ब्रिटेन, बेंजामिन: (२२ नोव्हेंबर १९१३ -). नामवंत ब्रिटिश संगीतरचनाकार, वाद्यवृंदसंचालक व पियानोवादक. जन्म लोस्टॉफ्ट येथे. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याने संगीतरचना करण्यास सुरुवात केली आणि दहाव्या वर्षापर्यंत सहा स्ट्रिंग-क्वार्टेट्स आणि दहा पियानो-सोनाता रचना केल्या. त्याने हॅरल्ड सॅम्युएल याच्याकडे पियानोवादनाचे व फ्रँक ब्रिज याच्याकडे संगीतरचनेचे शिक्षण घेतले. पुढे लंडन येथील ‘रॉयल कॉलेज ऑफ म्यूझिक’ मध्येही त्याने शिक्षण घेतले. १९३७ मध्ये सॉल्झबर्ग महोत्सवात त्याने व्हेरिएशन्स ऑन अ थीम ऑफ फ्रँक ब्रिज ही संगीतकृती सादर करून जागतिक कीर्ती संपादन केली. त्यानंतर सु. वीस अनुबोधपटांसाठी आणि अनेक नाटकांसाठी त्याने संगीत दिले. १९४० मध्ये त्याने सिंफोनिया दा रेकिएम आणि सेव्हन सॉनेट्स ऑफ मायकेल अँजेलो या दीर्घ रचना प्रसिद्ध केल्या. १९४५ पासून ऑपेरांसाठी संगीत देण्यातही ब्रिटेन विशेष यशस्वी ठरला.पीटर ग्राइम्झ (१९४५), बिली बड (१९५१), द टर्न ऑफ द स्क्रू (१९५४) इ. रचना ह्याची साक्ष देतात. वॉर रेक्विएम (१९६२), चेलो सिंफनी (१९६४) इ. नंतरच्या संगीत रचनांतही त्याचा जबर आवाका दिसतो.

 शेक्सपिअर, हेन्री जेम्स यांसारख्या लेखकांपासून ते मध्ययुगीन संगीत, जपानी नो नाट्य अशा विविध कलाप्रकारांपर्यंत विस्तृत व व्यापक स्फूर्तिविषयांपासून प्रेरणा घेणारा एकमेव संगीतकार म्हणून ब्रिटेनचेच नाव घेतले जाते. ह्याची साक्ष त्याच्या विविध व समृद्ध संस्कारांनी युक्त अशा संगीतकृतींतून मिळते. त्यातही खास ब्रिटिश प्रकृतिधर्माचे रचनाविशेष कुशलतेने जोपासणारा संगीतकार म्हणून जाणकारांमध्ये त्याला खास स्थान आहे.

संदर्भ: white, Eric Walter, Benjamin Britten : His Life and Operas, London, 1970.

रानडे, अशोक