लसीका कणार्बुदी वंक्षण रोग : क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटिस या जातीच्या सूक्ष्मजीवाच्या बायोव्हार लिंफोग्रॅन्यूलोमा व्हेनेरियम या प्रकारच्या वाणांमुळे होणारा एक ⇨गुप्तरोग. लसीका वाहिन्या व लसीका ग्रंथी [⟶ लसीका तंत्र] यांना होणाऱ्या या संभोगजन्य सांसर्गिक रोगास कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या गटाला बेडसोनिया (सॅम्युएल बेडसन या इंग्रज सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांच्या नावावरून) असेही नाव देण्यात आलेले होते. सूक्ष्मजंतू व व्हायरस वा दोन्हींचे काही गुणधर्म धारण करणाऱ्या या गटास आता क्लॅमिडीया या प्रजातीचे स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. या प्रजातीत ⇨ शुकरोग, खुपरी, नवजात अर्भकांतील व प्रौढांतील नेत्रश्लेष्मशोथ (डोळे येणे) या रोगांना कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांचाही समावेश होतो.

या रोगाचे वर्णन प्रथम १९१३ मध्ये करण्यात आले. १९२२ मध्ये झोझेफ निकॉला व मॉरिस फाव्ह्‌र वा फ्रेंच वैद्यांनी या रोगाचा सखोल अभ्यास केला व त्यामुळे त्याला ‘निकॉला-फाव्ह्‌र रोग’ असेही म्हणतात. जगाच्या सर्व भागांत आढळणारा हा रोग प्रामुख्याने जरी उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील असला, तरी आधुनिक प्रतिजननिर्धारणामुळे [⟶ प्रतिजन] आता समशीतोष्ण प्रदेशातही त्याचे रुग्ण आढळून येत आहेत. लैंगिक क्रियाशीलता ज्या वयात अधिक असते, त्या वयातील स्त्री-पुरुषांत जास्त प्रमाणात आढळणारा हा रोग सर्व वंशांच्या लोकांत दिसून येतो. स्त्री व पुरुष यांमध्ये या रोगाचे प्रमाण जवळजवळ सारखेच आढळते.

लक्षणे : परिपाक काल (रोगकारकाच्या संसर्गानंतर लक्षणे दिसू लागेपर्यंतचा काल) अनिश्चित स्वरूपाचा असून सर्वसाधारणपणे ५ ते २१ दिवसांचा असावा.

सुरुवातीचे लक्षण बाह्य जननेंद्रियावर पुरळ येणे हे असून स्त्रियांमध्ये ते आढळतही नाही. पुरुषामध्ये ते एवढे सौम्य असते आणि अल्पकाळ टिकते की, रोग झाल्याचे लक्षातही येत नाही. जांघेतील (वंक्षण भागातील) लसीका ग्रंथी सुजल्याने उष्ण, वेदनाकारक गाठ आल्यानंतर रोग झाल्याचे समजते. स्त्रियांमध्ये अनेक वेळा अशी गाठ न येता गुदांत्रासंबंधीची (मोठ्या आतड्याच्या शेवटून दुसऱ्या भागासंबंधीची) लक्षणे उद्भवतात. डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे, सांधेदुखी व वजन कमी होणे ही लक्षणे दिसतात.

वरील प्राथमिक लक्षणांनंतर काही कालावधीने जांघेतील लसीका ग्रंथींच्या शोथामुळे (दाहयुक्त सुजेमुळे) आलेल्या गाठी एकमेकींत मिसळून गळू तयार होते. हे गळू अनेक भोके पडून फुटते व त्यातून दुधाळ पू वाहू लागतो. लसीका वाहिन्यांत अडथळा उत्पन्न होऊन हत्तीरोगात येते तशी बाह्य जननेंद्रियांना मोठी सूज येते. गुदद्वाराभोवती ऊतकाची (पेशीसमूहाची) वाढ होऊन मोड तयार होतात. गुदांत्रात शोथ होऊन आतील बाजूवर व्रण तयार होतात व ते बरे होताना आकुंचनामुळे गुदांत्र पोकळीचे संकीर्णन होते. कधीकधी संधिशोथ, नेत्रश्लेष्मशोथ व तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) विकृती उद्‌भवतात. कर्करोगात रूपांतर झाल्याचेही आढळून आले आहे.

रोगनिदान : रोगकारक सूक्ष्मजीव सूक्ष्मदर्शकीय परीक्षेत किंवा अंड्यातील भ्रूणावर केलेल्या संवर्धनामध्ये दाखविणे शक्य असले, तरी समाधानकारक नसते. कधी कधी ⇨जीवोतक परीक्षा उपयुक्त ठरते. रोगलक्षणांवरून काढलेला निष्कर्ष निदानासाठी व उपचार सुरूकरण्यासाठी पुरेसा असतो. जास्त चिकित्सक निदानासाठी बेडसोनिया प्रतिजनास प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेले ⇨प्रतिपिंड उपयोगी ठरतात. त्यांच्या उपस्थितीवर आधारित असलेली व डब्ल्यू. एम्. फ्राय या जर्मन त्वचारोगतज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारी फ्राय अंतस्त्वचा परीक्षा, पूरक बंधी गुणधर्मावर आधारलेली परिमाणात्मक परीक्षा व सर्वांत संवेदनाक्षम अशी सूक्ष्म-प्रतिरक्षा-अनुस्फुरण परीक्षा [⟶ विकृतिविज्ञान, उपरुग्ण] या आता चांगल्या विकसित झालेल्या परीक्षा निदानास उपयुक्त आहेत. बेडसोनिया गटातील इतर सूक्ष्मजीवांपासून व्यवच्छेदक (वेगळेपणा दर्शविणारे) असे रोगकारकतेचे निदान करू शकतात. इतर संभोगजन्य रोगांचे विशेषतः ⇨उपदंशाचे निदान योग्य त्या परीक्षांनी करणे हितावह असते.

उपचार : सल्फा औषधांपैकी सल्फाडायाझीन किंव तत्सम द्रव्ये ७ ते १० दिवस दिल्यास रोगनियंत्रण होऊ शकते. ती उपयोगी न पडल्यास किंवा रोगाच्या प्रगत अवस्थेत विस्तृत परिणामी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ वापरतात. यांतील टेट्रासायक्लीन, मिनोसायक्लीन किंवा डॉक्सिसायक्लीन हे सु. दहा दिवस वापरून रोगनिर्मूलन होऊ शकते. गुदांत्राचे संकीर्णन टाळण्यासाठी कॉर्टिसोनासारखी अधिवृक्क-बाह्यक हॉर्मोने [⟶ अधिवृक्क ग्रंथि] वापरतात. क्वचित प्रसंगी यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. वंक्षणातील गळवाचे छेदन टाळून ते केवळ चूषणानेच रिकामे करावे म्हणजे रोगलक्षणे कमी होतात.

संदर्भ : 1. Duguid, J. P. and others, Muckie and McCartney’s Medical Microbiology, Vol. I,

                Edinburgh, 1978.

           2. King, A. and others, Venereal Diseases, London, 1980.

 

सलगर, द. चि. भालेराव, य. त्र्यं. श्रोत्री, दि. शं.