भैरवी थाटातील राग : हिंदुस्थानी संगीतपद्धतीतील या थाटाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सातही स्वर कोमल असतात. भैरवी ही आश्रय ‘रागिणी’ मानण्यात येते व हिंदुस्थानी संगीताच्या कार्यक्रमात ही नेहमी शेवटी सादर करण्याचा प्रघात दृढमूल झालेला दिसतो. पं. भातखंडे यांच्या राग-वर्गीकरण पद्धतीनुसार या थाटात भैरवी, सिंधभैरवी, मालकंस, चंद्रकंस, बिलासखानी तोडी, मोरवी, भूपाल तोडी, उत्तरी गुणकली, वसंत मुखारी यांचा मुख्यतः समावेश होतो. भैरवी रागात धृपदरचना विपुल तद्वतच ठुमऱ्या इ. सुगम रचनाही आढळतात. यावरून भैरवीची समावेशकता ध्यानात येते.

संदर्भ : भातखंडे, वि. ना. भातखंडे संगीतशास्त्र, भाग ४, हाथरस, १९५७.

रानडे, अशोक