स्युजृ-मो : (? १८९६—१९ नोव्हेंबर १९३१). चिनी कवी. ‘ नान हू ’ आणि ‘ शिह ची ’ ही त्याने लेखनार्थ धारण केलेली टोपणनावे. चीनच्या जजिआंग प्रांतातील शी-शीह येथे त्याचा जन्म झाला. बीजिंग विद्यापीठातून अभिजात चिनी शिक्षण घेतल्यानंतर १९१८ मध्ये तो अमेरिकेस गेला. तेथे त्याने अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास केला पण तिथले वातावरण न मानवल्यामुळे तो इंग्लंडला आला (१९२०). तेथे केंब्रिज विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला. तेथे असताना स्वच्छंदतावादी इंग्रजी कवितेचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला आणि त्याने स्वतःला काव्यलेखनाला वाहून घेतले. १९२२ मध्ये चीनला परतल्यावर त्याने चिनी भाषेत कविता आणि निबंध लिहिण्यास आरंभ केला. विख्यात भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर हे चीनच्या दौर्यावर असताना त्यांचा दुभाषा म्हणून तो त्यांच्या सोबत वावरला आणि रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचाही त्याच्यावर परिणाम झाला. परदेशांत राहून आल्यामुळे आणि तेथे झालेल्या संस्कारांमुळे आपल्या कवितेला आकार देण्याची एक नवी दृष्टी त्याला लाभली तसेच आधुनिक चिनी कवितेच्या चळवळीचे नेतृत्वही त्याच्याकडे आले. ‘ मॉर्निंग पोस्ट ’ ( इं. शी. ) या नियतकालिकाच्या वाङ्मयीन पुरवणीचे संपादनही त्याने केले. अनेक विद्यापीठांतून त्याने व्याख्याने दिली. ‘ क्रेसेंट मून बुक कंपनी ’ ( इं. शी. ) ही संघटना उभारण्यात त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. ह्या संघटनेतर्फे एक वाङ्मयीन जर्नल प्रसिद्ध करण्यात येई आणि त्यात पश्चिमी साहित्य प्रसिद्ध होत असे. त्याचे एकूण चार कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले असून विविध भाषांतील साहित्याचे त्याने केलेले चिनी अनुवादही अनेक खंडांत प्रसिद्ध झालेले आहेत.
शँटुंग प्रांतातील जोनान येथे एका विमान अपघातात त्याचे निधन झाले.
कुलकर्णी, अ. र.
“