आलाप : चीज गाताना अथवा वादनात रागाचा आविष्कार करताना रागस्वरूपाचे क्रमाने व सविस्तर दिग्दर्शन करण्यासाठी गायक अथवा वादक प्रथम रागवाचक स्वरांचे आरोहावरोही गुच्छ बांधतो, त्याला आलाप म्हणतात. ख्यालगायनात आलापाला तालाची अथवा गीतशब्दांची आवश्यकता असतेच, असे नाही. गीतशब्द ज्यात नाहीत ते आ-कारयुक्त आलाप, ज्यात आहेत ते बोल-आलाप.  अनेक गायक ‘अनंत हरि नारायण’  या शब्दाधाराने आलाप करतात.  तालरहित आलापांना ‘नायकी’ आणि सताल आलापांना ‘गायकी’ म्हणतात.  आलापांचा आरंभ धीम्या लयीने होतो. उत्तरोत्तर त्यात मींडगमकादी विविध संगीतालंकार, तसेच स्वरांचे दीर्घत्व अथवा बहुलत्व येऊन प्रत्येक वेळी त्याचा शेवट आघारस्वरात (षड्जात) किंवा कधीकधी वादी स्वरात होतो.  धृपदाच्या आलापीला  ‘नोमतोम’ ही म्हणतात.  या आलापीत ठेका वाजवीत नाहीत,  तथापि तीत एक स्थूल लय मात्र गोविलेली असते.

मंगरूळकर, अरविंद