चतुरंग : उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील एक जुना गायनप्रकार. बाराव्या शतकापासून तो रूढ असल्याचे दिसते. ‘चतुर्मुख’ या नावाने त्याचा निर्देश सोमेश्वरलिखित मानसोल्लास  वा अभिलषितार्थचिंतामणि (११२७) या ग्रंथात आढळतो. ह्या गायनप्रकारात अस्ताई व अंतरा हे दोन विभाग धृपद या शास्त्रीय गायनप्रकारासारखे बंदिस्त व सार्थ शब्दांत रचलेले असतात. त्यानंतरचा विभाग ‘सा, रे, ग, म’ आदी स्वरनामांनी गुंफलेला असतो आणि शेवटच्या म्हणजे चौथ्या विभागात तबला वा पखवाज या तालवाद्यांचे बोल वापरलेले असतात. रागसंगीताचे नियम पाळून रचलेल्या ह्या गायनप्रकारात विस्ताराला फारसा वाव नसतो. विविधता हेच त्याचे वैशिष्ट्य होय. आजकाल हा फारसा गायला जात नाही.

रानडे, अशोक