कव्वाली: इस्लामी कंठसंगीतातील भारतात रुजलेला एक भक्तिप्रधान संगीतप्रकार. भारतात रूढ असलेल्या भजनांचे अनुकरण करून पर्शियन संगीतशैलीत केलेली मांडणी, असे कव्वालीचे वर्णन करता येईल. कव्वालीत धार्मिक व लौकिक अशा दोन्ही प्रकारच्या विषयांवर रचना असतात. लौकिक विषयांवरील रचना गाणाऱ्यांना कलावंत आणि धार्मिक रचना गाणऱ्यांना कव्वाल म्हणतात. या प्रकारापासून स्फूर्ती घेऊन ⇨अमीर खुसरौ (१२५३-१३२५) याने शास्त्रीय संगीतातील ‘ख्याल’ या कंठसंगीतप्रकाराचा विकास केला, असे एक मत आहे. तानसेनाचा प्रभाव वाढेपर्यंत धृपदगायक, कलावंत आणि कव्वाल यांना सारखीच प्रतिष्ठा होती.

कव्वाली तालात म्हटल्या जाणाऱ्या या प्रकाराची वैशिष्ट्ये म्हणून सप्तकभर झपाट्याने वरखाली फिरणाऱ्या ताना आणि गीताचे धृपद सांघिक रीत्या ठोसदारपणे म्हणण्याची प्रथा यांचा उल्लेख करता येईल.

संदर्भ : Gosvami, O. The story of Indian Music, Bombay, 1961.

  

रानडे, अशोक