दीक्षितर, मुथ्थुस्वामी : (२४ मार्च १७७६–२१ ऑक्टोबर १८३५). दाक्षिणात्य संगीतरचनाकार. त्यागराज, श्यामशास्त्री व मुथ्थुस्वामी दीक्षितर ही दाक्षिणात्य संगीतातील त्रिमूर्ती सुप्रसिद्ध आहे. जन्मस्थान तिरुवारूर. प्रसिद्ध संगीतकार रामस्वामी दीक्षितर व सुब्बुलक्ष्मी अम्माल यांचा पुत्र. त्यांचे संगीतशिक्षण पिता रामस्वामी आणि चिदंबरनाथ योगी यांच्याकडे झाले. त्यांनी गुरूसह वाराणशीत पाच वर्षे वास्तव्य केले त्यामुळे हिंदुस्थानी संगीताचा, विशेषतः धृपद शैलीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी सारंग, जय–जयवंती, केदार, बसंत इ. रागांतही संगीतरचना केल्या. तसेच संस्कृत, तमिळ व तेलगू भाषांत रचना केल्या. त्यांच्या सु. ३०० रचनांत ‘गुरुगुह’ हे त्यांचे नाव अंतर्भूत केलेले आहे. ‘वातापि गणपतिम्’ ही हंसध्वनी रागातील त्यांची रचना हिंदुस्थानी गायकांतही लोकप्रिय आहे. तिरुनेलवेली जिल्ह्यातील एट्टाइयापुरम् येथे त्यांचे निधन झाले.

रंगाचारी, पद्मा (इं.) रानडे, अशोक (म.)