प्राणिसृष्टीचेसंघववर्ग: प्राण्यांच्या अनेक जाती आहेत. त्या ओळखता याव्यात म्हणून त्यांची लक्षणे ध्यानात घेऊन त्यांना विशिष्ट नावे देण्याची पद्धत पडली आहे [⟶ प्राणिनामपद्धति] उदा., कुत्रा, गाय, मांजर इ. प्राण्यांच्या विशिष्ट लक्षणांवरून ते परस्परांहून वेगळे मानले गेले व त्यांना ठराविक नावे दिली गेली. प्राणिविज्ञानाच्या ज्या शाखेत अशा तऱ्हेचा अभ्यास केला गेला आहे, त्या शाखेला ⇨ वर्गीकरणविज्ञान असे म्हणतात. या शास्त्रानुसार विशिष्ट नियम व तत्त्वे यांच्या आधारे जगातील सर्व प्राण्यांचे निरनिराळे संघ (फायलम) आणि वर्ग (क्लास) पाडले गेले आहेत.

क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) सिद्धांतानुसार [⟶ क्रमविकास] सर्व प्राणी एकाच आद्य-जीवापासून उत्पन्न झालेले असल्यामुळे बहुतेक सर्व प्राण्यांत काही ना काही साम्य आढळते. यामुळे आपणास प्राण्यांचे वेगवेगळे गट पाडता येतात. काही साम्य लक्षणे ही प्राण्यांच्या परस्परांतील जातिवृत्तीय संबंधामुळे [⟶ जातिवृत्त] आढळून येतात. उदा., बेडकाचे पुढील पाय, पक्ष्याचे पंख आणि माणसाचे हात दिसायला जरी भिन्न असले, तरी त्यांतील हाडांची रचना, स्नायू, रक्तवाहिन्या यांची उत्पत्ती सारखीच असते. ज्या अवयवांची उत्पत्ती सारखी असली, तरी भिन्न उपयोगामुळे ते परस्परांपासून वेगळे दिसतात, अशा अवयवाना ‘समजातीय अवयव’ म्हणतात व ह्या गुणधर्माला ‘समजातता’ म्हणतात. काही साम्य लक्षणे विविध प्राण्यांच्या समान परिस्थितीतील जीवन पद्धतीमुळे उद्‌भवतात. उदा., कीटकांचे पंख, पक्ष्यांचे पंख, वटवाघळाचे पंख यांचा उपयोग उडण्यासाठी होत असला, तरी त्यांचा भ्रूणावस्थेतील विकास व रचना या दृष्टींनी हे तिन्ही अवयव परस्परांहून फार भिन्न आहेत. जे अवयव समान उपयोगामुळे सारखे वाटतात परंतु त्यांची उत्पत्ती भिन्न असते अशा अवयवांना ‘समधर्मी अवयव’ अथवा ‘कार्यसदृश अवयव’ म्हणतात आणि ह्या गुणधर्माला ‘सदृशता’ असे म्हणतात. सदृश लक्षणांपेक्षा समजातीय लक्षणांचा प्राण्यांच्या वर्गीकरण पद्धतीत उपयोग केल्यास प्राण्यांच्या परस्परांतील जातिवृत्तीय संबंधाची माहिती होऊ शकते. निरनिराळ्या प्राण्यांतील साम्य आणि भेद यांच्या अनुषंगाने प्राण्यांचे लहान गट पाडणे व त्यांच्या परस्परांतील रक्तसंबंधाची माहिती मिळविणे हे वर्गीकरणाचे [⟶ प्राण्यांचे वर्गीकरण] प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्राण्यांची शरीररचना, शरीरक्रियाविज्ञान, भ्रूणविज्ञान, प्राणिभूगोल इ. प्राणिविज्ञानाच्या शाखांत उपलब्ध असणाऱ्या माहितीचाही उपयोग करतात.

नैसर्गिक वर्गीकरण पद्धती : ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४-३२२) या ग्रीक शास्त्रज्ञांनी प्रथमतः प्राण्यांच्या साम्य-भेद लक्षणांवरून प्राण्यांचे वर्गीकरण केले. ⇨ जॉनरे(१६२७-१७०५) या ब्रिटिश जीवशास्त्रज्ञांनी आधुनिक वर्गीकरण पद्धती सुचविली. ⇨ कार्ललिनीअस (१७०७-७८) या स्विडीश शास्त्रज्ञांनी प्राण्यांची द्विपद नामपद्धती आणि वर्गीकरण पद्धती प्रथम प्रचारात आणली. १७३५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लिनीअस यांच्या Systema Naturae या ग्रंथात दिलेली वर्गीकरण पद्धती सध्या प्रचलित असलेल्या वर्गीकरण पद्धतीचा मूळ आधार समजली जाते. या पद्धतीत प्राण्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात व्यक्तिगत प्राण्यापासून होते. आपण नेहमी असे पाहतो की, कोणतेही दोन प्राणी अगदी एकसारखे नसले, तरी त्यांच्यापैकी अनेकांत काही समान लक्षणे आढळतात. या समान लक्षणांमुळे या प्राण्यांचा गट पाडता येतो. या गटाला जाती म्हणतात. दोन किंवा अधिक जातींचा काही विशिष्ट लक्षणांमुळे एका मोठ्या गटात समावेश करतात. या गटाला वंश असे म्हणतात. दोन किंवा अधिक वंशांतील समान लक्षणांमुळे होणाऱ्या वंशांच्या समुच्चयाला कुल असे म्हणतात. विशिष्ट समान लक्षणे असलेल्या दोन किंवा अधिक कुलांच्या गटाला गण म्हणतात. दोन किंवा अधिक समानधर्मी गणांच्या समुच्चयाला वर्ग म्हणतात. तसेच दोन किंवा अधिक समानधर्मी वर्गांच्या गटाला उपसंघ म्हणतात. शेवटी दोन किंवा अधिक समानधर्मी उपसंघांच्या गटाला संघ असे संबोधतात.

प्रचलित वर्गीकरणाच्या पद्धतीत प्राणिसृष्टीचे दोन प्रमुख मोठे विभाग पाडलेले आहेत : (१) अपृष्ठवंशी (नॉन-कॉर्डेट्स) आणि (२) कॉर्डेटा. यांपैकी अपृष्ठवंशी विभागात अनेक संघांचा समावेश केलेला असून कॉर्डेटा हा स्वतंत्र संघच मानण्यात येतो [⟶ अपृष्ठवंशी कॉर्डेटा]. अपृष्ठवंशी व कॉर्डेट प्राणी यांची महत्त्वाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

अपृष्ठवंशी प्राणी

कॉर्डेट प्राणी

१) या प्राण्यांना पृष्ठरज्जू (शरीराला आधार देणारी मुख्य अक्षीय दोरासारखी संरचना) नसतो.

१) या प्राण्यांना पृष्ठरज्जू असतो.

२) यांचे केंद्रीय तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) अधर (खालच्या) बाजूस असून पोकळ नळीच्या स्वरूपाचे नसते.

२) यांचे केंद्रीय तंत्रिका तंत्र पृष्ठीन (वरच्या) बाजूस असून ते पोकळ नळीच्या स्वरुपाचे असते.

३) हृदय असले, तर अन्न नलिकेच्या पृष्ठीन बाजूस असते.

३) हृदय अधर बाजूस परिहृद्‌गुहेत असते.

४) रक्ताभिसरण तंत्र उघडे अथवा संवृत (बंद) स्वरूपाचे असते.

४) रक्ताभिसरण तंत्र नेहमी संवृत स्वरूपाचे असते.

५) हीमोग्लोबिन रक्तद्रवात (रक्ताच्या द्रवरूप भागात) विरघळलेले असते.

५) हीमोग्लोबिन रक्तातील तांबड्या कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) असते

अपृष्ठवंशीप्राणी : साम्य-भेद लक्षणांनुसार सर्व अपृष्ठवंशी प्राण्यांची १० संघांमध्ये विभागणी केली आहे. हे संघ खालीलप्रमाणे :

 

(१) प्रोटोझोआ (आदिजीव संघ), (२) पोरिफेरा (छिद्री संघ), (३) सीलेंटेरेटा (आंतरगुही संघ) (४) प्लॅटिहेल्मिंथिस (पृथुकृमी संघ), (५) नेमॅटोडा (सूत्रकृमी संघ), (६) ॲनेलिडा (वलयी संघ), (७) आर्थ्रोपोडा (संधिपाद संघ), (८) मॉलस्का (मृदुकाय संघ). (९) एकायनोडर्माटा (कंटकचर्मी संघ), (१०) हेमिकॉर्डेटा (अर्धमेरुक किंवा सामि-रज्जुमान).

 

 अपृष्ठवंशी प्राण्यांच्या वेगवेगळ्या संघांची विशेष महत्त्वाची लक्षणे खाली दिली आहेत.

 


 प्रोटोझोआ : या संघातील प्राण्यांचे शरीर फक्त एकाच कोशिकेचे बनलेले असते. हे प्राणी सूक्ष्म असून त्यांची रचना साधी असते. ते दमट जागी, गोड्या व खाऱ्या पाण्यात आढळतात. काही प्राण्यांच्या कोशिकेभोवती असंख्य ⇨ पक्ष्माभिका असतात तर काहींना फक्त एक ⇨ कशाभिका असते. पक्ष्माभिका व कशाभिका यांचा चलनासाठी उपयोग होतो, तर अमीबासारखे काही प्राणी ⇨ पादाभांच्या साहाय्याने चलनवलन करतात. प्लाझ्मोडियमासारखे स्पोरोझोआ वर्गातील प्राणी परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजिविका करणारे) आहेत. त्यांचे जीवनचक्र ॲनॉफेलीस डास व मनुष्य यांच्या शरीरात पूर्ण होते. या प्राण्यामुळे मलेरिया (हिवताप) हा रोग होतो. आदिजीव संघातील प्राण्यांचे प्रजनन द्विभाजन (शरीराचे दोन भाग होऊन) किंवा लैंगिक पद्धतीने होते. [⟶ प्रोटोझोआ].

 

पोरिफेरा : या संघात सर्व स्पंजांचा समावेश होतो. हे प्राणी निम्न (खालच्या) थरातील असून ते बहुकोशिक असतात. ते एका जागी स्थिर राहून वनस्पतीसारखे जीवन जगतात. बहुतेक सर्व स्पंज खाऱ्या पाण्यात राहतात. फक्त स्पंजिला कुलातील जाती गोड्या पाण्यात आढळतात. स्पंजांचे प्रजोत्पादन लैंगिक पद्धतीने, मुकुलनाने (शरीरावर अंकुरासारखे बारीक उंचवटे येऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होण्याच्या क्रियेने) अगर कुड्‌मिकांच्या साहाय्याने (प्रतिकूल परिस्थितीत भ्रूण कोशिकांच्या समूहांभोवती तयार होणाऱ्या कवचांच्या साहाय्याने अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांपासून प्राण्यांची नवीन वसाहत तयार होते) होते [⟶ प्रजोत्पादन]. स्पंजाचा मानवाला अनेक कामांसाठी उपयोग होतो. [⟶ पोरिफेरा].

 

सीलेंटेरेटा : हे प्राणी बहुकोशिक असून त्यांची दोन रूपे आढळतात : एक पॉलिप (प्राणिवसाहतीतील व्यक्तिगत प्राणी) व दुसरे मेड्युसा (मुक्तपणे पोहू शकणारा व लैंगिक लक्षणयुक्त व्यक्तिगत प्राणी छत्रिक). ह्या संघातील बहुतेक सर्व प्राणी खाऱ्या पाण्यात आढळतात. फार थोड्या जाती गोड्या पाण्यात राहतात. हे प्राणी सर्वसाधारणपणे दंडगोलाकृती (नळकांड्यासारखे) असून त्यांची देहभित्ती द्विस्तरीय (कोशिकाच्या दोन थरांची बनलेली) असते. बाह्यस्तरामध्ये ⇨ दंशकोशिका असतात. ह्या प्राण्यांचे प्रजोत्पादन मुकुलन पद्धतीने अगर लैगिंक पद्धतीने होते. गोड्या पाण्यात लहान आकारमानाचे हायड्रे (वासुकी) राहतात. तर खाऱ्या पाण्यात मोठ्या आकारमानाचे समुद्रपुष्प (सी ॲनिमोन) इ. प्राणी राहतात.

 

मेड्युसा एखाद्या पालथ्या खोलगट बशीसारखा असतो. वरचा भाग बहिर्वक्र व आतला भाग अंतर्वक्र असतो. खालच्या भागावर मधोमध मुख असते. मेड्युसा वेगवेगळ्या रंगांचे असतात. जेलीफिशसारख्या मेड्युसाच्या शरीरामध्ये जेलीसारखा पदार्थ असल्याने त्यांना पाण्यात तरंगणे सोपे जाते. प्रवाळ जातीचे प्राणी याच संघात मोडतात. या प्राण्यांच्या शरीराभोवती कठीण कंकाल (कठीण कवचासारखा सांगाडा) असून हे प्राणी समुदायाने राहात असल्याने प्रवाळाचे मोठेमोठे खडक समुद्रात आढळतात. [⟶ सीलेंटेरेटा].

 

प्लॅटिहेल्मिंथिस : या प्राण्यांचे शरीर बाह्य, मध्य आणि अंत:स्तर अशा तीन स्तरांचे बनलेले असते. पर्णचिपिट, यकृत पर्णकृमी आणि पट्टकृमी (फीतकृमी) या वेगवेगळ्या वर्गांतील प्राण्यांचा प्लॅटिहेल्मिंथिस संघात समावेश होतो. पर्णचिपिट ओलसर मातीत अगर पाण्यात राहतात. यकृत पर्णकृमी मेंढीच्या यकृतात आढळतो, तर पट्टकृमी अनेक प्राण्यांच्या अन्ननलिकेत आढळतात. पट्टकृमीचे शरीर अनेक प्रजोत्पादक खंडांचे (प्रोग्लॉटिडांचे) बनलेले असून त्यांची एकूण लांबी १० मी. इतकीही असू शकते. हे प्राणी उभयलिंगी (एकाच प्राण्यात स्त्री-व पुं-जननेंद्रिये असलेले) आहेत. [⟶ प्लॅटिहेल्मिंथिस].

 

नेमॅटोडा : या संघातील प्राण्यांना सूत्रकृमी किंवा जंत म्हणतात. ते दोऱ्यासारखे किंवा लांबट नळीच्या आकाराचे असून त्यांच्या शरीरावर चिवट आवरण असते. काही सूत्रकृमी स्वतंत्रपणे जीवन जगतात. ते पाण्यात अगर मातीत राहतात, तर काही परजीवी असून वनस्पती व प्राणी यांच्या शरीरात राहून अनेक रोग उत्पन्न करतात. नारू, अंकुशकृमी, ॲस्कॅरिस इ. सूत्रकृमी मानवी शरीरात सापडतात. सूत्रकृमींमुळे हत्तीरोग, नारू, जंतविकार इ. रोग होतात.[⟶ नेमॅटोडा].

 

ॲनेलिडा : ज्या प्राण्यांचे शरीर अनेक खंडांनी बनलेले असते अशा गांडुळासारख्या प्राण्यांचा या संघात समावेश होतो. हे प्राणी त्रिस्तरी असून त्यांची देहभित्ती आणि अन्ननलिका यांमध्ये एक प्रशस्त पोकळी असते, तिला देहगुहा म्हणतात. गांडुळे जमिनीत बिळे करून राहतात आणि मातीत असणारे सेंद्रिय पदार्थ खातात. त्यांच्या विष्ठेमुळे जमीन सुपीक बनते. जळू ही बाह्यपरजीवी असून ती पाण्यात आढळते. नीरीज हे प्राणी समुद्रात राहतात. [⟶ ॲनेलिडा].

 

आर्थ्रोपोडा : प्राणिसृष्टीतील हा सर्वांत मोठा संघ आहे. या संघात खेकडे, शेवंडे, सहस्त्रपाद, गोम, विंचू, कोळी, कीटक इत्यादींचा समावेश होतो. यांचे शरीर खंडयुक्त असून शरीरावर कायटिन या कठीण द्रव्याचे जाड आवरण असते. याला बाह्यकंकाल ( बाह्य सांगाडा ) असे म्हणतात. त्याने शरीराचे संरक्षण होते व ठराविक काळाने गळून पडून त्या जागी नवीन कंकाल उत्पन्न होतो. या क्रियेला निर्मोचन किंवा कात टाकणे असे म्हणतात. या प्राण्यांना पायांच्या अनेक जोड्या असून प्रत्येक पाय अनेक सांध्यांनी युक्त असतो. त्यांच्या शरीरातील देहगुहा फार लहान असून त्यात रक्त भरलेले असते म्हणून तिला रुधिरगुहा म्हणतात. हृदय अन्ननलिकेच्या वरच्या बाजूला असते. या प्राण्यांच्या जीवनचक्रात रूपांतरण (प्रौढ अवस्था तयार होत असताना रूप व संरचना यांत होणारे बदल) आढळते. आर्थ्रोपोडा संघात अनेक वर्गांचा समावेश होतो : (१) क्रस्टेशिया (कवचधर वर्ग) : यात खेकडे, शेवंडे, झिंगे वगैरे समुद्रात व गोड्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो. (२) मीरिॲपोडा (अयुतपाद वर्ग) यात सहस्त्रपाद व गोम यांचा समावेश होतो. या प्राण्यांचे शरीर अनेक खंडांनी बनलेले असून प्रत्येक खंडावर उपांगांची (अवयवांची) किमान एक जोडी असते. (३) इन्सेक्टा (कीटक वर्ग) : हा एक मोठा वर्ग असून या प्राण्यांचे शरीर डोके, वक्ष आणि उदर अशा तीन भागांचे असते. वक्षावर पायांच्या तीन व पंखांच्या सामान्यतः दोन जोड्या असतात. कीटक सर्वत्र आढळतात. (४) ॲरॅक्निडा (अष्टपाद वर्ग): यांच्या शरीराचे शिरोवक्ष (डोके + वक्ष ) व उदर असे दोन भाग असून पायांच्या चार जोड्या असतात. विंचू, कोळी, गोचिडी व माइट यांचा या वर्गात समावेश होतो.

वरील चार वर्गांशिवाय आर्थ्रोपोडा संघात ट्रायलोबाइट या वर्गाचाही समावेश होतो. सध्या हे प्राणी अस्तित्वात नसून या वर्गात अंतर्भाव केलेले सर्व प्राणी जीवाश्मरूपाने (गतकालीन जीवांच्या अश्मीभूत अवशेषांच्या रूपाने) आढळतात. [⟶ आर्थ्रोपोडा].

 

मॉलस्का : हा प्राणिसृष्टीतील एक मोठा संघ आहे. यात समाविष्ट केलेल्या प्राण्यांत खूपच वैशिष्ट्य आढळते. यांचे शरीर मऊ असून ते कठीण शंखांमध्ये राहतात. गोगलगायींना एक शंख असतो, तर कालवांच्या शंखाचे दोन भाग (द्विपुटी) असतात. या प्राण्यांचे शरीर खंडरहित असून त्यांना सांधे असणारी उपांगे नसतात. त्यांच्या शरीराच्या खालच्या बाजूला चलनवलनाकरिता एक स्नायुयुक्त पाद (पाय) असतो. हे प्राणी त्रिस्तरी देहगुहायुक्त असतात. मृदुकाय प्राणी गोड्या आणि खाऱ्या पाण्यात तसेच जमिनीवर आढळतात. [⟶ मॉलस्का].

 


 

एकायनोडर्माटा : या संघातील प्राणी फक्त समुद्रातच राहतात. ते त्रिस्तरी व देहगुहायुक्त आहेत. त्यांच्या शरीरावरील आवरण कॅल्शियमी तकटे व कंटिका (लहान काटे) यांनी बनलेले असते. चलनवलनाकरिता त्यांच्या शरीराच्या खालच्या बाजूस नालपाद असतात. त्यांच्या शरीरात अभिसरणाकरिता एक विशेष प्रकारचे जलवाहिका तंत्र असते. तारामीन, भंगुरतारा, समुद्री आर्चिन, सागरी काकडी इ. प्राण्यांचा या संघात समावेश होतो. हे प्राणी वेगवेगळ्या वर्गांत समाविष्ट केलेले आहेत. [⟶ एकायनोडर्माटा].

 

हेमिकॉर्डेटा : पूर्वी या संघाचा कॉर्डेटा संघातील एक उपसंघ म्हणून उल्लेख करण्यात येत असे परंतु या प्राण्यांना पृष्ठरज्जू नसल्याने आधुनिक वर्गीकरण पद्धतीनुसार या उपसंघाचा समावेश प्राणिसृष्टीच्या अपृष्ठवंशी विभागात करण्यात आला आहे. या संघातील प्राणी समुद्रतळातील वाळू, गाळ अगर चिखल यांत एकएकटे अगर समूहाने राहतात, उदा., बॅलॅनोग्लॉसस. हे प्राणी कृमीसारखे लांबट आकाराचे असतात. त्यांची लांबी १·८ सेंमी. ते २·५ मी. पर्यंत असू शकते. शरीर सोंड, गळपट्टी व धड या तीन भागांचे बनलेले असते. हे प्राणी एकलिंगी असून त्यांच्या भ्रूणाच्या विकासातील डिंभावस्थेस (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील असलेल्या पूर्व अवस्थेस) टॉर्नारिया असे म्हणतात. ह्या प्राण्यात पुनर्जननाची (तुटलेल्या शरीर भागाच्या जागी नवा शरीर भाग निर्माण करण्याची) शक्ती असते. वाळूमध्ये U अशा आकाराचे बीळ करुन त्यात हे प्राणी राहतात. [⟶ हेमिकॉर्डेटा].

 

कॉर्डेटा : (रज्जुमान संघ). आधुनिक वर्गीकरणानुसार कॉर्डेटा संघाचे दोन प्रमुख विभाग पडलेले आहेत : (१) कर्परहीन (कवटी नसलेले) आणि (२) कर्परयुक्त.

 

कर्परहीनविभाग : या विभागातील प्राण्यांना मेंदू, कवटी, जबडे, पृष्ठवंश (पाठीचा कणा) आणि उपांगांच्या जोड्या नसतात. या प्राण्यांचे दोन उपसंघ पाडले आहेत : (१) ट्यूनिकेटा वा यूरोकॉर्डेटा आणि (२) सेफॅलोकॉर्डेटा.

 

(१) ट्यूनिकेटा उपसंघ : हे प्राणी एकटे अगर समुदायाने स्थिर जीवन कंठणारे उभयलिंगी प्राणी आहेत. फक्त डिंभावस्थेत या प्राण्यांना पृष्ठरज्जू व पृष्ठनलिकामय तंत्रिका तंत्र असते. त्यांच्या शरीरावर जाड आवरण असते. या उपसंघातील प्राणी खालील तीन वर्गांत समाविष्ट केले गेले आहेत.

 

(अ) लार्व्हासिया वर्ग : हे प्राणी समुद्रात सतत पोहत असतात. त्यांच्या शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो. ह्यांचे प्रजोत्पादन मुकुलनाने होते.

 

(आ) ॲसिडियासिया वर्ग : हे स्थानबद्ध प्राणी बहुधा तळाच्या खडकांना चिकटून राहतात. ते उभयलिंगी असून डिंभावस्था आढळते.

 

(इ) थॅलिॲसिया वर्ग : हे प्राणी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तंरगत राहतात. त्यांचे शरीरावरण पारदर्शक असते. या आवरणात स्नायूंचे पूर्ण किंवा अपूर्ण वर्तुळाकार पट्टे असतात. त्यांच्या जीवनक्रमात पिढ्यांचे एकांतरण [→ एकांतरण, पिढ्यांचे] आणि ⇨ बहुरूपता आढळते. [⟶ ट्यूनिकेटा].

 

(२) सेफॅलोकॉर्डेटा उपसंघ : हे प्राणी लहान माशासारखे असून समुद्रात राहतात. ह्यांच्या शरीरात पृष्ठरज्जू शरीराच्या पुढील टोकापासून मागील टोकापर्यंत पसरलेला असतो. या उपसंघात फक्त लेप्टोकार्डिआय या एका वर्गाचा समावेश होतो. अँफिऑक्सस (ब्रँकिओस्टेमालॅन्सिओलेटम) हा प्राणी सेफॅलोकॉर्डेटा उपसंघात मोडतो. [⟶ सेफॅलोकॉर्डेटा].

 

कर्परयुक्तविभाग : ज्या प्राण्यांच्या शरीरात मेंदू, कवटी, पृष्ठवंश अंतःकंकाल (शरीरातील सांगाडा) व उपांगांच्या जोड्या असतात, अशा सर्व प्राण्यांचा ह्या विभागात समावेश होतो. या प्राण्यांची दोन अधिवर्गांत विभागणी केली आहे : (१) जंभहीन (जबडा नसलेले, ॲग्नाथा) आणि (२) जंभयुक्त (ग्नॅथोस्टोमॅटा).

 

जंभहीन : या प्राण्यांना जबडे व उपांगांच्या जोड्या नसतात. एक मध्य नाकपुडी, उपास्थींचा (कूर्चेचा) सांगाडा व पृष्ठरज्जू असतो. या उपसंघात दोन वर्गांचा समावेश होतो : (१) ऑस्ट्रॅकोडर्मी वर्ग : या वर्गातील सर्व प्राणी लुप्त (निर्वंश) झालेले आहेत.

 

(२) सायक्लोस्टोमॅटा वर्ग : ह्या वर्गातील प्राण्यांचे शरीर लांब असून शेपटीचा भाग पार्श्व बाजूने दबलेला असतो. शरीरावर वरील बाजूस एक मध्य पर (चलनवलनाकरिता वा तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुयुक्त घडी) असून त्वचा गुळगुळीत श्लेष्मल ग्रंथियुक्त (बुळबुळीत स्राव स्रवणाऱ्या ग्रंथीनी युक्त) व खवलेरहित असते. अन्ननलिका पूर्ण असते. क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) ५ त १६ जोड्या असतात. हे प्राणी समुद्रात किंवा गोड्या पाण्यात राहतात. हे प्राणी परभक्षी आहेत उदा., लँप्री.

 

जंभयुक्त : या प्राण्यांच्या मुखात जबडे असून शरीरावर उपांगांच्या जोड्या असतात. त्यांच्या भ्रूणावस्थेतील पृष्ठरज्जूचे आंशिक अथवा पूर्ण परिवर्तन होऊन उपास्थींचा किंवा अस्थींचा पृष्ठवंश तयार होतो. या अधिवर्गाचे दोन मुख्य भाग केले आहेत : (१) मत्स्य, (२) टेट्रापोडा (चतुष्पाद प्राणी).

 

(१) मत्स्यवर्ग : समुद्रातील व गोड्या पाण्यातील माशांचा यात समावेश होतो. माशांना पाण्यात पोहण्यासाठी परांच्या जोड्या व श्वसनासाठी कल्ल्यांच्या जोड्या असतात. त्याची शरीराची कातडी खवल्यांनी झाकलेली असते. हृदयात एक अलिंद (अशुद्ध रक्ताचा कप्पा) आणि एक निलय (शुद्ध रक्ताचा कप्पा) असते. या वर्गाचे (अ) उपास्थिमीन व (आ) अस्थिमीन असे दोन उपवर्ग पाडले आहेत. उपास्थिमीन या उपवर्गातील माशांचा अंतःकंकाल उपास्थींचा बनलेला असतो. अस्थिमीन या उपवर्गातील माशांचा अंतःकंकाल अस्थींचा बनलेला असतो. [⟶ मत्स्यवर्ग].

 

(२) टेट्रापोडा : (चतुष्पादी). ज्या कॉर्डेट प्राण्यांच्या शरीरात अवयवांच्या दोन जोड्या व श्वसनाकरिता फुप्फुसे असून अंतःकंकाल अस्थींचा असतो, अशा सर्व प्राण्यांचा यात समावेश होतो. त्याचे (अ) उभयचर वर्ग, (आ) सरीसृप वर्ग, (इ) पक्षी वर्ग, (ई) स्तनी वर्ग असे चार वर्ग पाडण्यात आले आहेत.

 

(अ) उभयचर वर्ग : अंशतः पाण्यात आणि अंशतः जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या सर्व चतुष्पाद प्राण्यांना ‘उभयचर प्राणी’ असे म्हणतात. या वर्गातील प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

 


 

यांच्या शरीरावरील त्वचा ओलसर, बुळबुळीत असून तीत अनेक श्लेष्मल ग्रंथी असतात. त्वचेवर खवले अगर केस नसतात. मान नसते, तर काहींना शेपटी नसते. हे त्वचेच्या साहाय्याने अगर फुप्फुसाच्या साहाय्याने श्वसन करतात. या प्राण्यांच्या हृदयात दोन अलिंदे व एक निलय असते. हे अनियततापी (ज्यांचा शरीराचे तापमान भोवतालच्या परिस्थितीनुसार कमीजास्त होते असे), भिन्नलिंगी असून आपली अंडी पाण्यात घालतात. डिंभावस्था पाण्यात पुरी होते. रूपांतरण होऊन पूर्ण वाढ झालेला प्राणी जमिनीवर व पाण्यात राहतो. बेडूक, भेक, प्रोटियस, सायरन, न्यूट, सॅलॅमँडर इ. प्राण्यांचा उभयचर वर्गात समावेश होतो. [⟶ उभयचर वर्ग].

 

(आ) सरीसृप वर्ग : या वर्गात सर्व सरपटणाऱ्या चतुष्पादांचा समावेश होतो. हे अनियततापी प्राणी असून त्यांची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

 

यांच्या शरीराचे डोके, मान, धड, आणि शेपटी असे चार भाग पडतात. शरीरावरील कातडी टणक व कोरडी असून खवल्यांनी किंवा अस्थिपट्टिकांनी झाकलेली असते. महानीला एकत्र येऊन होणारे एक कोटर, दोन अलिंदे आणि पडद्याने अपुरे विभागलेले एक निलय असे हृदयाचे भाग असतात. अंतःकंकाल अस्थींचा बनलेला असतो. श्वसन फुप्फुसांनी होते. हे प्राणी एकलिंगी असून ते अंडज (अंडी घालणारे) आहेत. प्रजोत्पादन लैंगिक प्रकारचे असून मैथुनाने अंतःनिषेचन होते (शरीरात अंड्याचे फलन होते). अंड्यांमधून पिले बाहेर पडतात व कालांतराने ती मोठी होतात. सरडे, मगर, साप इ. प्राणी सरीसृप वर्गात मोडतात. [⟶ सरीसृप वर्ग].

 

(इ) पक्षी वर्ग : हे हवेमध्ये उडू शकणारे प्राणी आहेत. यांच्या शरीरात हवेत तरंगत राहण्यासाठी खूप बदल घडून आलेले आहेत. या प्राण्यांची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

 

पक्ष्यांचे शरीर पिसांनी झाकलेले असते. शरीरावर अवयवांच्या दोन जोड्यांपैकी पुढील जोडीचे पंखांत रूपांतर झालेले असते. पाठीमागची जोडी पायांचे कार्य करते. झाडाच्या फांदीला धरणे, चालणे अगर पोहणे यांसाठी या जोडीचा उपयोग होतो. तोंडाचे दात नसलेल्या कठीण चोचीमध्ये रूपांतर झालेले असते. भक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचीचा आकार बदललेला असतो. शरीरातील हाडे हलकी व पोकळ असतात. अंगात वायुकोश (हवेच्या पिशव्या) असतात. उडण्यासाठी स्नायू चांगले विकसित झालेले असतात. श्वासनलिकेच्या टोकावर कूजित्र अगर स्वरिका असते. ह्याच्या साहाय्याने पक्षी मधुर कूजन करीत असतात. हृदयात दोन अलिंदे व दोन निलये असतात. अन्ननलिकेत अन्नपुट (अन्न साठविण्यासाठी झालेला अन्ननलिकेचा पिशवीसारखा विस्तार) व पेषणी (ज्यात अन्न चूर्णरूप केले जाते असा अन्नमार्गाचा स्नायुमय भाग) असते. हे अंडज असून अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या पिलाचे मादी संगोपन करते. हे प्राणी नियततापी (परिसराच्या तापमानात बदल होत असला, तरी ज्यांच्या शरीराचे तापमान एका ठराविक पातळीवर स्थिर असते असे) आहेत. पक्ष्यांचे रॅटिटी (धावणारे) व कॅरिनॅटी (उडणारे) असे दोन विभाग असून प्रत्येकात अनेक कुले आहेत. कावळा, चिमणी, घार, शहामृग ही पक्ष्यांची सामान्य उदाहरणे होत. [⟶ पक्षि वर्ग].

 

(ई) स्तनी वर्ग : ज्या चतुष्पाद प्राण्यांच्या शरीरावर केसांचे आवरण असते व ज्यांना स्तन ग्रंथी असून मादी आपल्या पिलांना स्वतःच्या अंगावरचे दूध पाजून वाढविते, अशा सगळ्या प्राण्यांचा या वर्गात समावेश होतो. ह्या प्राण्यांना सस्तन प्राणी म्हणतात. त्यांची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

 

हे प्राणी नियततापी असून त्यांना चार पाय असतात परंतु देवमासा, मॅनॅटी, शिंशुक (पॉरपॉइज) व डॉल्फिन या प्राण्यांत मागचे पाय (अवयव) नाहीसे झालेले असतात व पुढील अवयवांचे परांमध्ये रूपांतर झालेले असते. सस्तन प्राण्यांच्या शरीराचे डोके, मान, धड व शेपटी असे चार भाग पडलेले असतात. अंतःकंकाल अस्थींचा बनलेला असतो. ह्या प्राण्यांचे दात विविध प्रकारचे असून अन्नप्रकाराप्रमाणे त्यांच्यात फेरबदल झालेले असतात. मुखात सहज हलणारी जीभ असते. मेंदूच्या प्रमस्तिष्क भागाची (मोठ्या मेंदूची) पुष्कळ वाढ झालेली असते. त्यांचे गुदद्वार व मूत्रोत्सर्जक छिद्र भिन्न असते. हृदयात दोन अलिंदे व दोन निलये असतात.

 

एकदोन अपवाद सोडले, तर सर्व स्तनी जरायुज (जिवंत पिलांना जन्म देणारे) असतात. स्तनी वर्ग प्राणिसृष्टीतील सर्वांत प्रगत आहे. हे प्राणी जमिनीवर, वृक्षावर अगर पाण्यात राहतात. काही हवेत उडू शकतात (उदा., उडणाऱ्या खारी). सर्व जनावरे, श्वापदे व मानव यांचा या वर्गात समावेश होतो. [⟶ स्तनी वर्ग].

 

पहा : प्राण्यांचे वर्गीकरण.

 

संदर्भ : 1 Blackwelder, R. E. Classification of Animal Kingdom. Carbondale 1963.

            2. Parker T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology , London 1967.

 

रानडे, द. र.