रॉबर्ट शूमानशूमान, रॉबर्ट : (८ जून १८१०–२९ जुलै १८५६). जर्मन संगीतरचनाकार. जन्म सॅक्सनीमधील त्स्विकाऊ येथे. एकोणिसाव्या शतकातील जर्मन सौंदर्यवादी संगीतरचनाकारांचा शूमान हा प्रतिनिधी होय. त्याचे वडील पुस्तकविक्रेते व प्रकाशक असल्याने घरातही साहित्यिक वातावरण होते. बायरन व स्कॉट हे शूमानच्या वडिलांचे आवडते साहित्यिक होते. शूमान स्वत: ⇨ होफ्‌मान व ⇨ झां पाउल रिक्टर या जर्मन सौंदर्यवादी लेखकांचा चाहता होता. या सर्वांचा परिणाम त्याच्या संगीतदृष्टीवर झाला.

वकील होण्यासाठी विद्यापीठात प्रवेश घेऊनही शूमानचे सर्व लक्ष संगीताकडेच होते. प्रख्यात पियानो-शिक्षक विएक याचा शूमान शिष्य झाला. याच गुरूच्या मुलीशी–क्लॅराशी–पुढे त्याने विवाह केला. ती स्वत: एक उत्तम पियानोवादक आणि संगीतरचनाकारही होती. शूमानच्या कृती रसिकांपर्यंत पोहोचविण्यात तिचा मोठाच हातभार लागला.

पुस्तकविश्वाशी लहानपणापासून परिचय असल्याकारणाने असेल, पण शूमानने पत्रकारिताही भरपूर केली. त्याच्या लिखाणामुळे ⇨ फ्रेदेरीक फ्रांस्वा शॉपॅंसारखे काही कलाकार लोकांना भावण्यास मदत झाली. सुमारे १८ महिन्यांच्या कालावधीत फ्रेदेरीक फ्रांस्वा शॉपॅं, रॉबर्ट शूमान व ⇨ फेलिक्स मेंडेल्सझोन यांचा जन्म व्हावा, हा एक योगायोग म्हटला पाहिजे कारण या तिघांची व्यक्तिगत अशी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी असूनही सौंदर्यवादी सांगीतिक चळवळीत एक तरलता व संस्कारित गुणवत्ता आणण्यात या तिघांचा सहभाग होता.

पियानोसाठी शूमानने बरेच फुटकळ संगीत रचले. त्याचे कोरल व चेंबर संगीतही बरेच आहे. चार सिंफनी-कृती व एक पियानो कॉंचेर्टो या त्याच्या महत्त्वाच्या रचना. त्याने आपल्या कृतींना दिलेली नावेही वाङ्‌मयीन कल्पनाशक्तीची निदर्शक आहेत. उदा., पापिलिऑनस (फुलपाखरे). ही कृती ⇨ झां पॉल सार्त्रच्या कादंबरीवर आधारित आहे. शूमानने चालविलेल्या सांगीतिक मुखपत्रास विरोध करणाऱ्याना पात्रे बनवून द डेव्हिड्‌स बॅंड, (इथे बॅंड म्हणजे कंपू). या कृतीची रचना त्याने केली. कार्निवाल या रचनेत मुखवटे घालून नृत्य करणाऱ्या पात्रांना केंद्रस्थानी कल्पून रचना सजविली आहे. ई. टी. ए. होफ्‌मानच्या कादंबरीवर आधारलेली एका संगीतकाराच्या अफलातून व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार घडविणारी रचना म्हणजे क्रायस्लेरिआना. कार्निवाल जेस्ट फ्रॉम व्हिएन्ना या रचनेत त्यावेळी बंदी घालण्यात आलेल्या मार्सेले या क्रांतिगीताचा छुपा वापर होता.

ऐहिक सुखसमृद्धी साधणे शूमानच्या स्वप्नाळू स्वभावात बसण्यासारखे नव्हतेच. पुढे एका मानसिक रोगाने तो पछाडला गेला व बॉन शहरानजीकच्या एका रुग्णालयातच त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Abraham, Gerald, Ed. Schumann : A Symposium, Greenwood, 1972.               2. Taylor, Ronald, Robert Schumann, Chicago, 1985.              3. Walker, Alan Schumann, Londoan, 1976. 

रानडे, अशोक दा.