काँचेर्टो : एक पश्चिमी संगीतप्रकार. काँचेर्टोसाठी केलेली संगीतरचना दीर्घ स्वरूपाची असते. स्वतंत्र वादक आणि वाद्यवृंद ह्यांचे परस्परपूरक कार्य हे काँचेर्टोचे वैशिष्ट्य. आरंभी काँचेर्टो समूहवादनासाठी लिहिला जाई. अशा काँचेर्टोस ‘काँचेर्टो ग्रोसो’ असे म्हणतात. व्हिव्हाल्डी, कोरेल्ली ह्यांसारख्या बरोक शैलीच्या संगीतकारांनी अशा प्रकारचे अनेक काँचेर्टो लिहिले आहेत. बाक ह्या जर्मन संगीतकाराचे ‘ब्रॉन्डेनबुर्ग काँचेर्टो’ ह्याच प्रकारात मोडतील. आज प्रचारात असलेल्या सोलो काँचेर्टो मध्ये एखाद्या विवक्षित वाद्यास व ते वाजविणाऱ्या वादकास प्रमुख स्थान असते. व्हायोलिन, पियानो, हॉर्न, फ्ल्यूट यांसारख्या विविध वाद्यांसाठी मोट्सार्ट ह्या ऑस्ट्रियन संगीतकाराने अनेक सोलो काँचेर्टो लिहिले आहेत. सोलो काँचेर्टोचा विशेष म्हणजे त्यातील कॅडेन्झा हा भाग. अठराव्या शतकातील स्वतंत्र वादक वाद्य वाजविता वाजविताच कॅडेन्झाची रचना करीत. तथापि बेथोव्हन ह्या जर्मन संगीतकारापासून काँचेर्टोतील हा भाग संगीतकार आधीच लिहून ठेवू लागले.

 

मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)