संगीत, कर्नाटक : दक्षिण भारतातील वैशिष्ट्यपूर्ण संगीतपद्धती. ही दाक्षिणात्य वा कर्नाटक संगीत म्हणून ओळखली जाते. भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी व कर्नाटक या पद्धती आपापली पृथगात्म व आगळीवेगळी वैशिष्टये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत आल्या आहेत. दक्षिण भारत हा प्राचीन काळापासून संगीताबद्दल विख्यात आहे. खुद्द भरताने दाक्षिणात्यांच्या संगीतविषयक प्रतिभेबद्दल गौरवोद्‌गार काढले आहेत. एकाच संगीताच्या कर्नाटक आणि हिंदुस्थानी अशा दोन पद्धती या खंडप्राय देशात विकसित व्हाव्यात, हे या देशाच्या सांस्कृतिक मोठेपणाचेच लक्षण आहे. विशेष असे, की या दोन्ही पद्धतींचा उगम एकच आहे आणि परिपोषही एकाच संगीताने झालेला आहे. हिंदुस्थानी संगीताची उत्पत्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे. मोगल काळात अनेक इराणी आणि अरबी संगीत कलाकारांना राजसभेमध्ये निमंत्रित केले जात असे. हे कलाकार आपल्या स्वतःच्या विशिष्ट शैलीमुळे काही पमाणात उत्तर हिंदुस्थानी संगीतपद्धतीचा विकास घडवून आणण्याला आणि तिला वळण देण्याला कारणीभूत झाले. परंतु हिंदुस्थानी पद्धतीच्या संगीताच्या विकासाला जी कारणे घडली, त्यांचा दक्षिण भारतात अभाव असल्यामुळे त्यांचा प्रभाव तेथे पडण्याचे कारण नव्हते. त्याचे फलित असे, की दक्षिण भारतात प्राचीन  संगीत हेच विकसित होत आले. यात लक्षणीय गोष्ट अशी, की वरील दोन संगीतपद्धती स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्यानंतरही अनेक शतके संगीतातले विद्वान हिंदुस्थानी संगीतपद्धती आणि कर्नाटक संगीतपद्धती अशा दोन प्रकारच्या संगीतांचा पृथक् निर्देश न करिता केवळ संगीत गृहीत धरूनच बोलत राहिले.

दक्षिण भारताला अभिमान वाटावा असा संगीताचा अविच्छिन्न इतिहास आहे. तेथील राजेरजवाडे आणि जमीनदार यांनी संगीताला सतत आश्रय दिलेला आहे. या उदार आश्रयामुळे संगीताचे गंथ आणि संगीतरचनांच्या अजोड कृती निर्माण होण्याला प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीत्या हातभार लागलेला आहे. तंजावर, म्हैसूर आणि त्रावणकोर ही तर संगीताची प्रमुख केंद्रस्थाने होतीच पण शिवाय बोब्बिली, विजयानगर, पिठापुरम् , वेंकटगिरी, कारवेटनगर, रामनाड, पुदुकोट्टैई, उडैयारपालयम् , शिवगंगा आणि एट्टियपुरम् ही गौण केंद्रस्थानेही होती. यांत मद्रासचे (चेन्नई) स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणत्याही राजेशाही किंवा सरंजामी सत्तेखाली स्थान नसतानाही गेल्या दोनशे वर्षांत मद्रास हे संगीतविद्येचे एक प्रमुख पीठ म्हणून विकसित झाले आहे. मणलि मुदलियारांचे कुल हे संगीताचे आश्रयदाते कुल म्हणून गेली कित्येक शतके प्रसिद्घ आहे.

दक्षिण भारताच्या संगीताच्या नकाशामध्ये तंजावरला एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व आगळे स्थान आहे, कारण कर्नाटक संगीताचे सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत संगीतकार तेथे गेली तीनशे वर्षे वावरत आले आहेत. तंजावरमध्ये आणि तंजावरच्या अवतीभवती राहणाऱ्या संगीतातील रचनाकारांनी तेलुगू भाषेचा आपल्या संगीतकृतींसाठी जो उपयोग केला, त्याने संगीतदृष्ट्या त्या भाषेला एक वैभव व नवजीवनच लाभले.

संगीताच्या दुनियेला ७२ मेलकर्त्यांची योजना दिली, ती कर्नाटक (दाक्षिणात्य) संगीतानेच. ज्या बारा स्वरांच्या सप्तकावर ही ७२ मेलकर्त्यांची मांडणी आधारलेली आहे, ते सर्व प्रसिद्ध असल्याने तौलनिक संगीतशास्त्राच्या दृष्टीने ही ७२ मेलकर्त्यांची स्वरसप्तके महत्त्वाची ठरतात. या मांडणीचा प्रथम उपक्रम तंजावर निवासी ð व्यंकटमखी (सतरावे शतक) या संगीतशास्त्रकाराने केला. ७२ मेलकर्त्यांच्या या मांडणीतूनच औडव-षाडव–संपूर्ण (औडव = पंचस्वरी रचना, षाडव = षट्स्वरी रचना, संपूर्ण = सप्तस्वरी रचना) स्वरूपजन्य ३४,७७६ अवस्थान्तर-सप्तके निघाली. शिवाय स्वरान्तरप्रकाराचे (= चतुःस्वरी) ९२,१६० राग आहेत, ते वेगळेच. हे सर्व मिळून होणारी अन्य रागांची संख्या १,२७,००८ इतकी होते. या संख्येत ७२ जनक-रचनाही समाविष्ट आहेत. या रागरचनांपैकी जवळजवळ एकपंचमांश रागरचना एका अथवा अनेक मेलांत आवृत्त होतात. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे इष्ट होईल ती ही की, अन्य रागांच्या या अवाढव्य संख्येत वकरागांचा आणि ð भाषांगरागां चा अंतर्भाव नाही.

दक्षिण भारताच्या विद्वानांनी ७२ मेलकर्त्यांच्या या मांडणीव्यतिरिक्त दुसऱ्याही मेलांच्या पद्धती प्रतिपादिलेल्या आहेत. सोमनाथाने (सु. १६०९) आपल्या रागविबोधा त ९६० मेलांची एक योजना मांडली, मेलपद्धतीची ही कल्पना वस्तुतः त्यानेच प्रथम सुरू केली. मेलाधिकार लक्षणांच्या या योजनेत ४,६२४ मेलांची पद्धती आहे. रागविबोधकर्त्याने सप्तकातील चोवीस श्रूती ही चोवीस स्वरस्थाने म्हणून कल्पून ती विकसित केली आहेत. ५,१८४ (७२ × ७२) शुद्धमिश्र मेलांची ही कल्पना प्रस्तुत नोंदलेखक पी. सांबमूर्ती यांनी साउथ इंडियन म्यूझिक (भाग ४ प्रकरण आठ) या गंथात सविस्तर मांडली आहे.

या व्यतिरिक्त कर्नाटक संगीतात पुढील विशेष आढळतात : (१) ज्यात प्रतिमध्यम पंचमाचे स्थान घेतो असे छत्तीस विकृत पंचम मेल यांतील प्रतिमध्यम किंवा तीव्र मध्यम सोल्फा लेटर याच्यासह गायिला जातो. (२) ज्यात आरोहण हा शुद्धमध्यम मेल आणि अवरोहण हा त्याचा प्रतिसंवादी प्रतिमध्यम मेल आहे, असे छत्तीस शुद्ध-प्रतिमेल. (३) ज्यात आरोहण हा प्रतिमध्यम मेल आणि अवरोहण हा त्याचा प्रतिसंवादी शुद्धमध्यम मेल आहे असे छत्तीस प्रति-शुद्ध मेल.

कर्नाटक संगीताची तालपद्धती विस्तृत आहे. परंपरेने मान्यता पावलेल्या १०८ तालांची जोड काही विशिष्ट ðपल्ल्वि रचनांमध्ये आणि अरूण गिरिनातरच्या तिरूप्पुगळ भक्तिगीतांमध्ये टिकवून धरल्याचे आढळून येते. शुलादी सप्ततालांमधून लघूच्या पाच प्रकारांमुळे ३५ प्रकार सिद्घ होतात. पंचगतिभेदामुळे या पस्तिसांचे १७५ प्रकार होतात. पाच लघूंचा   जो आणखी एक गण आहे तो असा : दिव्यलघु (सहा मात्रा), सिंहलघु (आठ मात्रा), वर्णलघु (दहा मात्रा), वादयलघु (बारा मात्रा) व कर्नाटक लघु (सोळा मात्रा). ह्या लघूंचा पूर्वोक्त शूलादी सप्ततालांशी मेळ घातला, म्हणजे आणखी पस्तीस ताल निर्माण होतात आणि त्यांचा पुन्हा पंचगतिभेदांशी योग झाल्याने आणखी १७५ ताल निर्माण होऊ शकतात. यांच्या व्यतिरिक्त अनेक पंडिती प्रकारांच्या पल्ल्वींमध्ये आणि दाक्षिणात्य लोकसंगीतामध्ये वापरात आलेले संकीर्ण ताल वा संमिश्र आकृतिबंधांचे ताल विद्यमान आहेत ते वेगळेच. दक्षिण भारतातील संगीतसभांमध्ये अभिजात संगीताचे अनेक प्रकार ऐकावयास मिळतात. या संगीतसभांमध्ये गाणाऱ्या-वाज-विणाऱ्या कलावंतांकडून तानवर्ण, ⇨ कृति,रागमालिका, पदे  [→ पदम् ], ⇨जावळि,तिल्लाना, तसेच राग-आलायन, तान आणि पल्ल्वी यांचा आविष्कार आढळून येतो. महाविदयानाथ अय्यरकृत ७२-मेली रागमालिका आणि रामस्वामी दीक्षितरकृत १०८ रागतालमालिका या दोन संगीतरचना म्हणजे सर्वात प्रदीर्घ रचना होत. या रचनांच्या नुसत्या आविष्काराला प्रत्येकी दोन तासांहून जास्त अवधी लागतो. धार्मिक स्वरूपाच्या संगीतातले प्रकार देवालयांमध्ये आणि भजनी फडांमध्ये ऐका-वयाला मिळतात. वैदिक सूक्तांव्यतिरिक्त दक्षिण भारताच्या शैव-वैष्णव देवालयांमध्ये धार्मिक विधींच्या वेळी ⇨ तेवारम् आणि ‘दिव्यप्रबंध ’ ऐकावयाला मिळतात तर भजनांमध्ये ‘तेवारम्’, ‘तिरूप्पुगळ’, ‘दिव्यनाम-कीर्तन’, ‘उत्सव-संप्रदायकीर्तन’, ‘चूणिक’, ‘नामावली’, ⇨ अष्टपदी, ‘तरंग’, ‘अभंग’, ⇨ भजन आणि ‘अरूट्पा’ यांसारखे धार्मिक संगीताचे प्रकार ऐकावयास मिळतात. कालक्षेपांमध्ये संगीतान्वित धर्मप्रचाराचा भाग असतो. अशा कालक्षेपांत पंचपदी, निरूपणम् (= गीतकथा), तसेच साकी, दिंडी, दोहरा आणि ओवी यांसारखे प्रकार ऐकावयास मिळतात.


दक्षिण भारताचे लोकसंगीत संपन्न असून त्यात कुम्भि, वुण्णि, ओडम् , कावडिचिन्दु, नौण्डिचिन्दु, वळिनडैचिन्दु आणि लावणी हे प्रकार आहेत. संगीत व साहित्य यांच्या दृष्टीने पोवाडे आणि विवाहगीतेही वेधक आहेत. यांव्यतिरिक्त ðअभ्यासगाना च्या क्षेत्रातील अलंकार, गीते, ⇨ स्वरजति, स्वरपल्ल्वि व तानवर्ण हीदेखील तशीच मनोवेधक आहेत.

वादये आणि वादयवादन याही क्षेत्रात दक्षिण भारताला एक आगळे आणि महत्त्वाचे स्थान आहे. वीणावादनाच्या संदर्भातही एक सविस्तर आणि कौशल्यपूर्ण असे वादन करण्याचे तंत्र दक्षिण भारतात विकसित झालेले आहे, तद्वतच चक्र-बंधम् , नागबंधम् आणि बन्धतानम् अशा विभिन्न मोहक शैलीही तिथे रूढ झालेल्या आहेत. गोट्टुवादयम् आणि नागस्वरम् यांच्या स्वरांची जशी एक वैशिष्ट्यपूर्ण जात जाणवते तसेच त्यांच्या वादनाचे तंत्रही विस्तृत कलाकुसरीचे आहे. ⇨ मृदंग,तविळ,गोट्टुवादयम् ,घटम् , ⇨ कंजिरा, ढोलक, किरिकट्टि, शुद्घमद्दलम् , पंचमुख वादयम् , चेंडा, तिमिल आणि इड्डक यांसारख्या तालवादयांची एकेक स्वतंत्र शैली विकसित झाली आहे. यांतल्या कोणत्याही तालवादयामध्ये सिद्घी प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या-त्याच्या कमानुसारी अशा तालपाठमाला उपलब्ध आहेत. इड्डक हे तर एक वैशिष्ट्यपूर्ण असे मिश्र संगीतवादय आहे. इड्डकाच्या एका चर्ममुखाच्या व्यासातून ज्या दोन समांतर ताती जातात, त्या तातींची कंपने आणि चर्ममुखाची कंपने यांचा एकवट आवाज हा इड्डकाचा आवाज होय. चतुर वादक इड्डक वाजविताना चर्ममुखाचा ताण उणा-अधिक करून कमीअधिक उंचीचे स्वर त्यातून काढतात ते कसब अत्यंत लक्षणीय आहे. प्राचीन वाङ् मयात ज्याला उदकवादय म्हटलेले आहे, तो जलतरंग वाजविताना कसबी वादक मूठ असलेल्या एका लाकडी गोलकाच्या सहाय्याने सुंदर कंपित गमक काढतात. जलतरंगाच्या भांड्यावर आघात करताच डाव्या हातातला लाकडी गोलक त्या भांड्यातल्या पाण्यात बूडवून तो वरखाली हलवितात आणि हे अनेकवार करतात. असा प्रकार किती वेळा, किती कालावधीपर्यंत, कोणत्या लयीने करावयाचा आणि किती खोलीपर्यंत तो गोलक पाण्यात बुडवावयाचा, हे त्या विशिष्ट रागात नियमानुसार कोणत्या प्रकारचे गमक रूजू होऊ शकते, यावर अवलंबून असते.

लक्षणीय स्वरूपाची आणखी दोन मिश्र वादये आहेत : पहिले ‘मगुडि नागस्वरम्’ आणि दुसरे ‘जलेक्टोमोनियम’. पहिल्यामध्ये ‘मगुडि’ (= पुंजी) आणि ⇨ सनई एकजीव केलेली असतात, तर दुसऱ्यात जलतरंगाला चाव्या जोडून त्या विद्युत् यंत्रणेने वाजवितात.

लोकसंगीतात बहुविध स्वरूपाची पुष्कळ तालवादये प्रचलित आहेत. पुढील वादये ही वादयनिर्मितीच्या क्षेत्रातील संशोधनाची फळे होतः ‘ स्ववादित ’ (= स्वयंचलित) तंबुरा, वैदिक ल्यूट, नालिकमुरली, प्रदर्शनवीणा, ज्याच्या दांडीचा काही भाग भोपळ्यामध्ये सरकविता येतो असे गोट्टुवादयम्, टुणटुणिया तंबुरा, तालयंत्र, करवती तंबुरा, समष्टिश्रूति-पेटी, स्वयंभू श्रूतिपेटी, भरत ð व्हायोलिन आणि कळकांच्या पट्ट्यांचे व्हायोलिन [→ वादय व वाद्दवर्गीकरण].

दाक्षिणात्य संगीतामध्ये कित्येक नामांकित संगीतरचनाकार आणि लक्षणकार निर्माण झालेले आहेत. तिरूपतीचे ताळ्ळपाकम् रचनाकार (पंधरावे शतक) ⇨ पुरंदरदास (१४८४-१५६४), क्षेत्रज्ञ (सतरावे शतक) आणि ⇨ त्यागराज (१७६७-१८४७) हे बहुप्रसू संगीतरचनाकार असून त्यांच्या अद्वितीय कृती आज उपलब्ध आहेत. यांतल्या प्रत्येकाच्या सहस्रावधी रचना आहेत. ताळ्ळपाकम् रचनाकारांच्या गीतरचना सुदैवाने तामपटांवर कोरलेल्या उपलब्ध झाल्या आहेत. हे तामपट तिरूपतीला आजही पहावयास मिळतात. कर्नाटकाच्या हरिदासांनी कन्नड भाषेत कितीतरी धार्मिक स्वरूपाची पदे रचलेली आहेत. पदरचनाकारांत क्षेत्रज्ञ हा सर्वांत महान होय. सारंगपाणी, परिमळरंग, कस्तुरिरंग, मुव्वलूर सभापति अय्यर आणि धनम् सीनय्या हे अन्य पदरचनाकार होत. धनम् कृष्णय्यर आणि वैदी स्वरणकोइल सुब्राम अय्यर हे दोघे तमिळनाडूमधील श्रेष्ठ पदरचनाकार होत. भद्राचलम् रामदासांनी तेलुगूमध्ये सुंदर कीर्तने रचिली आहेत.

त्यागराज ही कर्नाटक संगीतातली सर्वांत महनीय व्यक्ती होय. ते अष्टपैलू संगीतरचनाकार आणि गायक होते. कृती या प्रकाराच्या रचनेला त्यांनी सर्वांगपरिपूर्ण स्वरूप दिले. संगति या नावाचा जो तंत्रसौंदर्याचा संगीतप्रकार आहे, त्याचे ते जनक होत. संगति म्हणजे एखादया संगीतवस्तूभोवती गुंफलेली वैचित्र्यपूर्ण रचना. एखादया रागाचे विविध पैलू व्यक्त करणे, किंवा गीत-साहित्यातील सुप्त कल्पनांवर भर देणे, हे या प्रकारच्या रचनेचे प्रयोजन.

 

त्यागराजाने पंडिती वळणाच्या कृती, कीर्तने, दिव्यनामकीर्तने आणि उत्सवसंप्रदाय-कीर्तने तर रचली आहेतच पण त्यांव्यतिरिक्त त्याने तेलुगूमध्ये प्रल्हादभक्तिविजयम्, नौकाचरित्रम् आणि सीतारामविजयम् अशी तीन  स्वरनाटये वा संगीतिका रचिल्या आहेत.

 ⇨ मुथ्थुस्वामी दीक्षितर (१७७६-१८३५), ⇨ श्यामशास्त्री (१७६२-१८२७), रामस्वामी दीक्षितर, ⇨ स्वाती तिरूनल, पैडाल गुरूमूर्ति शास्त्री, पचिमिरियम् आदियप्पय्य, पल्ल्वी गोपालय्यर, सुब्बराय शास्त्री, वीणा कुप्पय्यर, पल्ल्वी शेषय्यर, मुथु तांडवर आणि मारिमुथू पिळ्ळै हे आणखी काही प्रसिद्घ रचनाकार होत. गोपालकृष्ण भारती याने तमिळमध्ये विपुल कीर्तने लिहिलेली आहेत. त्याने काही स्वरनाटयेही लिहिलेली आहेत. त्यांतील नंदनार-चरित्रम् हे त्याचे गाजलेले स्वरनाट्य होय. अरूणा-चलक्कविरायर आणि कवी कुंजर भारती यांनीही तमिळमध्ये स्वरनाटये रचिली आहेत. रामस्वामी शिवन् यांसारख्या रचनाकारांनी गेयचरित्रेही लिहिलेली आहेत. गेयचरित्रे ह्या गीतबद्ध-पद्यबद्ध कथा असून त्यांचा प्रवचनांच्या कामी उपयोग होतो. ⇨ सुबह्मण्य भारती हा तमिळमधील सर्वश्रेष्ठ रचनाकार होय.

नारायण तीर्थांनी कृष्णलीलातरंगिणी नावाचे संस्कृतमध्ये एक उत्कृष्ट स्वरनाट्य लिहिले आहे. तसेच मेरट्टूर वेंकटराम शास्त्रींनी तेलुगूमध्ये एक सुंदर नृत्यनाट्य लिहिले आहे. मेरट्टूर, उत्तुक्काडु, शालियमंगलम् येथे, तसेच अन्य ठिकाणी वसंतोत्सवामध्ये या स्वरनाट्यांचे आणि नृत्यनाट्यांचे आजही प्रयोग होतात. कृष्णा जिल्ह्यातील ⇨ कूचिपूडी नृत्य-नाटकांचे मूलपीठ असलेले कूचिपूडी हे ठिकाण तर आजही भारतभर त्या प्रकारच्या नृत्य-नाट्यांसाठी विख्यात आहे. तंजावरच्या शहाजी राजांनी (१६८४-१७११) पल्ल्की सेवा प्रबंधम् या नावाचे तेलुगूमध्ये एक सुंदर स्वरनाट्य लिहिले आहे. ह्या स्वरनाट्याचे तिरूवारूर देवालयामध्ये कित्येक वर्षे प्रत्येक शुकवारी आणि वार्षिक महोत्सवाच्या वेळी प्रयोग होत असत. अलीकडे ही प्रथा बंद झाली आहे. चेय्यूरचे चेंगलवराय शास्त्री यांनी सुंदरेश विलासम् नावाचे तेलुगूमध्ये एक सुंदर स्वरनाट्य लिहिले आहे. चेंगलवराय शास्त्री यांनी संस्कृत आणि तेलुगू या दोन्ही भाषांमध्ये अनेक गंथ आणि  कीर्तने आणि शब्द यांचीही रचना केलेली आहे. सुबह्मण्य कवि हे अध्यात्मरामायणकीर्तनांचे लेखक आहेत. अरूण गिरिनातर यांची तिरूप्पुगळ ही तमिळ भाषेतील भक्तिगीते अनवट तालांसाठी प्रमाणभूत आदर्श मानली जातात.


अर्वाचीन कालातील संस्कृतमधल्या लक्षणगंथांचे लेखक म्हणून पुढील गंथकारांचा निर्देश करावा लागेल : (१) रामामात्य (१५५०) : स्वरमेलकलानिधीचा लेखक, (२) सोमनाथ : रागविबोधचा कर्ता, (३) ⇨ रघुनाथ नायक (सतराव्या शतकाचा आरंभकाळ) : संगीत- सुधाचा कर्ता, (४) व्यंकटमखी : चतुर्दण्डिप्रकाशिकेचा रचयिता, (५) तुळजा महाराज (१७३५) : संगीतसरामृतचा कर्ता आणि (६) गोविंदाचार्य (अठरावे शतक) : संग्रहचूडामणी चा लेखक.

कर्नाटक संगीताची सोपपत्तिक आणि प्रयोगानुसारी मांडणी करणारी पहिली कमिक पाठ्यपुस्तके लिहिली, ती तेलुगूमध्ये तचूर सिंगाराचारलु (एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध) यांनी. सुब्बराम दीक्षितर (१९०४) यांच्या संगीत-संप्रदाय-प्रदर्शिनी या पुस्तकाचे मूल्य या संदर्भात अद्वितीय आहे. ए. एम्. चिन्नूस्वामी मुदलियार यांनी प्रकाशित केलेल्या ओरिएंटल म्यूझिक इन यूरोपियन नोटेशन (१८९२) या पुस्तकामुळे कर्नाटक संगीताच्या महतीची पाश्चात्त्य लोकांना प्रथमच ओळख झाली.

दक्षिण भारतात उदयास आलेल्या व बहरलेल्या ⇨ भरतनाट्यम् नृत्य व ⇨ कथकळि नृत्य या दोन प्रमुख नृत्यसंप्रदायांमध्ये दाक्षिणात्य वा कर्नाटक संगीतपद्धती नृत्याच्या साथीसाठी वापरली जाते. भरतनाट्यम् हा प्राचीन नृत्यपरंपरेचा अविच्छिन्न आविष्कार असून त्याची जोपासना तंजावर येथे झाली, तर कथकळीचा परिपोष मलबारमध्ये (केरळ) झाला. कूचिपूडी-भागवतांच्या आणि ð भागवत मेळा नाटकांच्या कार्यकमांचे जे नृत्यतंत्र पहावयाला मिळते, तो त्यांतला एक विशेष उल्लेखनीय भाग आहे, त्यातील कर्नाटक संगीताचा वापर लक्षणीय आहे. कर्नाटक संगीतातील कथाकालक्षेपम् हा कीर्तनसदृश प्रकार सादर करणाऱ्या कलाकारांना ⇨ भागवतर असे म्हटले जाते. दक्षिण भारतातील लोकनाट्याला स्वतःचे म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य आहे. कुम्मी, कोलाट्टम आणि पिन्नल कोलाट्टम या नृत्य-कार्यकमांच्या वेळी जेव्हा नीटनेटक्या आणि चपखल पोषाखातल्या मुली नाचतात, तेव्हा या नृत्यांचे एक खास सौंदर्य जाणवते. त्याचप्रमाणे संगीताच्या साथीसमवेत खेळले जाणारे अम्मातै यांसारखे खेळ कृषिगीते, गवळणी, कूटगीते, नौगीते, कांडणगीते आणि अशीच अन्य श्रमगीते यांतल्या प्रत्येकाच्या संगीताचे काही वेगळेच वेधक सौंदर्य आहे. जवंदरै उत्सवामध्ये गायिली जाणारी गीते ही श्रूतिसुभग असतात. नैयग्डिमेळम् किंवा गामीण वृंदवादन यांच्या साथसंगतीने ‘कावडि’ आणि ‘करगम’ ही नृत्ये करतात. तेव्हा त्यांतही एक लक्षणीय वेधकता असते. ‘ओयिलाट्टम्’ आणि ‘चक्कैयाट्टम्’ ही पुरूषांची नृत्ये होत. ह्या सर्व लोकनाट्यांमध्ये व नृत्यांमध्ये वापरले जाणारे कर्नाटक संगीत वैशिष्ट्यपूर्ण असते. विल्लु पाट्टु, कैचिलम्बु पाट्टु आणि लावणी ही सर्वसाधारण जनतेला नीतिसत्ये सांगण्याची आणि धर्मोपदेश करण्याची माध्यमे होत. उत्तर भारतातील आधुनिक ‘कीर्तन’ आणि दक्षिण भारतातील ‘कालक्षेपम्’ हे दोन्ही याच प्रकारचे, परिष्कृत, अधिक सफाईदार, आखीवरेखीव आविष्कार होत.

संगीतविषयक मूर्ति-शिल्प-निर्मितीच्या बाबतीत दक्षिण भारत हा समृद्ध आहे. संगीतवादये वाजविणाऱ्या अनेक मूर्तींनी दक्षिण भारतातील कितीतरी देवालये अलंकृत झालेली आहेत. पुदुकोट्टैईमध्ये कुडिमियमलै येथे सातव्या शतकातील एक संगीतविषयक प्रसिद्घ कोरीव लेख आहे. कुडिमियमलैचा प्रस्तुत कोरीव लेख हा संपूर्ण जगतातला एकमेव संगीतलेख आहे. तौलनिक संगीताच्या अभ्यासकांना पुदुकोट्टैईमधील तिरूपयम येथील पेरूमाल देवालयातील याळची शिल्पाकृती महत्त्वाची वाटण्याजोगी आहे. दक्षिण भारतातील काही बाँझ मूर्तींमधून स्वर निघतात, त्यांवर आधारलेला बाँझ-मूर्ति-संगीत हा एक विषय नव्यानेच संगीतशास्त्रात दाखल झाला आहे. 

संगीतसूत्रे : हा विषय अत्यंत चित्तवेधक आहे. संगीताच्या रचना आणि संगीताचे विषय, नियम व घटना ही सर्व लक्षात ठेवण्यासाठी मानवाने आपले बुद्घिकौशल्य या दिशेने कसे कामी आणले आणि स्मरणासाठी जवळच्या वाटा कशा शोधून काढल्या, याचे संगीतसूत्रे हे उत्तम उदाहरण आहे. एक आवश्यक गरजेचा भाग म्हणून संगीतसूत्रांच्या रचनेला प्रारंभ झाला. मुद्रण-कला ज्या वेळी अज्ञात होती त्यावेळी संगीताचे विषय अशा बुद्घिचातुर्याने केलेल्या सूत्ररचनांनी ध्यानात ठेवणे, हे अपरिहार्य होते. संगीताची कला आणि शास्त्र जसजसे वाढत गेले, तसतशी ही संगीतसूत्ररचनाही वृद्घिंगत होत गेली. कटपयादिसूत्राची निष्पत्ती ७२ मेलकर्त्यांच्या नामावलीची मांडणी करण्यासाठी झालेली आहे. एखादया मेलाचा कमांक ठाऊक झाल्यावर विशिष्ट योजनेनुसार मेलरचना केल्यामुळे त्याचे शास्त्रोक्त स्वर सांगणे सोपे होते. ७२ मेलांच्या संज्ञांचे विश्लेषण केल्यावर असे आढळून येईल, की कटपयादिसूत्रातील नियामक अक्षरे ही काही मेलांच्या बाबतीत स्वाभा-विकपणेच मेलनामांमध्ये गुंफलेली आहेत, उदा., मानवती (५), रूपवती (१२), सरपांगी (२७) आणि पावनी (४१). तात्पर्य, ज्यात प्रारंभीची दोन अक्षरे इष्ट संख्या देतात, ती नावे निवडलेली आहेत तथापि इष्ट कमांक मिळविण्यासाठी ज्यात स्वतंत्र कटपयादि-अक्षरे मेल नावांच्या पूर्वी जोडलेली आहेत, असेही काही विषय आहेत. हनुमत्तोडी (८), मायामालव गौल (१५), धीरशंकराभरण (२९) आणि मेचकल्याणि (६५) ही अशा जातीची उदाहरणे होत. ५,१८४ शुद्धमिश्र मेलांच्या बाबतीत कटपयादि उपसर्ग हे मेलांचे इष्ट कमांक दर्शविण्यासाठी उपयोगात आणतात, उदा., कोकिल-हरिमेलाचा कोकिलचकातील अठ्ठाविसावा कमांक ७४८ हा होणार. प, श्री, गो, भू, म, शा ही अक्षरे कमाने चकामधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा मेल दर्शवितात. कटपयादिसूत्राचा प्राचीनतम उपयोग महाभारताच्या आद्य श्लोकात आढळतो :

                                                       नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । 

देवीं सरस्वतीं चैर ततो जयमुदीरये ॥

या श्लोकात कटपयादिसूत्राच्या प्रयोगानुसार ‘जय’ ह्या शब्दाने १८ हा अंक येतो. हा १८ अंक महाभारताची १८ पर्वे, कौरव-पांडव युद्धाचे १८ दिवस, त्यात लढणाऱ्या १८ अक्षौहिणी आणि भगवद्‌गीतेचे १८ अध्याय यांचे प्रतीक आहे.

पहा : रागमालिका रागविचार वादय व वादयवर्गीकरण संगीत संगीत, हिंदुस्थानी.

संदर्भ : 1. Ayyar, C. S. 108 Kritis of Sri. Tyagaraja, Madras.

            2. Ram, V. B. Glimpses of Indian Music, Allahabad, 1962.

            3. Sambamoorthy,  P. Dictionary of South Indian Music and Musicians, Vols. I, II, III, Madras, 1952, 1959, 1971.

            4. Sambamoorthy, P. History of Indian Music, Madras, 1960.

            5. Sambamoorthy, P. South Indian Music, 5 Books, Madras, 1964. 

            6. Sivan, Maha-Vaidyanatha, Ed. Subrahmanya Sastri, Pandit,S. The Mela-Raga-Malika, Adyar, 1937.

            7. Subba Rao, T. V. Studies in Indian Music, New Delhi, 1962.

            8. Subrahmanya Sastri, Pandit,  S. Ed.  Ragavibodha of Somanatha, Adyar, 1945.

सांबमूर्ती, पी. (इं.) मंगरूळकर, अरविंद (म.)