मंजीखाँ: (सु. १८८८-२७ जुलै १९३७). हिंदुस्थानी संगीतक्षेत्रातील एक महान गायक. जन्म जयपूरजवळ उनियारा या गावी. संगीतसम्राट ⇨अल्लादियाखाँ यांच्या तीन पुत्रांपैकी मधले मंजीखाँ. त्यांना लहानपणी वडिलांची व चुलते हैदरखाँ यांची धृपद-धमाराची व नंतर ख्यालाची तालीम मिळाली. त्यांच्या ख्यालात आलापी, बोल-आलाप, बोलतान. तानफिक्रे वगैरे सर्व दिसून येत. मंजीखाँचा आवाज अरूंद पण मधुर आणि भावनादर्शक होता. त्यांच्या गायकीची मूलभूत अंगे अल्लादियाखाँ यांच्याच गायकीच्या पायावर उभारलेली आणि पोसलेली होती. अल्लादियाखाँची असामान्य गायकी सामान्य श्रोत्यांना किंवा गायकांना आकलन होण्यासारखी नसल्यामुळे, मंजीखाँनी तिला निरनिराळ्या स्वरूपांत पुढे मांडण्याचे आणि आबालवृद्धांना त्या गायकीचे महत्त्व पटवून देण्याचे श्रेय संपादन केले. त्यामुळे वडिलांच्या गायकीचा बोझ कमी झाला पण तिला पैलू पडले.

शिवाय मंजीखाँ यांच्यावर ग्वाल्हेर परंपरेच्या हद्‍दूखाँचे चिरंजीव ⇨रहिमतखाँ यांच्या मोहक धाटणीचा गहिरा संस्कार झाला होता. इतका की, खुद्द हद्‍दूखाँच्या घराण्यात कोणालाही मंजीखाँच्या तुलनेत त्याचा अल्पांशसुद्धा साध्य झाला नाही, असा प्रत्यय येई. काही वेळा तर रहिमतखाँचा प्रभाव त्यांच्यावर वडिलांच्यापेक्षाही अधिक झाला असावा ही शंका यावी, तोच चिजेचे बोल आणि समेचे तोंड कानावर येई व तत्काळ वडिलांची गानशैली दिसून येई. रहिमतखाँच्या अनुकरणाची ऐट, मोहकता आणि स्वतःच्या घराण्याच्या गायकीची ऐट असा अद्वितीय मिलाफ मंजीखाँच्या गायनात दिसून येत असे. तसेच कलकत्त्याला वडिलांबरोबर काही काळ राहिल्यामुळे तेथील मौजुद्दीनखाँ व इतर गायकांचे पूरब ढंगाच्या ठुमरीचे गायन ऐकप्याचा त्यांना वरचेवर योग येई. परिणामतः त्यांच्या सुंदर गळ्याला व भावना सुलभ रसिक वृत्तीला तीही गायकी सहजपणे आत्मसात करता आली, यात नवल नाही.

बालपणापासून आयुष्य कोल्हापूरला गेल्यामुळे मराठी भाषेवरही त्यांचे मातृभाषेइतकेच प्रभुत्व व प्रेम होते. त्यामुळे मराठी पदे आणि तत्कालीन आधुनिक कवींची कवने ते अत्यंत भावपूर्णतेने गात असत. ख्याल, ठुमरी, भजन, गझल, मराठी पद असा कुठलाही प्रकार असो शब्दांना भावनेचा सुवास लावण्याकडे त्यांची प्रवृत्ती असे आणि असे असूनही आपण गायक आहोत राग ताल, स्वरांचे रखवाले आहोत, ही जाणीव त्यांनी कधीही सोडली नाही. माधव जूलियनांचे ‘ऐकिव तव मधुबोल’, गडकऱ्यांची ‘बजाव बजाव मुरली’ अथवा गिरीशांची ‘सोडू कुठे ही चिमणी बाळे’ वगैरे कविता मैफलींतून अप्रतिमरीत्या सादर करणारे ते पहिलेच गायक होत. यामुळे मराठी माणसाच्या मनात त्यांनी आपले स्थान कायमचे निर्माण केले. प्रख्यात गायक ⇨मल्लिकार्जुन मन्सूर हे त्यांचे पट्टशिष्य होत.

या आद्वितीय व बहुरंगी कलाकाराचे मुंबई येथे अकाली निधन झाले.

देशपांडे, वामनराव