अबुल-कासीम: (सु. ९३६-सु. १०१३). यांचे पूर्ण नाव अबू-अल् कासीम खलीफ इब्‍न-आबास-अल्-झरावी असे आहे. लॅटिन भाषेत त्यांना अबुल-कासीम म्हणत. कॉर्डोव्हाजवळील अल्-झहरा येथे स्पॅनिश घराण्यात त्यांचा जन्म झाला. कॉर्डोव्हा येथे वैद्यकीय व्यवसाय करीत असताना त्यांची कीर्ती खलीफ अब्द-अल्-रहमान (तिसरा) यांच्या कानी जाऊन त्यांनी त्यांना दरबारी वैद्य म्हणून नेमले. अल्-तश्रीफ  म्हणजे संग्रह या नावाच ३० भागांचा वैद्यक-ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाचे तीन विभाग असून त्यात (१) अग्निकर्म, (२) शल्यकर्म, (३) अस्थिभंग व स्थानभ्रंश (सांधा निखळणे) यांचे वर्णन आहे. तत्कालीन शस्त्रवैद्यकाची त्यात माहिती दिलेली असून त्या वेळी वापरात असलेल्या उपकरणांची चित्रेही दिलेली आहेत. पूर्वीच्या पॉल व रेझिस यांच्या ग्रंथांवरूनच अबुल-कासीम यांनी आपला ग्रंथ लिहिलेला असला, तरी त्या दोन्ही लेखकांच्या ग्रंथांपेक्षा त्यांचा ग्रंथ अधिक सुलभ व विवेचक असल्यामुळे तो फार लोकप्रिय झाला. या ग्रंथाचे लॅटिनमधील भाषांतर जवळजवळ ५०० वर्षांपर्यंत पाठ्यपुस्तक म्हणून यूरोपात प्रचारात होते. त्यामानाने खुद्द अरब देशांत त्या ग्रंथाचा प्रसार कमी होता. 

पहा : युनानी वैद्यक.

गर्दे, र. कृ.