पतियाळा घराणे: हिंदुस्थानी संगीतातील एक घराणे. पतियाळा घराण्याच्या गायकीमध्ये आवाजाची तयारी आणि कंठ-संस्कार यांवर चांगला भर असतो. साधारणतः या घराण्यातल्या गायकांची आवाजी बिनखोड असते. तिन्ही सप्तकांत सफाईने सहल करू शकणारी. आवाजाचा लगावही मुक्त. आवाज ढाला असूनही जवारीदार, लवचिक, कोठल्याही लयीत फिरणारा, बेअटक, चपल, मुलायम आणि अतिशय सुरेल त्यामुळे अत्यंत परिणामकारक. आलापीत बोलअंग पुष्कळ आणि संवेदनशील बढत. अप्रचलित वा बिकट राग फार करून गात नाहीत. गाण्यात लयकारीची जाणीव बरीच दिसून येते. तानेमध्ये जसा सरळपणा दिसतो, तसाच बिकटपणाही आढळतो. आवाजात जो ऐंद्रिय स्वरूपाचा कलात्मक आविष्कार व स्वराची धुंद आहे, त्यामुळे ⇨ठुमरी (किंवा ठुंबरी) गायन हे या गायकांचे एक खास वैशिष्ट्य झाले आहे. ही ठुमरी पंजाबी ढंगाने न्हाऊन निघालेली असते. तिच्यातील चमत्कृतिपूर्ण स्वररचना अत्यंत आकर्षक असते.

कालूमिया हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक नामवंत सारंगिये होऊन गेले. त्यांनी गोखीबाई नावाची एक गायिका तयार केली. कालूमियांचा एक औरस मुलगा अलिबक्ष आणि त्याचा एक मित्र फतेअली या दोघांना गोखीबाईने तयार केले. पण एका बाईचे शिष्य म्हणून कोणी त्यांना मानत नसे तेव्हा कालूमियांनी त्यांना दिल्लीवाले तानरराखाँ, ग्वाल्हेरवाले हद्दूखाँ व विद्वान धृपदिये जयपूरवाले बेहरामखाँ यांचे गंडे बांधून तालमी देवविल्या. या सर्व वेगवेगळ्या गायकींचे रसायन म्हणजे पतियाळा गायकी व त्यातले ⇨बडे गुलामअलीखाँ ही फतेअलीची शाखा. बडे गुलामअलीखाँ यांनी पतियाळा घराण्याची गायकी अतिशय समृद्ध केली आहे.

संदर्भ : देशपांडे, वामन हरी, घरंदाज गायकी, मुंबई, १९६१.

मंगरूळकर, अरविंद