सुंदरी : (सुंद्री ). सुषिर-लोकवाद्य गटातील एक वाद्य. ओठांनी फुंकून वाजवण्याचे म्हणजे ओष्ठस्वनित असे हे ⇨ सनईसदृश वाद्य आहे. सुंदरीची रचना व वादन पध्दती सनईसारखीच असते. सनईच्या दुप्पट वरच्या सप्तकात वाजणारी सुंदरी वीतभर लांबीची असून हिचा कर्णा धातूचा असतो. दोन पत्तींच्या (वाजत्या जिव्हाळ्या) मुखवीणा वाद्यवर्गात सुंदरीचा समावेश होतो. मुखवीणा सामान्यत: दुसऱ्या टोकाला काहीशी रुंदावत गेलेली लांब नळी असते. सुंदरी वाद्यात ही नळी २५ सेंमी. लांब असते. तिच्यावर स्वरांसाठी सात छिद्रे असतात. वाद्यशास्त्रीय वर्गातील कंपित वायुस्तंभ ( ओठांनी फुंकर मारुन पोकळ नळीतील हवेचा पट्टा हालवून निर्माण केले जाणारे नादध्वनी ) प्रकारात हे वाद्य मोडते. ध्वनिनियंत्रण हे ओठांची हालचाल व फूंक मारताना दिलेला दाब यांच्याद्वारे करता येते. संगीतसार या ग्रंथात ‘सुनारी’ नामक वाद्याचे जे वर्णन आहे, ते बहुधा महाराष्ट्रातील सध्याच्या प्रचलित सुंदरी वाद्याचे असावे. सुंदरी हे लोकवाद्य उत्तरेकडे – विशेषः महाराष्ट्रात – जास्त प्रचलित आहे. स्वतंत्र वादनापेक्षा ⇨ वाजंत्री च्या सामूहिक वादनात या वाद्याचे महत्त्व जास्त आहे. त्याचा आवाज सनईइतका मधूर नसला, तरी त्यात सर्व कमगत होऊ शकते. सनई, सुंदरी व तत्सम प्रकारची वाद्ये देवळे, कौटुंबिक पूजाअर्चा, धर्मविधी, मिरवणुका, समूहनृत्ये वा लोकनृत्ये इ. प्रसंगी वापरली जातात.

वैशंपायन, भारती