संगीत, पाश्चात्त्य : यूरोप व अमेरिकेतील लोकांचे संगीत हे सामान्यतः ‘पाश्चात्त्य संगीत’ (वेस्टर्न म्यूझिक) म्हणून ओळखले जाते. अभिजात व लोकप्रिय अशा पाश्चात्त्य संगीताच्या दोन प्रमुख शाखा आहेत. अभिजात वा कलासंगीतात प्रामुख्याने ⇨ सिंफनी रचना, ऑपेरा व ⇨ बॅले यांच्यासाठी केलेल्या संगीतरचना यांचा समावेश होतो. लोकप्रिय वा रंजनात्मक संगीतात गामीण संगीत (कंट्नी म्यूझिक), लोकसंगीत, ⇨ जॅझ, रॉक संगीत, चित्रपट-संगीत, विनोदी / सुखात्मिकांचे संगीत इ. प्रकारांचा समावेश होतो. आशियाई (चिनी, जपानी, भारतीय, इंडोनेशियन व अरब देशांतील संगीत) संगीतापेक्षा पाश्चात्त्य संगीत वेगळे ठरते ते प्रामुख्याने त्यातील स्वरश्रेणी (म्यूझिकल स्केल), वादये व सांगीतिक रचनातत्त्वे यांत असलेल्या भिन्नत्वामुळे. बहुतेक पाश्चात्त्य संगीत हे प्रामुख्याने स्वरमेलतत्त्वावर (हार्मनी) आधारलेले आहे.  ‘केडेन्स’ (स्वरांतील चढउतार) हे एक प्रमुख स्वरमेलतत्त्व होय. तसेच बहुधुनपद्धती (पॉलिफनी), संघगायनाची -एकाच वेळी अनेक आवाज गाते असण्याची – वैशिष्ट्यपूर्ण पद्धती व त्यातून विकसित झालेले आवाज -जोपासनाशास्त्र, लिखित संगीताची वा स्वरलेखनाची (नोटेशन) प्राचीन काळापासून चालत आलेली प्रदीर्घ परंपरा (सर्वांत आद्य लिखित संगीत   इ. स. पू. २५०० मध्ये आढळले). अशा काही पृथगात्म व अनन्यसाधारण वैशिष्ट्यामुळे पाश्चात्त्य संगीताला अन्य संगीतपरंपरांपेक्षा वेगळेपण प्राप्त झाले आहे. वैविध्यपूर्ण व दीर्घकालीन अशा पाश्चात्त्य संगीतपरंपरेची सर्वांत आद्य बीजे प्राचीन ग्रीक संगीतात आढळतात. ईजिप्त, चीन, भारत इ. देशांच्या तुलनेने पाहता पाश्चात्त्य कलासंगीतपरंपरेचे वर्णन तरूण असे करायला हवे. पाश्चात्त्य संगीताचा इतिहास इ. स. ८०० पासून नोंदता येतो, असे म्हणता येईल. तेव्हापासूनच्या कालखंडांतसुद्धा इतके मूलगामी बदल या परंपरेत  घडत गेले, की पुढील संज्ञा व कालविभाजन नोंदवावेसे वाटते. आर्स  अँटिका, आर्स नोव्हा, Nuove Musiche  न्यू म्यूझिक व – ही शेवटची  संज्ञा तर संगीतेतिहासात निरनिराळ्या कालखंडांत पुनःपुन्हा उद्भवणारी संज्ञा म्हटली पाहिजे : (१) आर्स नोव्हा : इटली व फ्रान्स मध्ये (१३००) (२) Nuove   Musiche : इटलीत १६०० च्या सुमारास व (३) न्यू म्यूझिक : १८५० नंतर जर्मनीत. आर्स अँटिका (लॅटिन) म्हणजे प्राचीन कला. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातील संगीत व समकालीन संगीत यांत भेद करण्यासाठी चौदाव्या शतकाच्या आरंभीच्या लेखकांनी वापरलेली संज्ञा. समकालीन कलेस ते ‘आर्स नोव्हा’ म्हणत. आज तेराव्या शतकातील कलेस आर्स अँटिका व चौदाव्या शतकातील कलेस आर्स नोव्हा म्हणण्याचा प्रघात आहे. जुन्या कलेचा भर प्लेन साँग व ऑर्गॅनम यावर असे.

पहिला महत्त्वाचा कालखंड ‘पॉलिफनिक’ म्हणजे बहुधुनयुक्त संगीताचा. त्याचा आरंभ इ. स. ८५० पासून झाला. या आधीचे पाश्चात्त्य संगीत एक-धुनयुक्त असे. पाश्चात्त्य संगीताचा ख्रिस्तपूर्व अवतार म्हणजे ग्रीक संगीत, असे पुराव्याअभावी म्हणावे लागते. इसवी सनाच्या प्रारंभ-काळात ख्रिस्ती पठणपरंपरा (‘प्लेन साँग’ शैली दृष्ट्या कमी आलंकारिक असलेली, पाश्चिमात्त्य ख्रिस्ती धर्मविधिगीते) प्रचारात आली तिचे मूळ ज्यू पठणपरंपरेत आढळते. ख्रिस्ती पठणपरंपरेत महत्त्वाचा वाटा रोमन कॅथलिक पंथीय पठणाचा (गेगरियन चांट). चौथ्या आणि सहाव्या शतकांत ख्रिस्ती धर्मसंगीताचे इटलीत व्यवस्थितीकरण झाले. त्यात पहिला पोप गेगरी (इ. स.  सु. ५४०-६०४) याने बजाविलेल्या कामगिरीबद्दल या संगीताचा निर्देश आजही ‘गेगरियन चांट’ म्हणून केला जातो. इ. स. ७५०-८५० च्या सुमारास हा प्रकार पक्का झाला. ओल्ड रोमन, ॲम्बोजिअन, गॅलिकन, मोझाराबिक व बायझंटिन ही पठणाची घराणी हळूहळू सिद्घ झाली. परंपरेने चालत आलेल्या रचनासंगहांचा विस्तार होऊ लागला (इ. स. ८५०) आणि ट्नोप, सीक्वेन्स आणि अखेर लिटर्जिकल ड्रामा हे प्रकार रूढ झाले. परंतु या आडव्या विस्तारापेक्षाही अधिक वेधक बाब होती, ती विकसनात्मक उभ्या वाढीची – म्हणजे बहुधुनयुक्त संगीताच्या सिद्घीची – उदा., प्लेन साँगची बहुधुनयुक्त मांडणी करून सिद्घ होणाऱ्या ‘कँटस फर्मी’ सारख्या प्रकारांचा प्रघात. अनेक ध्वनी एकाच वेळेस आविष्कारांत वापरण्याची कल्पना निर्माण झाली, तेव्हा चौथ्या व पाचव्या स्वरांतराने पारंपरिक धुनांचे द्वित्त करण्याच्या रूपाने ती अंमलात आली. ऑर्गॅनम यातही हळूहळू बदल झाला. एक गायन विभाग कायम ठेवून दुसऱ्या, काहीशा मुक्त भागाची त्याला जोड देण्याचे पाऊल उचलले गेले. ११५० च्या सुमारास सेंट मार्शलचे घराणे आणि त्यानंतरचे ११७५ मधील पॅरिसचे नोत्र दामचे घराणे, ही या संदर्भात भरीव कामगिरी करणारी म्हणून नोंदली गेली. विशेषतः दुसऱ्या घराण्यातील लेऑनँ आणि पेरॉतँ (सु. ११७०-१२३५) या फ्रेंच संगीत रचनाकार-आचार्यांनी घातलेली भर लक्षणीय ठरली. या फ्रेंच संगीतकारांच्या अनुकमे दोन, तीन वा चार विभागांच्या ‘ ऑर्गॅनम ’ रचना उल्लेखनीय होत. तेराव्या व चौदाव्या शतकांत प्रभावी ठरलेल्या ðमोतेत या संगीतप्रकाराची मुळे या दोघांनी स्थिररूप केलेल्या ऑर्गॅनम रचनाशैलीत सापडतात. ऑर्गॅनम हा प्रकार धर्मसंगीताचा असला, तरी मोतेत मात्र झपाटयाने लौकिक संगीतावर पगडा बसविणारा प्रकार ठरला. अशा प्रकारे काही लौकिक संगीत प्रकारांच्या घडणीस नोत्र दाम घराण्याने हातभार लावला. उदा., कॉन्डक्टस (बाराव्या–तेराव्या शतकांतील चर्चसंगीतातील एक रचना प्रकार. या कालखंडात संगीतरचना करणे म्हणजे आधीच उपलब्ध असलेल्या स्वरधुनीला अधिक ‘आवाजां’साठी असलेल्या संगीताची जोड देणे. अशी नवरचित धुन ‘प्लेन साँग’ प्रकारात नसून लौकिक संगीतातील वा नवीन असेल, तर तिला  कॉन्डक्टस म्हणत). त्याचप्रमाणे ‘Clausula’ (केडेन्स) यांना मोतेत (चर्चमधील समूहगानाचा प्रकार) ह्याचा आरंभ म्हणायला हवे. आर्स   अँटिकाचा हा प्रमुख संगीतप्रकार ऑर्गॅनमच्या विघटनातून निर्माण झाला. याच सुमारास ⇨ त्रूबदूर (द. फ्रान्समधील कवींचा वर्ग, अकराव्या शतकाचा उत्तरार्ध ते तेरावे शतक) त्रूव्हेरे (सु. ११५०-१३००) हे लौकिक संगीताचे निर्माते फ्रान्समध्ये तर ⇨ मिनस्येंगर (मध्ययुगीन जर्मन प्रेमकवींचा वर्ग, सु. ११७०-१२३०) हे जर्मनीत प्रभावी ठरले. या सर्वांचा भर एकधुनी संगीतावर होता, हे ध्यानात घेण्यासारखे आहे. त्रूबदूर  कवींची गीते संगीतबद्ध करून गाणाऱ्यांना ‘ जाँग्लर ’ अशी संज्ञा होती. त्रूबदूरही आपली गीते संगीतबद्ध करीत. या गीतांची संगीतलेखने तेराव्या शतकाच्या आरंभापासून उपलब्ध आहेत. चालींचे चढउतार व कालावधी ध्यानात येण्याइतके हे संगीतलेखन सुगम आहे. तेराव्या शतकातील स्पेनमधील Cantigas आणि इटलीमधील laude सुद्धा याच प्रकारचे आविष्कार होत. आर्स नोव्हा म्हणजे अर्वाचीन कला. चौदाव्या शतकातील रूढ संगीताला हे नाव पडले. ही आर्स अँटिकाशी विरोधसंबंध्द संज्ञा आहे. खरे पाहता प्रस्तुत संज्ञा तिच्या मूळ उपयोगास अनुसरून चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धातील फ्रेंच संगीता-पुरती मर्यादित ठेवली पाहिजे. फ्रान्सने आर्स नोव्हात लय व छंद यांबाबतींत नवीन भर घातली. तेराव्या शतकातील संगीतात तिस्त्र जातीचे वर्चस्व होते, ते बदलले. दुखंडी लय पुढे आली. १८८० च्या सुमारास  आधीच्या  ढोबळ  लयीच्या  जागी  लयात्म  आवर्तांची अधिक कसोशीची योजना करण्यात आली. त्याचप्रमाणे महत्त्वाघात दर्शविण्यासाठी बलाघात-निर्बलाघात हा आकृतिबंध रूढ झाला. स्वरसंवादात्मतेच्या बाबतीत आता आर्स नोव्हामध्ये तिसऱ्या स्वरांतराचा जादा वापर होऊ लागला. आरंभ व अंत यांत स्वनैक्यात्म स्वरांतराचा उपयोग (म्हणजे अष्टमस्वर, पाचवा व चौथा स्वर) करण्यावर भर असला, तरी मधल्या विभागात स्वनविरोधी स्वरांतराचा बराच मुक्त उपयोग आढळतो. आर्स नोव्हाचे एक इटालियन घराणेही होते. माद्रिगल (इटलीत सोळाव्या शतकात विकसित झालेला संघगायन प्रकार) ह्या ऐवजी बॅलाता (चौदाव्या-पंधराव्या शतकांतील लौकिक गीतरचनांचा समावेश असलेला इटालियन काव्यप्रकार) यावर भर हा त्याचा एक विशेष. स्वनविरोधाच्या योजनेपेक्षा यात स्वराकर्षणास महत्त्व दिलेले आढळते. धर्मपर संगीतापेक्षा लौकिक, तसेच एकधुनी आविष्कारापेक्षा बहुधुनी आविष्कारावर भर देणारा कालखंड म्हणूनही आर्स नोव्हाचे वर्णन केले जाते. प्रस्तुत कालखंडात रचनासंचांत जी भर पडली, ती लक्षणीय ठरली. उदा., फ्रान्समध्ये ballades, ronde, uxe, virelais तर इटलीमध्ये caccie माद्रिगल, बॅलाता हे या संदर्भात लक्षणीय प्रकार होत. रचना व लयबंध यांत अधिक गुंतागुंत करीत मोतेतचा विकास होत राहिला. पंधराव्या शतकाच्या अखेरीस पुढील रचनासंबद्ध तंत्रे रूजली आणि त्यांचा संगीताच्या गुणवत्तेशी प्रत्यक्ष संबंध राहिला : (अ) स्वनविरोधी धुनींची निर्मिती व त्यांचे विसर्जन स्वीकारण्यास कान तयार राहू लागला. (आ) आविष्कारात मधे मधे स्तब्धता पाळून पुन्हा तो सुरू


 करण्याचे तंत्र परिणामकारक होते, याची जाणीव झाली व तसे प्रयोग होऊ लागले. (इ) एका ध्वनिघटकाने आविष्कृत केलेल्या धुनीचा अंश दुसऱ्या ध्वनिघटकाने अनुसरणे (इमिटेशन). (ई) त्याने दुसऱ्याचे तंतोतंत व लागोपाठ अनुकरण करणे [→ कॅनन], अशी दोन्ही तंत्रे प्रचारात आली. जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत रचनाकारांचे लक्ष समूहसंगीतावर केंद्रित होते. सुटा आवाज व वादयसाथ, समूहगायन व स्वतंत्र वादयसाथ वा आवाजाशिवाय वादये, यांसाठी तोपर्यंत रचना नव्हत्या. ‘मिन्स्ट्नेल्स’ (मध्ययुगीन भाट कवी, गायक, संगीतकार इ.) ⇨हार्पसिकॉर्ड यांचा अपवाद म्हणता येईल. समूहगायनासाठी तयार केलेल्या चर्चसंगीतरचनांचा सोळाव्या शतकाच्या अखेरीस परमोत्कर्ष झाला. अकॅपेला, ⇨ मॅस (मिस्सा), मोतेत, अँथेम, माद्रिगल या संगीतप्रकारांचे हे सुवर्णयुग होय. मात्र नंतरनंतरच्या रचनांत मोडल पद्धती मागे पडून मेजर मायनर स्केल्सवर भर दिला जाऊ लागला. व्हायॉल व ⇨ ल्यूट वर्गांतील वादये बहरत होती आणि रेकॉर्डर कुटुंबातील वादयेही. ðऑर्गन, जिव्हाळीची व  बास वादये काहीशी प्राथमिक अवस्थेत तर ⇨ क्लॅव्हिकॉर्ड व हार्पसिकॉर्ड  ही घरगुती वादनाची, बोटपट्टीची वादये बरीच विकसित झाली होती. व्हर्जिनल वादयाचा वापरही बराच होई. वादयांच्या वाढत्या प्रभावाचे एक गमक असे, की माद्रिगल्समधले, गायनासाठी असलेले रचनाविभागही व्हायॉल – वादक आपापसांत वाटून घेत. खऱ्या अर्थाने बोटपट्टीच्या वादयांचीही स्वतःची अशी खास शैली तयार होत होती आणि त्यामुळे दोन पृथगात्म संगीतप्रकारांची निर्मिती झाली होती. व्हेरिएशन हा पहिला, दुसरा जरा गुंतागुंतीचा होता. तत्कालीन नृत्यशैलीपासून हा निर्माण झाला आणि त्यात धीमा पॅव्हन आणि द्रूत गॅलिआर्ड यांच्या गतीतील विरोध अंतर्भूत झालेला असे. नंतरच्या काळातील अनेक संगीतप्रकारांचा हा उगम मानता येईल. ‘स्वीट’ (suite, अनुसरण. नृत्यशैलीतील विविध हालचालींच्या साथीसाठी वापरली जाणारी वादयसंगीतरचना. पुढे गीतरचनाकार वेगवेगळ्या संगीतप्रकारांतले आकर्षक तुकडे निवडून त्यांचा संकलित रचनाबंध ‘स्वीट’ म्हणून सादर करू लागले. ‘ओव्हरचर’ हाही स्वीटचाच एक प्रकार. संगीतक (ऑपेरा) सुरू होण्यापूर्वी त्यातल्या भाववृत्तीची झलक दाखविण्याकरिता, त्यातलेच  तुकडे  घेऊन  या  प्रकारचा  स्वीट  सादर  केला  जातो. ह्या अर्थाने ही स्वरमाध्यमातील नांदीच म्हणता येईल) ⇨ सोनाटा, सिंफनी, स्ट्रिंग क्वार्टेट (२ व्हायोलिन्स, १ व्हायॉल व १ व्हायोलिन चेलो अशा व्हायोलिन-वादयगटातील चार तंतुवादयांची एकत्रित संगीतरचना) आदी संगीतप्रकारांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. वादयांची सफाईदार मिश्रणे करण्याचे प्रयत्न संगीतप्रकारांची विविधता अनेक देशांची भरघोस कामगिरी आणि प्रभावी संगीतरचनाकारांचा उदय, या सर्व बाबतींत १६००-१७५० हा कालखंड महत्त्वाचा ठरतो. [→ वादय व  वाद्दवर्गीकरण].

संगीतात बदल घडवून आणणारी आणखी एक घटना म्हणजे, संगीताचा  उपयोग  नाटकासाठी  करून  पाहणे [→ संगीतक. → ऑरेटोरिओ].एक-आवाजी एकल गायनाची स्वतंत्र शैली रेसिटटीव्ह ही रूपास आली. आधारभूत स्वरावली पुरविण्यापुरती वादयसाथ या शैलीत मर्यादित राहिल्याने संहती वा धून या स्वरसंघटनाच्या मार्गाचा नीट अभ्यास शक्य झाला. नाट्यात्म संगीताची नवी चळवळ इटलीमध्ये प्रथम सुरू होऊन एकोणिसाव्या शतकापर्यंत हा देश आघाडीवर राहिला. याच काळात आरिआ महत्त्वाच्या पदवीस पोहोचला. बहुधुनयुक्त आणि संवादात्म संगीतात नवी समीकरणे पुढे येऊ लागली. या कारणाने काही फरक नजरेस येऊ लागले :(१) मेजर व मायनर स्केल्सचा प्रभाव वाढत राहिला. (२) लयखंडांचे निर्देश अधिक नेमके होऊ लागले. असे पूर्वी नव्हते. ⇨ जोव्हान्नी पॅलेस्ट्नीना (सु. १५२५-९४) या इटालियन संगीतकाराच्या काळात अनेक वेळा संगीत स्तंभरेषांशिवाय लिहिले जाई. (३) स्वतंत्रपणे महत्त्वाचे तत्त्व म्हणून स्वरसंवादांचा वापर होऊ लागला. स्वरधुनीच्या भाषेत संगीतसंकल्पन होऊ लागले. (४) वादयसंगीताचा विकास होत असला, तरी त्यावरचा समूहगायनाचा पगडा उघड होता. व्हायॉल वादयकुटुंब मागे पडून व्हायोलिन कुटुंबाचा वरचष्मा वाढू लागला होता. [→ वादयवृंद  (ऑर्केस्ट्ना)]. (५) वादय-संगीताच्या मुख्य प्रकारांत द्विदल तत्त्वाचा बराच आढळ होत होता. यास आधार नृत्यलयीचा राही. ⇨ हँडल व ⇨ बाख यांसारख्या संगीत-कारांनी आलेमांद, साराबांद, ⇨ मिन्युएत, गिग वगैरेंपासून विविध व विपुल लयबंध उचलले, हे ध्यानात घेण्यासारखे आहे. उलटपक्षी कंठसंगीतप्रकार त्रिदल (टेर्नरी फॉर्म – त्रिदल बंध) असत. हजारो आरिआ याच नकाशाप्रमाणे रचले गेले.

या पार्श्वभूमीवर १९०० पर्यंतची दीडशे वर्षे सोनाटा, सिंफनी ⇨ पियानो आणि लिएड यांची म्हणायला हरकत नाही.[→ चेंबर म्युझिक]. प्रस्तुत कालखंडाच्या शेवटी तर सर्व संगीतात ⇨ बेथोव्हन (१७७०-१८२७) या जर्मन संगीतकारामुळे एक प्रकारची नाट्यात्मता आली. नाट्यवृंव्यवस्था स्थिर झाली व हार्पसिकॉर्डची पार्श्वभूमी घेण्याचा प्रघात मागे पडू लागला. पिआनोफोर्तेचा आधीच्या काळात लागलेला शोध जोरावर येऊ लागला होता. ⇨ शूबर्ट वगैरे संगीतरचनाकारांची  गीते (लिएड) याच कालखंडातील होत. स्वच्छंदतावादी काल-खंडातल्या साहित्य वा चित्रकलेप्रमाणेच बेथोव्हनपासूनचे संगीतही प्रगट व जोरदार आत्माविष्कार करते झाले. यानंतरच्या चळवळी राष्ट्रीय संगीत व संस्कारवादी (इंप्रेशनिस्ट) संगीत या होत. या संदर्भात राष्ट्रीय संगीताबाबत आणि संगीतिकेस निराळे वळण देण्याबाबत ⇨ व्हाग्नर ची  कामगिरी महत्त्वाची होय. मुक्त बहुधुनी व संवादानुसारी रचनांत व्हाग्नरने आगळ्या स्वनरंगांचीही भर घातली. ⇨ योहानेस बाम्झ (१८३३-९७) या जर्मन संगीतकाराने याच विचारांचा पाठपुरावा केल्यामुळे ‘सिंफनिक पोएम’चा (काव्य वा अन्य साहित्य प्रकारापासून स्फूर्ती घेऊन केलेली वादयवृंद रचना) जन्म झाला आणि प्रोगॅम म्यूझिकने मूळ धरले. १९०० नंतर स्वच्छंदतावादी संगीतास विरोधी संगीत पुढे आले. स्वनैक्य, स्वनविरोध भेद जवळजवळ नष्ट झाला आहे. ‘ की ’- पद्धतीने आता रचना होत नाही वादयांचे वापर पूर्णपणे निराळ्या पद्धतीने होतात. संगीतप्रकारांची  उभारणी ही निराळ्या प्रकारे होते. आतापर्यंत प्रघातात असलेल्या स्वरांतरापेक्षा लहान स्वरांतर वापरण्याकडेही बराच कल असतो. इ. स. १९०० पासूनच्या महत्त्वाच्या संगीत शैली वा प्रवृत्ती म्हणून पुढीलांचा निर्देश करता येईल : अभिव्यक्तिवाद, अटोनॅलिटी, सीरिअल म्यूझिक, नव-अभिजाततावाद. नंतर दुसऱ्या महायुद्धा-नंतरच्या काळात इलेक्ट्रॉनिक म्यूझिक, एलिएटरी म्यूझिक व म्यूझिक काँकीट हे प्रकार प्रभावी ठरले. पहिल्या महायुद्धानंतरच्या काहीशा धाडसी व बऱ्यापैकी प्रचारात आलेल्या संगीत-प्रयोगशीलतेत अमेरिकन संगीतकार शोएनबर्गचा (१८७४-१९५१) सिंहाचा वाटा होता. स्वरसंवादतत्त्व आणि रूप वा घाट देणाऱ्या संगीत तत्त्वांऐवजी त्याने ‘अटोनॅलिटी’चा पुरस्कार केला. जवळजवळ त्याच सुमारास लयबंधांबाबत नवीन वाटा धुंडाळल्या, त्या ⇨ बेलॉ बॉर्टोक (१८८१-१९४५) या हंगेरियन व ⇨ स्ट्नाव्हिन्स्की (१८८२-१९७१) या रशियन संगीतकारांनी. झां कोक्तो या फ्रेंच लेखकाने म्हटल्या-प्रमाणे, ‘रेशमी कुंचल्याने रेखले जाणारे संगीत आता कुऱ्हाडीच्या घावाने सिद्ध होऊ लागले’. नॉईज म्यूझिक, नवकालवाद, मोटरिझम व मशीन म्यूझिक इ. आविष्कार अवतरले. क्वॉर्टर टोन म्यूझिकही रचले जाऊ लागले. १९२० च्या आरंभीची नव-अभिजाततावादाची चळवळ पुन्हा एकदा सतराव्या-अठराव्या शतकांतील सौंदर्यकल्पना व सांगीत बांधणी यांना नव्या प्रकारे अनुसरण्याचा प्रयत्न करू लागली. बॉर्टोक, स्ट्नाव्हिन्स्की, पॉल हिंडेमिथ (१८९५-१९६३) यांसारख्या संगीतकारांनी यांत पुढाकार घेतला.

पहा : संगीत.

संदर्भ : 1. Abradale Press, Pub., The World of Music, ४ Vols., New York, 1963.

            2. Apel, Willi, the Harvard Dictionary of Music, London, 1960.

            3. Arnold, Denis, Ed. The New Oxford Companion to Music, 2 Vols. New York, 1995.

            4. Boult, Sir Adrian Herbage, Julian, Music, London.

            5. Boyden, David D. An Introduction to Music, New York, 1963.

            6. Grout, Donald  Jay, A  History  of  Western  Music,  London,  1962.

            7. Indian Council for Cultural Relations, Pub., Music : East and West, New Delhi, 1966.

            8. Sargent, Sir Malcolm, the Outline of Music, London, 1962.

            9. Taylor, Deems Kerr, Russell, Ed., Music Lovev’s Encyclopedia, London, 1955.

रानडे, अशोक दा.