सुरेंद्रनगर : (वढवाण). भारताच्या गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, शहर व पूर्वीच्या वढवाण संस्थानची राजधानी. लोकसंख्या १,७७,८२७ (२०११). हे राजकोटच्या ईशान्येस १०६ किमी.वर भगवा नदीकाठी वसलेले आहे. हे लोहमार्गाचे प्रमुख प्रस्थानक आहे. येथून ओखा, भावनगर, गोध्रा, वेरावळ या ठिकाणी लोहमार्ग जातात.

हे शहर इ. स. १८६४ मध्ये वसविण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात हे वढवाण कँप किंवा वढवाण सिव्हिल स्टेशन म्हणून ओळखले जाई. ब्रिटिश राजकीय प्रतिनिधींचे मुख्यालय येथे होते. वढवाण संस्थानचा राजा सुरेंद्रसिंहजी यांच्या नावावरुन याचे सुरेंद्रनगर असे नामकरण इ. स. १९४७ मध्ये झाले. स्वातंत्र्य चळवळीत या शहराचा प्रमुख सहभाग होता. यास सौराष्ट्राचे प्रवेशद्वार असेही म्हणतात.

वढवाण

स्वातंत्र्योत्तर काळात शहराची झपाट्याने भरभराट होऊन हे जिल्ह्यातील उद्योगांचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथे तीन औद्योगिक वसाहती असून त्यांपैकी एक शासकीय, एक गुजरात औद्योगिक विकास महानगर (मर्यादित) व एक सहकारी तत्त्वावरील आहे. येथे काच कारखाना, खाद्य तेलाच्या गिरण्या, शेतमाल प्रक्रिया, साबणनिर्मिती, कापडनिर्मिती इ. उद्योग आहेत. येथून स्टोव्ह-बर्नर व कॅनव्ह्‌स कापडाची निर्यात होते. हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे.

येथे उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून यांमध्ये एम्. पी. शाह कला व विज्ञान महाविद्यालय, एम्. पी. शाह वाणिज्य व विधी महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्थांचा अंतर्भाव होतो. तसेच येथील ग्रंथालयांपैकी जवाहरलाल नेहरु ग्रंथालय विशेष प्रसिद्घ आहे. येथे महात्मा गांधी रुग्णालय, छोटालाल जमनादास रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांमार्फत रुग्णसेवा दिली जाते.

हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. येथील घड्याळ मनोरा (१८७२), ब्रिटिश राजकीय प्रतिनिधींचे बंगले, हिंदूंची मंदिरे, वढवाण राजवाडा, मशिदी व चर्च प्रेक्षणीय आहेत.

सोसे, आतिश सुरेश