लक्षणगीत : रागाचा थाट, त्याला लागणारे स्वर, त्याचे वादी-संवादी, तसेच रागातील महत्त्वाची स्वरवाक्ये ज्या गीतात असतात, त्याला ‘लक्षणगीत’ असे म्हणतात. थोडक्यात रागाची सर्व लक्षणे विशद करणारे, त्याच रागातील गीत ते लक्षणगीत. पं.विष्णु नाराण भातखंडे (१८६०-१९३६) यांनी प्रथम लक्षणगीत रचण्यास सुरुवात केली, असे मानण्यात येते. तथापि अशी गीते भातखंडे यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या गायकांनीही रचली असावीत. लक्षणगीत शिकल्यामुळे ज्या रागात ते रचलेले असेल, त्या रागाचे आरोह-अवरोह आदी करून सर्व नियम विद्यार्थ्यास मुखोदगत होतात व त्या रागांचे ज्ञान त्याला चांगले होते. पं. भातखंडे यांनी सु. १०० लक्षणगीते रचली व त्यांत आपले टोपणनाव ‘चतर’ असे घातले आहे.

पूर्वी लक्षणगीताचे कार्य साधण्यासाठी दोहे व आर्या रचत, पण यांचे गायन संभवनीय नसे. खुद्द भातखंड्यांनी लक्षणगीताची व्याप्ती थोडी वाढविली. ताललक्षणांचा विचार करणारी, त्याचप्रमाणे प्रश्नोत्तर पद्धतीने संगीताच्या औपपत्तिक अंगाचा विचार मांडणारी अशीही लक्षणगीते त्यांनी रचली. आणखी एक पायरी पं.गोविंद सदाशिव टेंबे यांनी गाठली. काव्यात्मक आशय आणि गायकीस योग्य पदात लक्षणगीताचे रूपांतर करून टेंब्यांनी लक्षणगीताचा व्याकरणी अवतार कमी बोचरा केला.

देवधर, बा.र. रानडे, अशोक.