आय – आय : मॅलॅगॅसीमध्ये (मादागास्करमध्ये) आढळणारा हा सस्तन प्राणी लेमूरसारखा असतो [→ लेमूर]. प्राणिशास्त्रातले याचे नाव डॉबेंटोनिया मादागास्करिएन्सिस आहे. याच्या अंगावर मऊ फर (आखूड, रेशमासारखे मऊ, दाट केस) असून रंग काळा असतो. डोके वाटोळे व रुंद असते पुढचे दात कृंतकाच्या (भक्ष्य कुरतडणाऱ्या प्राण्याच्या) पुढच्या दातांसारखे पण मोठे व छिन्नीसारखे असतात डोळे व कान मोठे असतात हातांची बोटे लांब असून त्यांच्यावर अणकुचीदार नखर (नख्या) असतात मधले बोट तारेसारखे बारीक असते पायाचा अंगठा पायाच्या इतर बोटांसमोर आणता येतो त्यावर चपटे नख असून बाकीच्या बोटांवर नखर असतात. कवटी, पाय आणि आंतरेंद्रियांची रचना, लेमूरांशी असलेला यांचा संबंध दर्शवितात. शेपूट लांब व झुपकेदार असते.

हा वृक्षवासी प्राणी रात्रिंचर असून दाट जंगलात रहातो. यांची जोडपी असतात, पण एकेकटे प्राणीही भटकताना आढळतात. उसाचा रस, बांबूच्या आतला मगज, फळे, अंडी वगैरे यांचे भक्ष्य होय लाकूड पोखरणारे कीटक व सुरवंटदेखील तो खातो. हाताच्या बोटांनी लाकूड किंवा झाडाच्या फांद्या ठोकून त्या पोकळ आहेत असे वाटले, तर आपल्या छिन्नीसारख्या दातांनी तो वरचे लाकूड फोडून काढतो व आपले तारेसारखे मधले बोट पोकळीत फिरवून सुरवंट व किडे ओढून बाहेर काढतो. उसावरची सालदेखील तो अशीच दातांनी सोलून काढतो.

मॅलॅगॅसीमधील मूळ रहिवाशांना या प्राण्यांबद्दल फार पूज्यभाव व आदर वाटतो. आपले पूर्वज यांच्या शरीरात वास करतात अशी त्यांची समजूत आहे.

कर्वे, ज. नी.