतीमुळे चित्रपट-संगीतकारांना नवनवीन प्रयोग करता येणे शक्य झाले व परिणामी त्या संगीताच्या कक्षा व सौंदर्य वाढले. ‘काळी दोन’ किंवा ‘पांढरी चार’ या उंच स्वरात त्या गात असल्याने, द्वंद्वगीतामध्ये पुरूष गायकाला आपल्या स्वाभाविक स्वरात गाणे शक्य होते आणि ते गीत अधिक गोडवा व परिणाम साधते. गीताचा प्रसंग समजून घेऊन, काव्यार्थ लक्षात घेऊन, शब्दांची योग्य ती फेक साधून तसेच भावाभिव्यक्तीसाठी आवाज कमीअधिक संस्कारित (मॉड्यूलेट) करून त्या गात असल्यामुळे त्यांच्या गीताला एक आगळेच सौंदर्य व दर्जा प्राप्त होतो.

लता मंगेशकर या स्वयंसिद्ध आलौकिक प्रतिभेच्या कलावती आहेत. संगीतातील सर्व प्रकारचे अलंकार आपल्या अलौकिक आवाजातून उमटवण्याची त्यांची क्षमता अजोड आहे. त्यांची ग्रहणशक्ती असामान्य कोटीतील आहे. शब्दार्थापलीकडील तरल संवेदनेच्या भावविश्वात नेणारा अलौकिक सूर, त्या त्या भाषेच्या वैशिष्ट्यानुसार व प्रकृतिधर्मानुसार केलेले स्वच्छ, स्पष्ट व अर्थपूर्ण शब्दोच्चार, लयीची सखोल व अत्यंत परिपक्व जाण, पार्श्वगायनाच्या आणि ध्वनिग्राहकाच्या तांत्रिक अंगांवर विलक्षण प्रभुत्व इ. दुर्मिळ गुणांचा संगम लता मंगेशकरांच्या अद्भुत गायनात झालेला आहे.

लता मंगेशकर यांना राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत : ‘पद्मभूषण’ ‘आस्थान विद्वान’ (तिरूपती देवस्थान) ‘स्वर भारती’ (श्री शंकराचार्य) ‘कलाप्रवीण’ (जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्रीय विद्यापीठ) ‘डी. लिट्.’ (शिवाजी विद्यापीठ) ‘सूरश्री’ (लंडनच्या रॉयल ॲल्बर्ट हॉलमधील यशस्वी कार्यक्रमाबद्दल मिळालेला किताब) ‘स्वरलता’ (आचार्य प्र. के. अत्रे) इत्यादी. त्यांना मिळालेल्या पारितोषिकांत राज्य शासनाचे पारितोषिक, फिल्म फेअर या चित्रपट नियतकालिकाची चार पारितोषिक, ‘फिल्म क्रिटिक’ ची पाच व ‘बेंगॉल जरनॅलिस्ट असोसिएशन’ ची सहा पारितेषिके, सूरसिंगार संसदेचे ‘तानसेन’ व ‘रसेश्वर’ ही पारितोषिक इत्यादींचा अंतर्भाव होतो. लंडनच्या ‘ई. एम्. आय.’ कंपनीतर्फे त्यांच्या वीस हजारांवर ध्वनिमुद्रिका निघाल्याबद्दल त्यांना ‘सुवर्ण ध्वनिमुद्रिका’ भेट देण्यात आली असून, हा बहुमान मिळवणाऱ्या लता मंगेशकर या पहिल्याच भारतीय कलाकार होत. भारतातील प्रमुख शहरी त्यांचे चित्रपट संगीताचे यशस्वी कार्यक्रम झाले आहेत, तसेच त्यांचे परदेशांतील संगीत-दौरेही अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत.

लता मंगेशकर या कोल्हापूरच्या ‘जयप्रभा स्टुडिओ’ च्या संचालिका असून त्या ‘सुरेल चित्र’ या संस्थेच्या निर्मात्या आहेत. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी मराठी चित्रपटांना वैशिष्ट्यपूर्ण संगीतही दिले आहे.

संदर्भ : शेळके, शांता ज. लिमये, वृंदा सरोजिनी, संपा. लता, मुंबई, १९६७.

जठार, प्रभाकर