सुंदराबाई"

सुंदराबाई : (सु. १८९०–१९६७). प्रसिद्घ मराठी गायिका, संगीतकार व अभिनेत्री. त्यांची ख्याती मुख्यत्वे लावणी गायिका म्हणून असली, तरी गझल, कव्वाली, ठुमरी, भजने, होरी, कजरी इ. विविध गानप्रकार त्या तितक्याच समर्थपणे सादर करीत असत. त्यांचे मूळ नाव सुंदराबाई जाधव पण त्या ‘बाई सुंदराबाई’ ह्या नावाने विशेष प्रसिद्घ होत्या. ‘स्वरदेवता’ सुंदराबाई म्हणूनही त्या ओळखल्या जात. त्या पुण्याच्या. पुण्याचेच ठाकूरदास बोवा हे कनोजी ब्राह्मण त्यांचे संगीतातले आद्य गुरु. त्यांनी सुंदराबाईंच्या आवाजाचा धर्म ओळखून त्याला जुळेल अशा प्रकारची गायकी त्यांना शिकवली. प्रचलित सर्व राग आणि भजने त्यांच्या ह्या गुरुंनी त्यांना शिकविली. ठाकूरदासांची मातृभाषा हिंदी असल्यामुळे सुंदराबाईंवरही हिंदी भाषेचे संस्कार झाले. गुलाम रसूलखाँ व गम्मन यांच्याकडे त्या ठुमरी, गझल, कव्वाली आणि होरी शिकल्या. पंडित केशवराव बनारसवाले यांच्याकडून त्यांनी उत्तमोत्तम बनारसी चिजा आत्मसात केल्या. ख्याल गायकीचा त्यांचा व्यासंग मात्र माफकच होता. मराठीप्रमाणेच त्यांचे उर्दू व हिंदी शब्दांचे उच्चारण शुद्घ व स्वच्छ होते. उर्दू भाषेवरील त्यांच्या उत्तम प्रभुत्वाबद्दल हैदराबादच्या निजामांनी त्यांचा खास गौरव केला होता. हैदराबादमध्ये त्यांनी अनेक जलसे केले व तेथील रसिकांची मने जिंकली.

सुंदराबाईंचा आवाज बारीक असला, तरी नोकदार, उंच व लवचिक होता. त्याला एक नाजूक धार होती. सुरेल स्वरांची उपज हा त्यांच्या गायनाचा विशेष होता. त्यांच्या मींड, मुरकी, खटका, हरकत, आलाप, तान यांतही हा सुरेलपणा जाणवत असे. अशा कोणत्याही स्वरालंकाराचा उपयोग रसपरिपोषणासाठी करण्याची कल्पकता व योजनाचातुर्य त्यांच्या ठायी होते. त्यांच्या सौंदर्यदृष्टीमुळे गाण्यातील अर्थसौंदर्य व स्वरसौंदर्य जास्तीत जास्त खुलविण्याकडे त्यांचा कल असे. त्यांची गायकी भावनाप्रधान होती. प्रत्येक गाण्याचा, चिजेचा अर्थ नीट समजावून घेऊन त्या भावपूर्णतेने गात असत. त्यांतील भावनांच्या सूक्ष्म छटा स्पष्ट शब्दोच्चारांतून त्या प्रभावीपणे व्यक्त करीत. त्यामुळे त्यांचे गाणे जिवंत, रसरशीत होई. मराठी लावणीचे सादरीकरण, तिचे मूळचे आकर्षक रुप कायम ठेवून त्यांनी अधिक सुंदर केले.

त्यांच्या एकूण ६७ ध्वनिमुद्रिका प्रसिद्घ झाल्या. ‘ सखे नयन कुरंग’, ‘खूण बाळपणात’, ‘कठीण बडोद्याची चाकरी’, ‘तुझे थरकत चालणे’, ‘माडीवरती माडी बांधली’, ‘ऐकुनी दर्द’ ह्या त्यांच्या उत्तम लावण्या त्याकाळी अतिशय लोकप्रिय होत्या. त्यांनी गायिलेली ‘कत्ल मुझे कर डाला’, ‘सुनसावल बन्सीवाला’, ‘मर जाउंगी’, ‘मानुंगी न हरगीज’, ‘मोरा बन्सीवाला’ ही काही विशेष उल्लेखनीय पदे होत. मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक-अभिनेते बालगंधर्व ह्यांच्यावर सुंदराबाईंच्या गायकीचा काहीसा प्रभाव होता. बालगंधर्व यांनी गायिलेल्या एकच प्याला नाटकातील लोकप्रिय पदांना सुंदराबाईंनी स्वरसाज चढविला होता. तसेच मामा वरेरकरांच्या जीवा शिवाची भेट (प्रथम प्रयोग – १९५०) या नाटकास त्यांनी संगीत दिले. ह्या नाटकातील पदांना त्यांनी अस्सल मराठमोळ्या चाली दिल्या होत्या. आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन प्रसारित झालेला पहिला तमाशा – व्यंकटेश माडगूळकरांचा हुताशनी – सुंदराबाईंनी स्वरबद्घ केला होता.

व्ही. शांताराम यांच्या माणूस या चित्रपटात सुंदराबाईंनी नायक गणपत हवालदाराच्या ( भूमिका – शाहू मोडक ) आईची भूमिका साकारली. त्यातील सुंदराबाईंनी गायिलेली ‘तोड तोड भोगजाल रे नरा’, ‘मन पापी भूला भूला, कौन इसे समझाये’ ही गाणी त्या काळी खूपच रसिकप्रिय ठरली. रेडिओचे सरकारीकरण होण्यापूर्वी, खाजगी रेडिओ केंद्रावर १९२७ सालापासून सुंदराबाई गात असत. मुंबईच्या एंपायर थिएटरमध्ये झालेला त्यांचा गायनाचा कार्यक्रम तेथूनच पहिल्यांदा रेडिओवर प्रसारित करण्यात आला. त्या काळातील या माध्यमाच्या प्रभावामुळे त्यांच्या आवाजाची जादू भारतभर सर्वदूर पसरली. गोड गळ्याची प्रतिभाशाली गायिका असा त्यांचा सर्वत्र लौकिक झाला आणि त्यांना ‘स्वरदेवता’ ही सार्थ पदवी मिळाली.

मुंबई येथे त्या निधन पावल्या.

कुलकर्णी, अ. र.