मोट्‍सार्ट

मोट्‍सार्ट, व्होल्फ्‌गांग आमाडेउस ­­: (२७ जानेवारी १७५६–५ डिसेंबर १७९१). श्रेष्ठ ऑस्ट्रियन संगीतरचनाकार व पियानोवादक. सॉल्झबर्ग येथे जन्म. मोट्‍सार्ट हा बाल प्रतिभावंत होता. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याच्या संगीतिक प्रतिभेची चमक दिसून आली. त्याचे वडील लेओपॉल्ट हे स्वतः संगीतरचनाकार व पियानोवादक होते आणि त्यांनीच त्याला संगीताचे धडे दिले. त्याची बहीण मारिआ आना (नान-अर्ल) हिलाही बालपणापासूनच संगीताची विशेष देणगी होती.

त्याच्या लहाणपणी त्याने आपल्या वडिलांच्या बहिणीच्या समवेत यूरोपभर दौरे केले, तसेच राजेरजवाडे यांच्यापुढे कार्यक्रम करून खूप किर्ती मिळविली. एक-अष्टमांश स्वरांतराचा फरक कळण्याची त्याची क्षमता व स्मरणशक्ती आणि अप्रतिम वादनकौशल्य यांमुळे त्याचे नाव सर्वतोमुखी झाले. पुढे त्याचा पोपकडून सन्मान झाला व त्याला सॉल्झबर्गच्या आर्चबिशपचा आश्रय लाभला (१९७५). तथापि तिथल्या वास्तव्यात त्याच्या वाट्याला मानहानी आली व १७८१ मध्ये त्याने व्हिएन्नास प्रयाण केले. तिथे १७८२ मध्ये त्याने कॉन्स्टंट्स व्हेबर हिच्याशी विवाह केला. त्याने वयाच्या तिसाव्या वर्षी फिगारो हा ऑपेरा, बत्तिसाव्या वर्षी डॉन जोव्हान्नी हा ऑपेरा आणि तीन ख्यातनाम व अजरामर ठरलेल्या ‘सिंफनी’ रचना (‘इ’ फ्लॅटमधील ‘जी’ मायनरमधील व ‘सी’ मधील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) तसेच वयाच्या पस्तीसाव्या वर्षी द मॅजिक फ्ल्यूट हा ऑपेरा रचला. दुर्देवी योगायोग असा की, ह्या अखेरच्या काळातील त्याची अंतिम रचनाही ‘रेक्कीयम’ (म्हणजे मृत व्यक्तीसाठी केलेली ईश्वराची प्रार्थना) या प्रकारात होती. पन्नास सिंफनी, वीस ऑपेरा व ऑपरेरा, विसावर पियानो काँचेर्टो, सत्तावीस स्ट्रींग क्वार्टेट, चाळीस व्हायोलीन सोनाटा आणि इतर अनेक फुटकळ कृती इतकी विपुल संगीतरचना त्याने आपल्या कारकिर्दीत केली आहे. त्याचे उत्तरायुष्य जरी विपन्नावस्थेत, उपेक्षेत व दुःखयातनांत गेले, तरी व्हिएन्नाच्या वास्तव्यातच त्याच्या श्रेष्ठ संगीतकृमी निर्माण झाल्या. व्हिएन्ना येथे त्याचे निधन झाले व भिकाऱ्यांच्या दफनभूमीत त्याचा अत्यंसंस्कार झाला.

या महान पण अल्पायुषी संगीतरचनाकाराची प्रतिभा वैपुल्य आणि तरल कल्पनाशक्ती यांनी युक्त होती. त्याला संगीतरचना विनासायास आणि सहजासहजी स्फुरत. कित्येकदा तर बिल्यर्ड्‌स खेळताखेळताही त्याला संगीतरचनेची बीजे सुचत. पूर्ण सिंफनी डोक्यात आहे असे म्हणण्याइतकी रचना सुघटितपणे अवतरे. सुंदर आकृतिबंध, नादवैचित्र्य, लयबंधांवरचा भर इ. गुणांमुळे अभिजाततावादी संगीतकारांतला मोट्‍सार्ट हा मोहरा ठरतो.

संदर्भ :1. Turner, W. J. Mozart, London, 1965.

            2. Valentin, Erich Trans. Shenfield, Margaret, Mozart : A Pictorial Biography, London, 1962.

रानडे, अशोक