संगीत नाटक अकादमी : संगीत, नृत्य व नाटक या कलांच्या विकासार्थ भारत सरकारतर्फे स्थापण्यात आलेली राष्ट्रीय संस्था. या अकादमीचे उद्धाटन दिनांक २८ जानेवारी १९५३ रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले. नवी दिल्ली येथे तिचे मुख्यालय आहे. सध्या केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील ती एक स्वायत्त संस्था असून तिला केंद्रीय शासनाचे पूर्ण अर्थसाहाय्यआहे. अकादमीच्या स्थापनेमागचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भारतीय नृत्य, नाटक व संगीत ह्या प्रयोगीय कलांच्या (पर्‌फॉमिंग आर्ट्स) अभ्यासास व विकासास उत्तेजन देऊन त्या द्वारा भारताचे सांस्कृतिक ऐक्य साधणे, हे होय. ह्या शिवाय निरनिराळ्या राज्यांतील प्रादेशिक कला संस्थांच्या कार्यात सुसूत्रता व समन्वय साधणे नृत्य, नाटक, संगीत या कलाक्षेत्रांतील व्यासंग व संशोधन ह्यांस प्रोत्साहन तसेच आर्थिक अनुदान देणे कलाशिक्षण संस्था स्थापण्यात पुढाकार घेणे वा त्या चालविण्यास उत्तेजन व अर्थसाहाय्य देणे प्रादेशिक पारंपरिक संगीतादी कला आणि लोककला यांचे जतन व विकास  करणे मुख्यत: अस्तंगत होत चाललेल्या लोककलांना आणि आदिवासी कलांना आश्रय देऊन त्यांचे पुनरूज्जीवन घडविण्यास साहाय्य करणे इ. अनेक प्रकारची व अनेक स्तरांवरची कामे संगीत नाटक अकादमीच्या कार्यकक्षेत येतात. ह्याशिवाय नृत्य, नाटक, संगीत ह्या कलांचे महोत्सव भरविणे कला प्रदर्शने, चर्चासत्रे आयोजित करणे तसेच प्रयोगीय कलांच्या क्षेत्रातील गुणी, प्रतिभासंपन्न कलावंतांना प्रतिवर्षी पारितोषिके, सन्मानचिन्हे देऊन गौरविणे, अशा प्रकारची कामेही अकादमीमार्फत करण्यात येतात. अकादमीने कलाशिक्षण क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. अकादमीच्या पुढील शाखा आहेत : (१) जवाहरलाल नेहरू मणिपुरी डान्स अकॅडमी, इंफाळ (१९५४), (२) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली (१९५९), (३) कथ्थक केंद्र, नवी दिल्ली (१९६४) आणि (४) रवींद्र रंगशाला, नवी दिल्ली. ‘कथ्थक केंद्रात’ कथ्थक नृत्य व संगीत शिकविले जाते, तर  ‘जवाहरलाल नेहरू मणिपुरी डान्स अकॅडमी ’ मध्ये मणिपुरी नृत्य व इतर पूरक कलांचे शिक्षण दिले जाते. १९५७ पासून ‘जवाहरलाल नेहरू मणिपुरी डान्स अकॅडमी’ ने आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. मणिपूरमधील अभिजात नृत्यांचे व लोकनृत्यांचे त्यांच्या मूळ रूपात जतन व विकास करण्याचे उद्दिष्ट बाळगून त्या दिशेने संस्थेचे कार्य चालू आहे. ह्या दोन्ही कलाशिक्षणसंस्थांचे व्यवस्थापन अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या नियमनाखाली चालते. त्या कामी ह्या दोन कलाशिक्षणसंस्थांच्या सल्लागार मंडळांचे साहाय्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाला लाभते. याशिवाय संगीत नाटक अकादमीने ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अँड एशियन थिएटर’ ही नाटय्शिक्षणसंस्था १९५९ मध्ये स्थापन केली. पुढे १९७५ मध्ये  ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या नावाने ती स्वायत्त संस्था म्हणून अस्तित्वात आली. केवळ नाटय्क्षेत्रात (रंगभूमीविषयी) शिक्षण-प्रशिक्षण देणारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एन्.एस्.डी.) ही भारतातील एकमेव संस्था असून जगातील रंगभूमी क्षेत्रातील ती एक अगगण्य संस्था मानण्यात येते. या संस्थेचे उद्दिष्ट नाट्यकलेशी संबद्ध विविध अंगांचे विशेषतः रंगभूमीचा इतिहास, नाट्यनिर्मिती, (नाटकाचा) प्रवेश वा दृश्य यांचा  अभिकल्प (आकृतिबंध), वेशभूषा, प्रकाशयोजना, रंगभूषा व प्रसाधन इ. सर्व प्रकारचे प्रशिक्षण विदयार्थ्यांना देणे हे आहे. संस्थेने एक ‘ रेपर्टरी कंपनी ’ नावाचा पार्श्वपट (विंग) सुरू केला (१९६४) असून त्याव्दारे व्यावसायिक रंगभूमी व प्रायोगिक रंगभूमी या दोन्हींना उत्तेजन देऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एन्.एस्.डी.ने १९८९ मध्ये ‘ संस्कार रंग तोली ’ (थिएटर इन एज्युकेशन) ही खास कुमारांच्या रंगभूमीला वाहिलेली आणि कुमारांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारी, स्वतंत्र उपसंस्था स्थापन केली. या संस्थेतून कुमारांसाठी नाटय्लेखनही करून घेण्यात येते. शिवाय दिल्लीतील विदयालयांतून रंगभूमीच्या प्रसार-प्रचारार्थ कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. एन्.एस्.डी.ने १९९८ पासून मुलांसाठी राष्ट्रीय स्तरावर रंगभूमी या वार्षिक उत्सवाचे आयोजन केले आहे. त्याला त्यांनी ‘जश्ने बचपन’ हे नाव दिले आहे. हाच उत्सव भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात म्हणजे १९९९ मध्ये ‘ भारत रंग महोत्सव ’ या नावाने संपन्न झाला. आता हा उत्सव एक वार्षिक सणच झाला आहे. अलीकडे एन्.एस्.डी.ने प्रादेशिक संशोधन केंद्र (रिजनल रिसर्च सेंटर) कर्नाटकातील बंगलोर येथे सुरू केले आहे. या केंद्राव्दारे दक्षिण भारतातील चार राज्ये आणि पाँडेचरी येथील नाट्यकलेविषयीच्या समस्या, प्रश्न व गरजा यांचा विचारविनिमय केला जातो व त्या बाबतीत  ठोस उपाययोजना केल्या जातात. एन्.एस्.डी. ही संस्था रंगभूमीविषयक पाठ्यपुस्तके प्रकाशित करते तद्वतच इंगजी भाषेतील अभिजात नाटकांचे हिंदीतील अनुवाद प्रसिद्घ करते. या संस्थेव्दारे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम घेतला जातो, मात्र ही पदविका भारतातील सर्व विदयापीठांत पदव्युत्तर पदवीच्या दर्जाची मानली जाते. विदयार्थ्यांना पीएच्. डी.साठी संशोधनही करता येते आणि त्यांची प्राध्यापक/अधिव्याख्याता म्हणूनही महाविदयालये/विदयापीठे यांतून नियुक्ती होऊ शकते. एन्.एस्.डी.ने आसाममधील सनिया संगीत, नृत्य आणि रंगभूमी (नाट्य) व तदानुषंगिक कलांना उत्तेजन देण्यासाठी सहायक प्रकल्प २००२ मध्ये सुरू केला आहे.

संगीत नाटक अकादमीने राष्ट्रीय महत्त्व असलेले काही स्पृहणीय प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांपैकी केरळमधील कुटियात्तम रंगभूमीला १९९१ मध्ये प्रारंभ केला. त्याला युनेस्कोने २००१ मध्ये मान्यता दिली. तसेच ओरिसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील छाऊनृत्य प्रकारावरील प्रकल्प १९९४ मध्ये हाती घेतला. याशिवाय नव्या कलाशिक्षणसंस्था स्थापणे किंवा जिथे शक्य व सोयीस्कर असेल, तिथे अशा जुन्या संस्था चालविण्यासाठी ताब्यात घेणे, ही कार्येही अकादमीच्या अखत्यारीत येतात. याशिवाय कथकळी, भरतनाट्यम्, कथ्थक, कूचिपूडी, ओडिसी, छाऊ इ. नृत्यप्रकारांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना अकादमीमार्फत मदत व अनुदान दिले जाते. अकादमीने अनेक राज्ये शासकीय व मान्यताप्राप्त खाजगी कलासंस्थांना मान्यता व अनुदाने दिली आहेत. अकादमीचे कार्य सर्वसाधारण परिषद, कार्यकारी मंडळ, वित्त समिती आणि इतर स्थायी वा तदर्थ (ॲड्हॉक) समित्या यांच्या मार्फत चालते. स्थायी व तदर्थ समित्यांवरील सदस्यांच्या नेमणुका सर्वसाधारण परिषद व कार्यकारी मंडळ यांच्या मार्फत केल्या जातात. सर्वसाधारण परिषदेमध्ये अध्यक्ष, आर्थिक सल्लागार, भारत सरकारतर्फे नियुक्त केले जाणारे काही सदस्य राज्यशासनातर्फे नेमल्या जाणाऱ्या नामनिर्देशित व्यक्ती साहित्य अकादमी व ललित कला अकादमी या संस्थांचे एकेक प्रतिनिधी तसेच नृत्य, नाटक, संगीत या क्षेत्रांतील जेष्ठ मान्यवर कलावंत व कला-तज्ज्ञ, यांच्याही नियुक्त्या अकादमीवर केल्या जातात. याशिवाय केंद्र शासनाचे वैज्ञानिक संशोधन, सांस्कृतिक व्यवहार, माहिती व प्रसारण ह्या खात्याचे प्रतिनिधीही अकादमीवर नियुक्त केले जातात.


अकादमीने हाती घेतलेले एक प्रमुख कार्य म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांत प्रचलित असलेल्या पारंपरिक लोककलांचे सर्वेक्षण, संशोधन व प्रलेखपोषण करण्यासाठी खास योजना राबविणे, आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग म्हणून त्यांची नोंद ठेवून त्या मूळ रूपात जतन करणे, त्यांच्याविषयी संशोधनपर साहित्य प्रकाशित करणे वा प्रकाशनास आर्थिक साहाय्य करणे इ. कार्ये अकादमीमार्फत केली जातात. त्याशिवाय आंतर-राज्यीय सांस्कृतिक आदान-प्रदानाचे वा विनिमयाचे कार्यक्रम राबविणे, परदेशांबरोबरही सांस्कृतिक देवाण-घेवाण वा विनिमय घडविणे, अशा योजना अकादमी कार्यान्वित करीत असते. अकादमीने रोम, हाँगकाँग, मॉस्को, अथेन्स, व्हल्लाडोलिड, कैरो, ताश्कंद आदी शहरांत प्रदर्शने व चर्चासत्रे आयोजित केली होती. प्रयोगीय कलांत कार्य करणारी ही सर्वोच्च संस्था असल्याने, ती या कलांच्या संदर्भातील धोरण व प्रकल्प यांसंबंधी केंद्र शासनाला प्रसंगोपात्त सल्ला देते.

नाट्य व रंगभूमीविषयक मान्यताप्राप्त संस्थांना नाटय्प्रकारांचे सर्वेक्षण करण्यासाठी, रंगभूमीविषयक कार्यशाळा चालविण्यासाठी तसेच नाट्यमहोत्सव भरविण्यासाठी अकादमी साहाय्य करते. प्रादेशिक भाषांतील तरूण रंगकर्मी, नाटककार व नाट्यदिग्दर्शक यांना अकादमीमार्फत पारितोषिके देऊन प्रोत्साहित केले जाते. प्राचीन व दुर्मीळ नाट्यविषयक हस्तलिखिते प्रकाशित करण्यासाठी तसेच नृत्य, नाटक, संगीत क्षेत्रांतील तज्ज्ञांना त्यांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी अकादमी अनुदानाव्दारे आर्थिक साहाय्य करते.

हिंदुस्थानी व कर्नाटक संगीतांतील वैशिष्ट्यपूर्ण गानपरंपरा जोपासण्या-साठी निरनिराळ्या श्रेष्ठ व मान्यवर गायकांच्या गायनाचा मोठा खजिनाच अकादमीने ध्वनिमुद्रित करून ठेवला आहे. संगीतातील वेगवेगळ्या घराण्यांच्या श्रेष्ठ व अगगण्य गायकांचे गायन ध्वनिमुद्रित करून त्या घराण्यांच्या गानशैली अकादमीने जतन केल्या आहेत. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांतील वैशिष्ट्य-पूर्ण लोकसंगीताचे ध्वनिमुद्रित संकलन अकादमीच्या संगही आहे तसेच    मणिपुरी रास, कथकळी, कथ्थक, भरतनाट्यम् , भागवतमेळा, कूचिपूडी इ. नृत्यप्रकारांचे नृत्यसंगीतही अकादमीने ध्वनिमुद्रित केले आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांतील लोकनृत्यांची छायाचित्रे, दृक्ध्वनिफिती इ. सामग्रीही अकादमीने जतन केली आहे.

अकादमीचे समृद्ध गंथालय कलांचा अभ्यास व संशोधनकार्यासाठी विशेष उपयुक्त आहे. शिवाय संगीतवादये, वेशभूषा-प्रकार, मुखवटे, कळसूत्री बाहुल्या यांचे दालन आहे.

अकादमीने गंथसंग्रहाबरोबरच काही कलाविषयक गंथ, नियतकालिके  इ. स्वतः प्रकाशित केली आहेत. फोक म्यूझिकल इन्स्टु्नमेंटस्, क्लासिकल इंडियन डान्स इन लिटरेचर अँड द आर्टस् , अँथॉलॉजी ऑफ वन हंड्रेड साँग्ज ऑफ रवींद्रनाथ टागोर, हूज हू ऑफ इंडियन म्यूझीशन्स ही अकादमीने प्रकाशित केलेली काही महत्त्वपूर्ण पुस्तके. याशिवाय संगीत नाटक हे    त्रैमासिक अकादमीतर्फे १९६५ पासून प्रकाशित केले जाते.

अकादमीने पहिला राष्ट्रीय संगीत महोत्सव १९५४ मध्ये पुरस्कृत केला. त्यात भारतीय अभिजात व लोकसंगीतातील सर्व प्रकारांचा व गानशैलींचा समावेश होता. हिंदुस्थानी व कर्नाटक संगीतांतील श्रेष्ठ गायक-वादकांचा त्यात सहभाग होता. त्याच वर्षी (१९५४) पहिला नाट्यमहोत्सवही अकादमीतर्फे भरविण्यात आला. त्यात संस्कृत तसेच सर्व आधुनिक भारतीय भाषांतील नाटके इंगजी नाटकांसह, सादर करण्यात आली. १९५५ मध्ये राष्ट्रीय नृत्य-महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात भारतातील अनेक प्रादेशिक लोकनृत्य प्रकारांचाही समावेश होता. उदा., सेराईकेला व मयूरभंजचे छाऊ नृत्य, आसामचे सत्रीय, ओरिसाचे ओडिसी, आंधचे कूचिपूडी इत्यादी. त्यामुळे त्या त्या विशिष्ट प्रदेशापुरतीच सीमित असलेली व अन्यत्र फारशी ज्ञात नसलेली, ही प्रादेशिक नृत्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथमच प्रकाशात आली व मान्यता पावली.

अकादमीतर्फे जी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली, त्यांत चित्रपट (१९५५), नाटक (१९५६), संगीत (१९५७), व नृत्य (१९५८) ह्या विषयांवरील चर्चासत्रांचा समावेश होता. संगीत व नृत्यविषयक चर्चा-सत्रांना त्या त्या कलाविष्कारांच्या जाहीर प्रयोगांची जोड देण्यात आली  होती. याशिवाय अकादमीने मर्यादित प्रमाणावर लहान लहान अनेक चर्चासत्रेही भरविली. उदा., संगीतातील ख्यालविषयक कार्यशाळा, धृपद महोत्सव, लोकसंगीतवादयांचा शास्त्रीय अभ्यास, या विषयांवरचे चर्चासत्र इत्यादी. इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे औचित्य साधून त्याच सुमारास अकादमीने रामायणा वर प्रदर्शन भरविले. तसेच गालिबची जन्मशताब्दी अकादमीने नृत्य व गझलांचा महोत्सव आयोजित करून साजरी केली. याशिवाय अकादमीने वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर प्रदर्शने भरविली. उदा., रूमानियाची रंगभूमी व नाट्यकला, आदिवासी व लोकसंगीतातील वादये, रशियन नाट्यकला इ. विषयांवरील प्रदर्शने पारंपरिक व लोक-रंगभूमी, नृत्य, संगीत या विषयांवरील छायाचित्र–प्रदर्शने अकादमीने अलाहाबाद, बंगलोर, हैदराबाद, लखनौ इ. शहरांतून भरविली. मार्च १९७३ मध्ये अकादमीने सु. ३०० छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले, त्यात अकादमीच्या गेल्या वीस वर्षांतील कार्याचा चित्ररूप आढावा घेतला होता. ह्या छायाचित्र-प्रदर्शनात अकादमीने वीस वर्षांत सादर केलेले विविध कलाविषयक कार्यक्रम, महोत्सव, चर्चासत्रे, प्रलेखपोषण, कलावंतांच्या पारितोषिक-प्रदानाचे गौरव समारंभ, कलाशिक्षणाचे उपक्रम इ. अकादमीच्या सर्वांगीण कार्याचा सचित्र आढावा होता. २००७ पर्यंत अकादमीच्या गॅलरी-मध्ये सु. ६०० संगीत उपकरणे-वादये यांचा संग्रह हांता. ह्या संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंतची छायाचित्रे व पारदर्शिका दृक्श्राव्य फितीत येथील अभिलेखागारात १६ एम्. एम्. फिल्मच्या रूपात उपलब्ध आहेत. अशा रीतीने स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजतागायत अकादमीने प्रयोगीय कलाक्षेत्रांत असंख्य नवनवे उपक्रम व कार्यक्रम राबवून भारतीय संस्कृतीला संजीवन व नवजीवन देण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे.

इनामदार, श्री. दे.