पदम्: कर्नाटक संगीतातील विद्वत्ताप्रचुर रचना. पद ही संज्ञा मुळात भक्तिगीताची वाचक होती आणि ह्याच अर्थाने आपण ⇨ पुरंदरदासाची (सु. १४८०–१५६४) कन्नड पदे आणि मुत्तू तांडवरची तमिळ ‘पदम्’ ह्यांचा निर्देश करतो. आधुनिक काळातील संगीताच्या भाषेत ‘पद’ ही संज्ञा नृत्य-संगीतक्षेत्रातील रचनेला अनुलक्षून योजतात आणि तीत नायक-नायिकेसंबंधीच्या विविध अंगांचा आविष्कार असतो. पद हा जरी वस्तुतः नृत्यप्रकार असला, तरी त्याच्या सांगीतिक गुणवत्तेमुळे संगीताच्याही कार्यक्रमामध्ये पद गाईले जाते. पदम्‌चे आदर्श गायन हे धीम्या लयीतील ‘नाग-आलापना’ प्रमाणे दरबारी, उदात्त व प्रभावी असते. पदाचे वर्णन ‘संगीतात्मक स्वगत’ असे करता येईल. पदाचे जर यथार्थ ज्ञान करून घ्यावयाचे असेल आणि त्याचे मर्म जाणावयाचे असेल, तर नायक-नायिका लक्षणांचे आणि नायक-नायिकांच्या संबंधांचे व मनोवस्थांचे काही ज्ञान करून  घेतले पाहिजे [⟶नायक-नायिका भेद].

भारतीय संस्कृतीचा एक ठळक लक्षणीय विशेष म्हणजे शृंगाररसाच्या विकासाची परिसीमा. प्रेमाच्या विषयात गीतांचे एवढे वैपुल्य का, याचा ह्याने उलगडा होतो. खरे पाहता, भक्ती या विषयाइतकीच शृंगार याही विषयावर गीतरचना आहे. या दोन विषयांमुळेच भारतीय रचनाकारांना उदंड सामग्री मिळालेली आहे आणि या सामग्रीने स्फूर्तीही लाभलेली आहे. भानुदत्तकृत शृंगाररसमंजरी  यांसारख्या प्रमाणभूत ग्रंथांत नायक-नायिकांच्या अनेकविध प्रकारांच्या वैशिष्ट्यांचे सूक्ष्म आणि तपशीलवार वर्णन केलेले आहे. नायक-नायिकांच्या भिन्नभिन्न प्रकारांची नावेही त्यांत दिलेली आहेत. पद गाण्यापूर्वी त्यातला प्रसंग कोणता, ते कोणी म्हटलेले आहे आणि कोणाला उद्देशून, याचे प्रथम नीटस चित्र गायकाने आपल्या मनापुढे आणले पाहिजे. काही पदे नायकाने, काही नायिकेने, तर काही तिच्या सखीने गाइलेली असतात. ⇨ क्षेत्रय्या (१६००–६०) या सर्वश्रेष्ठ पदरचनाकाराने तर शृंगाररसाचे प्रायः जेवढे म्हणून प्रसंग कल्पिता येतील, त्या सर्वांवर पदे रचली आहेत.

पदांमध्ये गर्भित असलेले भाव नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये यथायोग्य अभिनयाच्या द्वारे चांगले व्यक्त करता येतात. उदा., एखाद्या पदामध्ये ‘सामिकि सरि एव्वरे ना’ (माझ्या स्वामीच्या बरोबरीचा कोण आहे बरे?) असे तेलुगूमधील वाक्य असले, तर त्याचा गर्भित अर्थ अभिनयाने सूचकपणाने, पुढीलप्रमाणे व्यक्त करता येईल : (१) ज्ञान आणि शहाणपणा यांत माझ्या स्वामीच्या बरोबरीचा कोण आहे बरे? (२) औदार्य आणि दातृत्व यांत माझ्या स्वामीच्या तुलनेचा कोण आहे बरे? (३) व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्य यांत माझ्या स्वामीच्या जोडीचा कोण आहे बरे? (४) शौर्य इ. यांत माझ्या स्वामीच्या बरोबरीचा कोण आहे बरे?

कीर्तनात स्तोत्राच्या द्वारे ईश्वरप्राप्ती करून घेण्याचा यत्न असतो, तर पदात तेच ध्येय प्रेमाच्या द्वारे साध्य करून घेण्याचा प्रयत्न असतो. ‘मधुरभावा’ ने ईश्वरप्राप्ती ही हिंदू मनाची एक मूलभूत बैठक आहे. पदांमध्ये जे विषय आढळतात, त्यांतील काही असे : जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य, प्रेमाची काव्यात्मता, आध्यात्मिक प्रेमाचा आदर्श, प्रेमापोटी येणारी दुःखे, सौख्याविषयीची उत्कंठा, ध्येयप्राप्ती न झाल्याचे दु:ख इत्यादी. पदात ‘धातु’ चा (स्वरावलीचा) भाव व ‘साहित्या’ चा भाव यांचा एकमेकांशी तोल सांभाळला जाऊन बंदिशीच्या एकात्मतेला ते पूरक ठरतात. काही पदांमधील साहित्य अर्थदृष्ट्या ओढाताणीच्या कल्पनांचे असते. बहुतेक पदांमध्ये ‘गौरव-शृंगारा’ चे म्हणजे उदात्त प्रेमाचे वर्णन असते.

नायक-नायिका भावाच्या द्वारे ईश्वरपूजन हा एक ‘श्रेष्ठ मार्ग’ आहे, ही धारणा मध्ययुगामध्ये व उत्तरमध्ययुगाच्या प्रारंभीच्या काळामध्ये फार प्रभावी आणि स्थिर झाली. याच काळामध्ये प्रायः पदांची रचना झाली.

सर्व उदात्त स्वरूपाची पदे मधुराभक्ती या विषयावरची आहेत आणि ती श्लिष्ट अर्थाची आहेत. एक बाह्य शृंगाराचा अर्थ आणि दुसरा आंतरभक्तीचा तत्त्वज्ञानपर अर्थ. नायक, नायिका व सखी ही अनुक्रमाने परमात्मा, जीवात्मा (भक्त) व सदुपदेशाने भक्ताला मुक्तिमार्गाकडे नेणारा गुरू यांची प्रतीके होत. ⇨ माणिक्कवाचगर (सातवे शतक) आणि ⇨ आंडाळ (सु. आठवे शतक) यांची मधुराभक्तीच्या विषयावर अनेक पदे आहेत.

ईश्वराच्या शोधाला निघालेल्या भक्ताच्या भावना व अनुभव आणि प्रियतमाविषयीच्या (नायकाविषयीच्या) एखाद्या प्रेयसीच्या (नायिकेच्या) भावना आणि अनुभव हे एकमेंकांना संवादी असल्यामुळे त्यांना पदांमध्ये चिरंतन स्वरूप दिले आहे. पदांची भाषा सोपीच पण अर्थनिर्भर असते.

पदाचे ⇨ पल्लवी, ⇨ अनुपल्लवी आणि ⇨ चरण असे तीन भाग असतात. कधीकधी त्यात तीन वा चार चरण असतात. त्यास ‘संगति’ (स्वरवैचित्र्ये) नसतात, तसेच संक्षिप्त आणि अर्थखचित ‘संचार’ ही नसतात. संगती जर आढळल्याच तर ती खास उत्तरकालीन भर मानावी लागेल. संगीत संथ, उदात्त स्वरूपाचे आणि सहजवाही असते (तमिळमधील काही पदांची लय ‘मध्यमकाला’ त म्हणजे मध्यलयाची असते). शब्दकळा साधी. पदाच्या रचनेत ‘रागभाव’ परिपूर्ण असतो आणि शब्द व संगीत यांचा सुमेळ आरंभापासून शेवटपर्यंत सतत साधलेला असतो. चरणांचेही संगीत असेच असते. रचनेच्या साहित्यात नित्य प्रचारातील शब्द असतात.  रचनाकाराचे नाव पल्लवी, अनुपल्लवी किंवा शेवटचा चरण यांत गुंफलेले असते. काही पदांमध्ये ‘स्वराक्षर’ आणि अंत्यप्रास यांसारखे संगीतात्मक व काव्यात्मक सौंदर्यघटकही आढळतात. उदा., नीलांबरी रागातील ‘एटुवण्टिवाडे’ हे पद.

संगीताच्या गायनप्रकारांमध्ये पदांना त्यांचा संगीताशय आणि साहित्यभाग या दोन्हींमुळे एक अनन्यसाधारण स्थान आहे. ‘कृती’ मध्ये संगीताला प्राधान्य असते, तर भक्तिगीतांमध्ये साहित्य हेच प्रधान असते. पदांमध्ये मात्र धातू (स्वरावली) आणि ‘मातु’ (साहित्य) या दोहोंनाही समतोल महत्त्व असते.

पदांमध्ये क्रोध, उत्कंठा, मत्सर, आवेश, वैफल्य, आत्मताडन यांसारखे भाव प्रभावीपणाने रेखाटले जातात.

संदर्भ : Sambamoorthy, P. South Indian Music, Book III, Madras, 1964.

सांबमूर्ती, पी. (इं.)  मंगरूळकर, अरविंद (म.)