त्रिंकोमाली : श्रीलंकेच्या ईशान्य किनाऱ्यावरील एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर व शहर. लोकसंख्या ४१,७८४ (१९७१). हे अनुराधपुरच्या पूर्वेस सु.१०९ किमी. कोड्डियार उपसागरावर वसले आहे. येथे पूर्वी कँडियन राजांची सत्ता होती परंतु सोळा ते सतराव्या शतकांत येथे अनुक्रमे पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश ह्यांनी स्वामित्व गाजविले. १७९५ नंतर ब्रिटिशांनी ते घेतले आणि श्रीलंका स्वतंत्र होईपर्यंत ते त्यांच्याकडेच होते. नंतर ते १९५७ साली श्रीलंकेच्या ताब्यात आले. येथे शेती व मासेमारी हे मुख्य उद्योग असून बहुसंख्य लोक तमिळ आहेत. शहराच्या पूर्वेस फ्रेडरिक किल्ला असून तो पोर्तुगीजांनी उद्‌ध्वस्त केलेल्या सहस्रस्तंभी शिवमंदिराच्या जागेवर १६७६ साली डचांनी बांधला. टँबलगॅन सरोवर व पाणलावा पक्षी ही येथील वैशिष्ट्ये असून ती अनुक्रमे मोत्यांचे शिंपले व शिकार ह्यांकरिता प्रसिद्ध आहेत. त्रिंकोमाली लोहमार्ग, हवाईमार्ग व मोटारमार्ग ह्यांनी देशातील प्रमुख शहरांशी जोडले आहे. येथे एक वेधशाळाही आहे. नाविक तळ म्हणून ब्रिटिशांनी त्याचा दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्ध उपयोग केला. त्यावेळी जपानने त्यावर हवाई हल्ला केला होता.

देशपांडे, सु. र.