रे, जॉन: (२७ नोव्हेंबर १६२७–१७ जानेवारी १७०५). वनस्पतींचे व प्राण्यांचे नैसर्गिक वर्गीकरण करण्याबद्दल प्रसिध्दी पावलेले वैज्ञानिक. त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण एसेक्स परगण्यातील ब्लॅक नोटली येथे झाले. केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमधून १६४७ साली ते बी.ए. झाले व तेथील फेलोशिप मिळवून १६५५ साली त्यांनी एम्.ए. ही पदवी संपादन केली. पुढे विद्यापीठाची फेलोशिप सोडून त्यांनी स्वतंत्रपणे विज्ञानाचा अभ्यास सुरू केला. त्यांना फ्रान्सिस विलबी यांच्याकडून अर्थसहाय्य मिळाले व याच्या बदल्यात वनस्पती व प्राणी यांचे वर्गीकरण करण्याच्या प्रकल्पात त्यांनी विलबी यांना सहकार्य दिले. यासंबंधी सर्वेक्षण करण्याकरिता दोघांनी मिळून ब्रिटन व यूरोपचा पुष्कळ प्रवास केला. विलबी यांचे १६७२ साली निधन झाले पण त्यांनी स्वतःच्या संपत्तीमधून रे यांच्याकरिता तहह्यात एक वर्षासन दिले.

केंब्रिजमध्ये असताना रे यांनी वनस्पतींचा अभ्यास चालू ठेवला व वनस्पतींच्या वर्गीकरणावर १६६० मध्ये फ्लोरा ऑफ केंब्रिंज हा ग्रंथ प्रसिद्ध केला. केंब्रिज विद्यापीठात असताना रे यांनी इंग्लड व यूरोपातील वनस्पती व प्राणी यांचे नमुने गोळा केले. या संग्रहावर काम करीत असताना १६६८ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीच्या फेलोपदी निवड झाली. त्यांचा वनस्पती वर्गीकरणावरील महत्वाचा ग्रंथ Methodus Plantarum nova हा १६८२ साली तर त्याची सुधारित आवृत्ती Methods Plantarum Emendata १७०३ साली प्रसिद्ध झाली. वनस्पतींचे एकदलिकित व द्विदलिकित असे वर्गीकरण प्रथम रे यांनी केले. ब्रिटनमधील केंब्रिजशर येथील वनस्पतींवर पहिला ग्रंथ रे यांनी १६६० साली लिहिला. यानंतर Catalogus Plantarum Angliae (१६७०) हा वर्णमाला (अकारचिन्हे) पद्धतीवर आधारित आणि Synopsis Methodica stirpium Britannicarum (१६९०) हा वर्गीकरण पद्धतीवर आधारित असे दोन ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांच्या Historia Plantarum (१६८६–१७०४) या ग्रंथात सर्व वनस्पतींची मांडणी त्यांच्या स्वतःच्या पद्धतीप्रमाणे केली आहे. यासाठी १८,६०० वनस्पतींचा अभ्यास केला आहे. प्राणी किंवा वनस्पतींच्या ‘जाती’ या शब्दाची व्याख्या प्रथम रे यांनी केली.

बिलबी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पक्षी वर्ग, मत्स्य वर्ग व सरीसृप (सरपटणारे) प्राणी यांवर केलेले अर्धवट काम रे यांनी पूर्ण केले. त्यांच्या वर्गीकरणास त्यांनी तुलनात्मक शारीराचे निकष लावले व नवीन पद्धती स्वीकारली. हे काम तीन खंडांत विलबी यांच्या नावाने प्रसिद्ध झाले. पहिला खंड पक्षी वर्गाचा १६७६ साली, दुसरा मत्स्य वर्गाचा १६८६ साली व तिसरा सरीसृप प्राण्यांवरचा १६९४ साली पूर्ण झाला. शेवटचा खंड रे यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. प्राण्यांच्या शरीररचनेवर आधारित वर्गीकरण केलेला त्यांचा Synopsis Methodica animalium हा ग्रंथ १६९३ साली प्रसिद्ध झाला. १६९० साली त्यांनी कीटकांवर संशोधन करण्यास सुरूवात केली. कीटकांच्या वर्गिकरणास त्यांनी त्यांच्या रूपांतरणाच्या आधार घेतला. हे संशोधन शेवटपर्यंत चालू होते. वनस्पती व प्राणी वर्गीकरणावरील रे यांचे सर्व ग्रंथ पुढे चाळीस वर्षांनी लिनीअस यांच्या वर्गीकरण पद्धतीला आधारभूत ठरले आहेत.

रे यांनी शास्त्रीय विषयांवरच पुस्तके लिहिली असे नाही, तर त्यांनी इतरही लेखन केले. त्यांची कलेक्शन ऑफ इंग्लिश प्रॉव्हर्ब्(१६७०) व कलेक्शन ऑफ इंग्लिश वर्डस (१६७४) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

रे यांचा मृत्यू ब्लॅक नोटली या गावी झाला. १८४४ साली निसर्गविज्ञानावरचे लेख प्रसिद्ध करण्याकरिता त्यांच्या स्मरणार्थ ‘रे सोसायटी’ ची स्थापना करण्यात आली.

जमदाडे, ज. वि.