सोनाटा : पाश्चात्त्य संगीतातील साधनात्मक स्वरलिपी किंवा संगीतलेखन. हे संगीतलेखन पियानो, व्हायोलिन, चेलो इ. विशिष्ट वाद्यांसाठी केलेले असते. सर्वसाधारणपणे ही रचना तीन किंवा चार विभागांत (रचलेली) असते. सोनाटाचे वैकासिक रूप इटालियन संगीतात प्रामुख्याने दृग्गोचर होते. सोनाटा या रचनेचे जे भाग असतात, त्यांना गती (मूव्हमेंट्स) असे म्हणतात. सोनाटा रचनेत चार प्रकारच्या गतींचा समावेश होतो. त्या पुढीलप्रमाणे : (१) ॲलिग्रो (Allegro) किंवा संथ लयीतील उत्साही रचना. यात फक्त लयच संथ नसते, तर त्यातील स्वराकृतीही तुलनेने साध्या आनंददायी असतात. (२) लार्गो (Largo)–मध्य लयीतील रचना. यामध्ये मूळ स्वराकाराचा विस्तार असतो. (३) ट्रायो (Trio)–ही जलद लयीतील–विशेषतः नृत्य प्रकारास अनुकूल–रचना असते व (४) राँडो (Rondo)–ही द्रुत लयीतील शेवटी वाजविली जाणारी रचना असते.

पाश्चात्त्य संगीताच्या इतिहासात ‘बरोक’ कालखंडापासून (१५९०-१६३५) ते ‘शास्त्रीय’ किंवा ‘अभिजात कालखंडा ‘पर्यंत (क्लासिकल पीरिअड) (१७२५-१८३०) ‘सोनाटा ‘चे स्वरूप आणि व्याख्या काहीशी बदलत गेली आहे. बरोक कालखंडाअखेर या रचनेचे ‘चर्च सोनाटा’ आणि ‘चेंबर सोनाटा’ असे दोन प्रकार अस्तित्वात होते. नावा-प्रमाणे ‘चर्च सोनाटा’ चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी वाजविले जात असे, तर ‘चेंबर सोनाटा ‘चा उपयोग प्रामुख्याने नृत्य कार्यक्रमास साथ करण्यासाठी होत असे. अभिजात कालखंडात मात्र सोनाटाचे स्वरूप अधिक व्यापक होत गेले. तसेच त्यातील अलंकरणाचा भाग विकसित होऊन ते अधिक कलात्मक होत गेले. स्ट्रिंग्ज, ल्यूट आणि ऑर्गन या वाद्यांकरिता चर्च सोनाटा व चेंबर सोनाटा यांचे प्रत्येकी २४ प्रकार विकसित झाले आहेत.

वर उल्लेख केल्याप्रमाणे सोनाटाच्या रचनेत व सादरीकरणात कालमानानुसार परिवर्तन होत गेले. आज सोनाटाचा समावेश ‘कॉन्सर्टो ‘-प्रकारच्या संगीतरचनेतही केला जातो. त्यात जितके वादक असतील, त्याप्रमाणे तसेच वाद्यप्रकारानुसार सोनाटाचे स्वरूप बदलत जाते. काही वेळा ‘सिंफनी’ या रचनेतील एखादा छोटा भाग वाद्यवृंदासाठी स्वतंत्रपणे सादरीकरणासाठी वापरला जातो. त्यालाही सोनाटा मानले जाते. याशिवाय खास तंतूवाद्यासाठी वाजविली जाणारी ‘स्ट्रिंग क्वार्टेट’ (String Quartet) ही रचनासुद्धा सोनाटा प्रकारात समाविष्ट केली जाते.

सोनाटा या रचनाप्रकाराचा उगम, विकास आणि त्याच्या सादरी-करणाच्या पद्धती यांवर ज्या संगीतज्ञांनी संशोधन केले आहे, त्यात हेन्रिक शेनकर, अर्नोल्ड शोनबर्ग आणि चार्ल्स रोझेन यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. अभिजात पाश्चात्त्य संगीताच्या विकासात सोनाटाचे रचनाशास्त्र व त्याच्या सादरीकरणाच्या शैली या गोष्टींचा विशेष प्रभाव आढळतो. किंबहुना हा रचनाप्रकार सोनाटा या नावाने प्रचलित होण्यापूर्वीच तो अभिजात कालखंडात उत्क्रांत होऊ लागला होता, असे म्हणता येईल. याच कालखंडात संगीत कंठ्य प्रकाराकडून वाद्यसंगीताकडे झुकू लागले होते आणि संगीत सादरीकरणाच्या शैलीत लक्षणीय बदल घडून येत होते. अभिजात संगीतातील हे नवप्रवाह केव्हा व कसे रूढ झाले आणि सोनाटा हा प्रकार कसा विकसित झाला, यावर बरेच संशोधन झाले आहे. सोनाटा हा पाश्चात्त्य संगीतातील एक रचनाप्रकार असला, तरी त्याचे अभिजात संगीताच्या विकासात आणि उत्क्रांतीत महत्त्वाचे स्थान आहे.

पहा : संगीत, पाश्चात्त्य.

कुलकर्णी, रागेश्री