माक्लिंटक, बार्बारा : (१६ जून १९०२ –      ). अमेरिकन कोशिका (पेशी) आनुवंशिकीविज्ञ. त्यांनी १९५१ मध्ये चलनक्षम (स्थानांतर करणाऱ्या) आनुवंशिक घटकांचा (जंपिंग जीन्सचा) शोध लावला. अशा तऱ्हेने सजीवातील आनुवंशिक (जननिक) लक्षणांमध्ये होणारे उत्परिवर्तन (एखाद्या लक्षणात होणारा आकस्मिक व वंशपरंपरा चालणारा फेरफार) स्पष्ट करणाऱ्या काही कोशिकीय यंत्रणा त्यांनी सर्वप्रथम विशद केल्या. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना १९८३ सालचे शरीरक्रियाविज्ञानाचे अथवा वैद्यकाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

माक्लिंटक यांचा जन्म हार्टफर्ड (कनेक्टिकट) येथे झाला. त्यांचे शिक्षण ब्रुकलिन, न्यूयॉर्क आणि कार्नेल विद्यापीठांत झाले. त्यांनी वनस्पतिविज्ञानामध्ये बी. एस्. (१९२३), एम्. ए. (१९२५) व पीएच्. डी. (१९२७) या पदव्या संपादन केल्या. पदवीधर साहाय्यक (१९२४–२७), अध्यापक (१९२७–३१) संशोधन साहाय्यक (१९३४–३६) व १९६५ पासून अँड्र्य‍ू डी. व्हाइट प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्नेल विद्यापीठात काम केले. त्या नॅशनल रिसर्च कौन्सिल (१९३१–३३) व गुगेनहाइम फाउंडेशन (१९३३–३४) येथे अधिछात्र आणि मिसुरी विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापिका (१९३६–४१) होत्या. १९४१ मध्ये त्या कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेतील जेनेटिक रिसर्च युनिटमध्ये दाखल झाल्या. तेव्हापासून त्या तेथेच असून १९६७ पासून त्या तेथे विशेष सेवा सदस्य म्हणून काम करीत आहेत. यांशिवाय त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॅसाडीना) मध्ये अभ्यागत प्राध्यापिका (१९५३–५४) आणि रॉकफेलर फाउंडेशनच्या शेतीविषयक कार्यक्रमाचे सल्लागार (१९६२–६९) म्हणूनही काम केले आहे.

गुणसूत्रावरील जीन (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांतील एकक) माळेतील मण्याप्रमाणे स्थिर असतात, असे मानले जाई. माक्लिंटक यांनी जीन गुणसूत्रावरील आपल्या जागा बदलतात, असे दाखवून दिले. याकरिता त्यांनी आयुष्यभर मक्याचा (झिया मेझ) अभ्यास केला. मक्याचे दाणे व मक्याची पाने यांच्यावरील रंगीत ठिपक्यांसारख्या बाहेरून सहजपणे दिसू शकणाऱ्या गुणधर्मांत होणाऱ्या बदलांचा त्यांनी अभ्यास केला व या बदलांचा कोशिकेच्या केंद्रकातील (कोशिकेतील कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर जटिल–गुंतागुंतीच्या–पुंजातील) आनुवंशिक घटकांशी संबंध असतो, हे त्यांनी दाखवून दिले. हे घटक सूक्ष्मदर्शकाने पाहता येऊ शकतील अशा पद्धतीही त्यांनी विकसित केल्या. त्यांनी हा शोध १९५१ मध्ये लावला मात्र तेव्हा त्याचे महत्त्व लक्षात आले नाही. जे. डी. वॉटसन व एफ्. एच्. सी. क्रीक यांचा डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल) या ⇨ न्यूक्लिइक अम्लाच्या द्विसर्पिल रचनेचा शोध व १९६० नंतर ⇨ रेणवीय जीवविज्ञानात झालेली प्रचंड प्रगती यांमुळे माक्लिंटक यांच्या निष्कर्षाची सत्यता व व्यापकता लक्षात आली. अशा तऱ्हेने या शोधांचा उपयोग इतर जीवांच्या बाबतीत करून घेणे शक्य झाले.

वनस्पतीच्या काय कोशिकांतील (जनन कोशिकांव्यतिरिक्त इतर कोशिकांतील) गुणसूत्रांच्या दहा जोड्यांची अथवा जनन कोशिकांतील (स्त्री–किंवा पुं–जनन कोशिकांतील) दहा अयुग्मित गुणसूत्रांची कल्पना येण्यासाठी व त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कोशिकाविज्ञानामध्ये नवीन पद्धती विकसित होणे आवश्यक होते. तशा पद्धती विकसित करून माक्लिंटक यांनी प्रत्यक्ष शेतात व प्रयोगशाळेत मक्यातील जननिक यंत्रणांचा अभ्यास केला. कोशिकेच्या अर्धसूत्री विभाजनामधील व्यत्यसनाच्या (केंद्रकाच्या ज्या विभाजनाने गुणसूत्रांची द्विगुणित संख्या कमी होऊन एकगुणित-सामान्यपणे निम्मी -होते त्या विभाजनाच्या वेळी युग्मित समजात गुणसूत्रांमध्ये जननिक द्रव्याची देवाणघेवाण होण्याच्या वेळच्या) टप्प्यात लक्षणाची निश्चिती करणारे जननिक वृत्त संक्रामित होते, हे त्यांनी दाखवून दिले. या प्रक्रियेत गुणसूत्रांतील (प्रत्येक जनकाचे एक गुणसूत्र) खंड एकत्रित येऊन गुंफले जातात व त्यांची देवाणघेवाण होते. या जोड्या अलग होताना दोन्ही जनक कोशिकांचे घटक असणारे प्रत्येक गुणसूत्र स्त्री- वा पुं-जनन कोशिकेचा (गंतुकाचा) एक घटक होते. अशा तऱ्हेने गुणसूत्रांतील आनुवंशिक घटकांच्या जागा यदृच्छया बदलतात, असे त्यांनी दाखवून दिले.

नंतर त्यांनी मक्याच्या रंगद्रव्यातील उत्परिवर्तनाच्या व्यवच्छेदक (वैशिष्ट्यदर्शक) प्रकारांचे निरीक्षण केले व जननिक विसंगती उघड केली. या विसंगतीचे स्पष्टीकरण देणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी सहा वर्षे उन्हाळ्यात संकरित मक्याची लागवड, हिवाळ्यात गुणसूत्रांचे विश्लेषण व पुढच्या हंगामातील प्रयोगांची आखणी असे वेळापत्रक आखून काम केले. याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पुढील गोष्ट स्पष्ट केली : पाने व दाणे यांच्यातील रंगद्रव्यात होणारे बदल गुणसूत्रातील अस्थिरतेमुळे होतात. गुणसूत्रातील दोन प्रकारच्या चलनक्षम आनुवंशिक घटकांमुळे हे बदल होतात, हे त्यांनी शोधून काढले.

यांपैकी एका घटकाला त्यांनी एसी (Ac–activation) आणि दुसऱ्याला डीएस (Ds–dissociation) अशी नावे दिली. डीएस घटक स्वतः गुणसूत्रावरील आपली जागा बदलू शकत नाही व एसी घटक नसताना तो स्थिर असतो. मक्यातील एसी घटक त्याच गुणसूत्रामध्ये उत्सफूर्तपणे (स्वतः)) स्थानांतरण करून इतरत्र गुंफून येऊ शकतो. या स्थानांतरणामुळे डीएस घटकाची गुणसूत्रांतील जागा परत निश्चित होणे (बदलली जाणे) शक्य असते. यामुळे जर डीएस घटक रंगद्रव्य निर्मिणाऱ्या जीनच्या शेजारी आला, तर त्या जीनचे कार्य रोखले जाते. मात्र एसी घटकाने डीएस घटकाची जागा परत बदलली गेली, तर रंगद्रव्यनिर्मिती पुन्हा सुरू होते. अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण ठिपके असलेले मक्याचे दाणे निर्माण होतात. या दोन घटकांच्या स्थानांतरणामुळे गुणसूत्रात खंड पडू शकतात व ते सूक्ष्मदर्शकाने शोधून काढता येतात.

डीएनएच्या भौतिक पुनर्मांडणीमुळे हे घटक वरील कार्ये करतात, असेही त्यांनी सुचविले आहे. व्यत्यसन होताना गुणसूत्रांमध्ये भौतिक द्रव्य व जननिक वृत्त यांची देवाणघेवाण होते, असा शोध त्यांनी व हॅरिएट क्रेटन यांनी मिळून लावला आहे.

वरील दोन आनुवंशिक घटकांचे जीववैज्ञानिक व वैद्यकीय महत्त्व १९७० नंतर लक्षात येऊ लागले. सूक्ष्मजंतूमध्ये प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थांना विरोध करण्याची क्षमता येण्यासाठी हे घटक उपयुक्त ठरतात आणि एका सूक्ष्मजंतूतून शेजारील सूक्ष्मजंतूत ही क्षमता संक्रामित करण्याचे कामही यांच्याद्वारे होत असावे. संसर्गजन्य रोगांवरील उपचारात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी यांची मदत होऊ शकते. आफ्रिकन निद्रारोगाला कारणीभूत असणाऱ्या जीवोपजीवीमधील या घटकांमध्ये जे बदल होतात, त्यांच्यामुळे तो मानवाच्या रोगप्रतिकारक्षमतेवर मात करू शकतो. कर्करोगाच्या संदर्भातही या घटकांचा अभ्यास करण्यात येत आहे.उदा., एका गुणसूत्रातून कर्क–जीन दुसऱ्यात गेल्याने कर्क कोशिका निर्माण होत असावी. यांशिवाय क्रमविकासातील (उत्क्रांतीमधील) विशिष्ट घटनांचा (उदा., जलदपणे विशेषीकरण होणे) उलगडा होण्याकरिताही या घटकांची मदत होऊ शकेल, असे माक्लिंटक यांना वाटते.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना पुढील सन्मानही मिळाले आहेतः जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिकाचे अध्यक्षपद (१९४५), बोटॅनिकल सोसायटी ऑफ अमेरिकाचे ॲ‌वॉर्ड ऑफ मेरिट (१९५७), नॅशनल ॲ‌कॅडेमी ऑफ सायन्सेसचे किंबर जेनेटिक्स ॲ‌वॉर्ड (१९६७), नॅशनल मेडल ऑफ सायन्स (१९७०) आणि १९८१ मध्ये टॉमस हंट मॉर्गन पदक, ॲ‌ल्बर्ट लास्कर मेडिकल रिसर्च ॲ‌वॉर्ड, इझ्राएलच्या वूल्फ फाउंडेशनचे पारितोषिक व मॅक्आर्थर फाउंडेशनची आजीव अधिछात्रवृत्ती तसेच नॅशनल ॲ‌कॅडेमी ऑफ सायन्सेस (अमेरिका), अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, अमेरिकन ॲ‌कॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस, अमेरिकन सोसायटी ऑफ नॅचरॅलिस्ट्स, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल सायन्स इ. संस्थांचे सदस्यत्व आणि रॉचेस्टर, मिसुरी इ. विद्यापीठे व वेस्टर्न कॉलेज फॉर वुइमेन्‌स, स्मिथ व विल्यम ही महाविद्यालये यांच्याकडून सन्माननीय डी. एस्. पदवी.

ए फिलिंग फॉर द ऑर्‌गॅनिझम : द लाइफ अण्ड वर्क ऑफ बार्बारा माक्लिंटक हे त्यांचे चरित्र एव्हेलीन फॉक्स केलर यांनी लिहिले आहे.

ठाकूर, अ. ना.