किराणा घराणे : भारतीय (हिंदुस्थानी) संगीतातील एक प्रसिद्ध घराणे. किराणा (कैराना) हे कुरुक्षेत्राजवळील एका गावाचे नाव. ह्या गावाचे सुप्रसिद्ध बीनकार ð बंदे अली खाँ हे या घराण्याचे मूळ पुरुष म्हणून सांगण्यात येतात.  तथापि गायकीत हे घराणे लोकप्रिय करण्याचे श्रेय ð अब्दुल करीमखाँ  यांनाच द्यावे लागेल. अब्दुल करीमखॉंनंतर या घराण्यात अनेकविध गायकी दाखल झाल्याने तीत पुढे भर वा भेद पडलेला आहे.

किराणा घराण्याची गायकी मुख्यतः तंत-अंगाची आहे. तंत-अंग म्हणजे बीनवादनाचे अंग. तंबोरे अत्यंत सूक्ष्मपणे आणि सर्व अंगांनी जुळविण्याचे व त्यांना बोलते करण्याचे असामान्य कसब या घराण्यात दिसून येते. तंबोऱ्यांच्या जोडीतला एक तंबोरा पंचमात आणि दुसरा निषादात लावण्याची प्रथा अब्दुल करीमखाँनीच प्रथमतः सुरू केली.  जाहीर जलसे लोकप्रिय करण्याचेही श्रेय बव्हंशी त्यांनाच आहे.  या घराण्यातील गायक आवाज दाबून लावतात.  शिवाय त्यांच्या स्वराची पट्‌टीही अंच असते.  त्यामुळे त्यांचे गायन श्रवणमधुर वाटले, तरी आवाजात कृत्रिमता डोकावते आणि गळ्यावर फाजील ताण पडताना दिसतो.  मात्र स्वरांचे अनेक प्रकारांनी आकुंचन-प्रसरण करण्याचे रंजक कौशल्य या गायकीत भरपूर प्रत्ययाला येते.  ग्वाल्हेर घराण्यात गातात, त्याप्रमाणे अस्ताई-अंतऱ्याची संपूर्ण बंदीष या घराण्यात रेखीवपणाने सर्व वेळी गातातच, असे नाही.  गाताना सुरुवातीस लय अत्यंत विलंबित ठेवतात. राग नित्याच्या प्रचारातले व सोपे असतात तसेच तालही. गायकीत बिलंपदाला अतिशय प्राधान्य असते आणि आलापी बहुतकरून आ-कारयुक्त रीतीने चालते.  स्वराची आस चांगली कायम राखून आलापीत एकेक स्वर क्रमाने दाखल करीत रागविस्तार केला जातो आणि सोप्या, सरळ रागांमुळे हे पुष्कळ शक्य होते आणि चांगलेही वाटते. आलापीमधली स्वरगुच्छांची विविधता व स्वरांबरील ठेहराव ही श्रवणीय असतात.  संथ व संयत अशा आलापप्रधान गायकीमुळे दरबारी कानडा, मियाँ मल्हार, तोडी, ललित, मालकंस, शुद्ध कल्याण, पूरिया इ. पूर्वांगप्रधान राग सरस व परिणामकारक वठतात. सुरेलपणा हा या गायकीचा आत्मा असून ते त्यायोगे मैफल धुंद करून, ती कारुण्य व जिव्हाळा यांनी प्रायः भरून टाकतात.  या घराण्यातील गायक तंबोरे ऐकून गात असल्याने षड्‌जाचा सतत सूक्ष्म कानोसा घेतात. आलापीच्या मानाने तानेला या गायकीत दुय्यम स्थान असते आणि गमकालंकारही विशेष चांगले वठत नाहीत.  तानांची रचनाही फारशी गुंतागुंतीची नसते. ख्याल, ठुमरी, नाटकीय पदे, भजने यांतील कोणत्याही प्रकारामध्ये हे गायक खास असा ढंग आणीत नाहीत. या घराण्याची सरगम सौष्ठवयुक्त असून ठुमरीत ती विशेष शोभिवंत दिसते. पूरब, बनारसी, पंजाबी या अंगांच्या ठुमरीपेक्षा किराणा घराण्याची ठुमरी काहीशी वेगळी आहे. तीत अभिजात अंगाचे प्राबल्य आढळते.  ही ठुमरी बोल-अंगापेक्षा स्वर-अंगाने अधिक नटविली जाते त्यामुळे शब्दांचे किंवा बोलफेकीचे महत्त्व तीत मध्यम दर्जाने नांदते. दीपचंदी अथवा अर्धी धुमाळी या तालांत ती गाइली जाऊन अखेरीस दुगणीने तिचा शेवट होतो. या घराण्यात ð टप्पा हा गायनप्रकार नाही. अब्दुल करीमखाँ, वहीदखाँ, ð सवाई गंधर्व, हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, फिरोज दस्तुर, दशरथबुवा मुळे, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, गणपतबुवा बेहेरे, रोशन आरा बेगम, माणिक वर्मा ही या घराण्यातील प्रसिद्ध गायक मंडळी.

संदर्भ : १. देशपांडे, वामन हरी, घरंदाज गायकी, मुंबई, १९६१.

२. मारुलकर, ना. र. संगीतातील घराणी, पुणे, १९६२.

मंगरूळकर, अरविंद