कृति: संगीताच्या विविध प्रकारांमध्ये ‘कृती’ ही रचना अत्यंत विकसित झालेली आहे. रागसंगीताच्या रचनांमध्ये तिला सर्वाधिक महत्त्व आहे. गेल्या दोनशे वर्षांमध्ये प्रत्येक नामवंत संगीतरचनाकाराने कृतिरचना करण्याचा प्रयत्‍न केलेला आहे. ह्या संगीतप्रकाराच्या लवचिक स्वरूपामुळे आणि त्यात पुन्हा नियमबंधने कमी असल्यामुळे कोणत्याही रचनाकाराला आपल्या प्रतिभेच्या विमुक्त आविष्काराला तीत भरपूर अवसर मिळतो. शब्दांच्या जाचकाचातून मुक्तता लाभल्याने रचनाकाराला आपले विचार विशुद्ध संगीताच्या द्वारा विपुल रीतीने व्यक्त करता येतात. संगीताच्या एकूण रचनांमध्ये आज कृतींची संख्या सर्वांत मोठी आहे. आजच्या मैफलीमध्ये अर्ध्याहून अधिक काळ कृतींच्या आविष्काराला वाहिलेला असतो आणि ते युक्तच आहे. मैफलीमध्ये कृतींना हे जे अपरंपार महत्त्व प्राप्त झालेले  आहे, ते त्यातल्या अंगभूत सौंदर्यामुळेच होय. या प्रकारात रचनाकाराला आपल्या सांगीतिक विचारांच्या आविष्काराच्या बाबतीत स्वातंत्र्य लाभते. राग, ताल, गती, लय, शैली आणि कथाबंध यांच्या निवडीतही त्याला स्वातंत्र्य मिळते. रचनाकाराच्या मनापुढे या कृतिरचनेच्या वेळी एकच ध्येय असते, ते म्हणजे रागभावांचे त्यांच्या विविध आणि समृद्ध रंगांमध्ये चित्रण. कृती ह्या विशुद्ध संगीताचे उत्तम नमुने होत. संगीतरचनेमध्ये जर काही वैशिष्ट्यपूर्ण अशी शैली दिसावयाची असेल, तर ती केवळ कृतीतच दिसते. ‘निरवल’ आणि ‘कल्पनास्वर’ यांचा विकास करण्यासाठी लागणारे यथायोग्य कथाबंध हे कृतींमध्ये आढळतात. कृतिरचनांच्या उदयासरशी इतर अनेक रचनांचे जुने प्रकार अस्तंगत झाले.

कृतीचे महत्त्व आणि मूल्य तिच्यातल्या सौंदर्यात्मक आशयासाठी असते, तर कीर्तनाचे त्यातील साहित्याच्या भक्तिरूपी आशयासाठी असते. कृती आणि ⇨ कीर्तन  यांत अनुक्रमे संगीतकवित्व आणि साहित्यमाधुर्य हे प्रधान घटक असतात.

कृतीमध्ये गानरसाची तर कीर्तनामध्ये भक्तिरसाची अनुभूती येते. रागभावाचे चित्रण हा कृतीमधला प्रधान भाग, तर कीर्तनात तो आनुषंगिक असतो.

कीर्तने ही कृतीपेक्षा जुनी होत. कृती हा कीर्तनातून विकसित झालेला प्रकार होय. कीर्तनाचा उदय चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, तर कृती ही आपल्या संपूर्ण विकसित स्वरूपात त्यानंतर सु. चार शतकांनी दिसते. ⇨ पल्लवी, ⇨ अनुपल्लवी  व ⇨ चरण  अशा विभागांसह प्रथम कीर्तने रचली, ती ताळ्ळपाक्कम् रचनाकारांनी (इ. स. १४००–१५००).

‘सोगसुगा मृदंग तालमु’ (श्रीरंजनी राग) या आपल्या रचनेत ⇨ त्यागराजाने आदर्श कृतीचे लक्षण दिलेले आहे. वलाजापेट वेंकटरमण भागवतर याने आपल्या सीस पद्यम् ‘एकला कलितुण्डु’ या रचनेत म्हटले आहे, की ‘ज्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कृती रचलेल्या आहेत, त्या त्यागराजाला मी वंदन करतो’. कृती ही जेव्हा वाद्यावर वाजविली जाते, तेव्हा ती परिपूर्ण वाटते. या प्रकारात ‘धातु’ (= संगीत) हाच प्रमाणभूत घटक आहे, याचा हा पुरावाच होय.

कृतीतील साहित्य हे धर्मपर किंवा लौकिक विषयपर असते. कधी कधी कृतीतील साहित्याचा विषय नीतिपर, उपदेशात्मक किंवा ईशस्तुतिपरही असतो. उदा., शुद्ध सीमन्तिनी रागाती ‘जानकीरमण’ ही कृती. कृतीमध्ये सामान्यतः शब्द थोडे असतात व जे असतात, ते गाण्याचे वहन म्हणून असतात. कृतीतील संगीत गुंतागुंतीचे आणि तंत्रशुद्ध सौंदर्यविशेषांनी नटलेले असते.

कृतीत एक वा अनेक चरण असतात. या चरणातील धातू एकच किंवा विभिन्न असेल. कृतींमध्ये अतीत-अनागतांची गुंतागुंतीची गुंफण वारंवार येते. कृती ही खरोखर रागरूपी स्फटिकरत्‍नेच होत. कृतींच्या द्वारा कितीतरी अपूर्व रागांची माहिती आपल्याला मिळते. संगीताची भाषा आपल्याला तिच्या अतिविशुद्ध स्वरूपात येथे पहावयाला मिळते. सांगीतिक भाष्य कृती या प्रकारातच शक्य आहे. स्वरसप्तकाचा पल्ला साधारणपणे दीड ते दोन सप्तकांपर्यंत चालतो. साधारण स्वरूपाचे कौशल्य आणि शिक्षण अंगी असले, तरी कीर्तनाचा आविष्कार करता येतो पण कृतीचा आविष्कार करण्यासाठी संगीतातील प्रतिभावंतच लागतात. कीर्तने सामुदायिक रीत्या गाता येतात, पण कृती तशा गाता येत नाहीत. कीर्तने ही प्रचलित रागांत असतात, पण कृती प्रचलित आणि पांडित्यप्रचुर रागांतही असतात. असे कितीतरी अनवट राग आहेत, की ज्यांचे स्वरूप केवळ कृतींतूनच ज्ञात होते.

पल्लवी, अनुपल्लवी आणि चरण ही कृतीची किमान आणि मूलभूत अंगे होत. तीत चरण मात्र एक वा अनेक असतील.

कृतीची रचना पुढील आणखी काही अंगे समाविष्ट करून अधिक संपन्न केलेली आहे. ही आलंकारिक अंगे एखाद्या रत्‍नामध्ये जडविलेल्या दुसऱ्‍या रत्‍नांप्रमाणे लकाकतात. त्यांच्यामुळे कृतींचे सांगीतिक मूल्य वृद्धिंगत होते. ही अंगे अशी : (१) चिट्‍टस्वर, (२) स्वरसाहित्य, (३) मध्यमकाल साहित्य, (४) सोलकट्‍टु स्वर, (५) संगती (संगती म्हणजे निवडलेल्या स्वरबंधाचा सौंदर्यपूर्ण विस्तार). संगतींचा विकास हा स्वरबंधाच्या शेवटापासून व त्याच्या आरंभापासून असा दोन्हींकडून करता येतो.

सांबमूर्ती, पी. (इं.) मंगरूळकर, अरविंद (म.)