रने द शातोब्रीआंशातोब्रीआं. फ्रांस्वा रने द : ( ४ सप्टेंबर १७६८ – ४ जुलै १८४८). फ्रेंच कादंबरीकार व स्वच्छंदतावादाचा एक प्रणेता. ब्रिटनीमधील सां मालो येथे एका उमराव कुटुंबात जन्म. त्याचे बालपण बरेच एकांतवासात गेले . ल्यूसील ह्या त्याच्या बहिणीने शातोब्रीआंला कविता करण्यास उत्तेजन दिले. शिक्षणानंतर त्याने फ्रेंच सैन्यात नोकरी स्वीकारली. पुढे ही नोकरी सोडून तो पॅरिसला आला. तेथेच त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला (१७८९). फ्रेंच राज्यक्रांतीत झालेला भीषण हिंसाचार पाहून आरंभी त्या राज्यक्रांतीच्या उद्दिष्टांविषयी सहानुभूती असलेल्या शातोब्रीआंचे मन विटले आणि तो अमेरिकेस गेला. तेथे असताना अमेरिकन-इंडियनांच्या सहवासात तो आला. १७९२ च्या जानेवारीत तो फ्रान्सला परतला व राजनिष्ठांच्या सैन्यात दाखल झाला तथापि १७९३ मध्ये एका वेढ्याच्या प्रसंगी जखमी झाल्यानंतर त्याला इंग्लंडमध्ये आश्रय घ्यावा लागला. तेथील वास्तव्यात (१७९३–१८००) नात्शेज (प्रकाशन १८२६) ही कादंबरी त्याने लिहिली. त्याचप्रमाणे एसे स्युर ले रेव्होल्युस्याँ (१७९७, इं. शी. एसे ऑन द रेव्हलूशन) हा ग्रंथही लिहिला. त्यात इतिहासकालीन वेगवेगळ्या क्रांत्यांची चिकित्सा असून, फ्रेंच क्रांतीच्या संदर्भात त्यांची तौलनिक मीमांसाही केलेली आहे. नात्शेज  ह्या कादंबरीचे बारा खंड आहेत. नात्शे (नॅचीज) ही एक अमेरिकन-इंडियन जमात आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी ही जमात जवळपास नामशेष केली. शातोब्रीआंच्या नात्शेज, आताला (१८०१) आणि रने (१८०२) ह्या तीन कथात्म साहित्यकृतींचे एकमेकींशी काही नाते आहे. आताला ह्या कथेत काक्‌तास हा वयोवृद्ध अमेरिकन-इंडियन त्याची जीवनकहाणी रने ह्या फ्रेंच तरुणाला सांगतो. ही कहाणी काक्‌तास आणि आताला ह्या प्रेमी युगुलाची आहे. रने ह्या कादंबरीत रनेची कहाणी आहे. रने स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचा आहे. आमेली ह्या त्याच्या बहिणीवर त्याचा अशिय जीव आहे पण तिला रनेबद्दल वाटणारे प्रेम बहिणीचे नसते. ही जाणीव तिला झाल्यानंतर ती संन्यासिनी होण्याचा निर्णय घेते. ज्या दिवशी ती संन्यासिनीची दीक्षा घेते, त्याच दिवशी हे सर्व रनेला कळते. दु:खाने रानोमाळ भटकणाऱ्या रनेला ह्या भ्रमंतीतच काक्‌तास भेटतो. रनेच्या ह्या कथेचाच पुढला भाग नात्शेजमध्ये येतो. अमेरिकेतील निसर्गदृश्यांची सुंदर वर्णने ह्या कादंबऱ्यांत आहेत. रने ह्या कादंबरीचा अस्वस्थ, निराश नायक हा फ्रेंच साहित्यातील पुढील सर्व स्वच्छंदतावादी नायकांचा पूर्वसूरी आहे, असे म्हणता येईल. ल जनी द्यू क्रिस्तिआनिस्म (१८०२, इं. शी. द जीनिअस ऑफ क्रिश्चॅनिटी) हा शातोब्रीआंचा आणखी एक उल्लेखनीय ग्रंथ. फ्रान्समध्ये रोमन कॅथलिक धर्माचे पुनरुत्थान होत असताना ख्रिस्ती धर्म हा सर्वांत काव्यात्म असून स्वातंत्र्य, कला व साहित्य ह्यांना तो पूरक आहे, असे आग्रहाने प्रतिपादणारा हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यामुळे शातोब्रीआंला अमाप कीर्ती आणि मान्यता प्राप्त झाली. ह्या ग्रंथामुळे त्याला नेपोलियनचा अनुग्रह प्राप्त झाला आणि रोममधील राजदूताचा सचिव म्हणून त्याची नेमणूकही झाली परंतु पुढे नेपोलियनशी त्याचे जमले नाही आणि त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. द बोनापार्त ए दे बुर्‌बाँ (१८१४) ह्या छोट्या पुस्तिकेत नेपोलियनच्या राजकीय धोरणावर त्याने जहाल टीका केली आहे.

नेपोलियनाच्या कारकिर्दीचा अंत झाल्यानंतर अठराव्या लुईच्या कारकिर्दीत शातोब्रीआंने घेंट येथे मंत्री म्हणून काम केले. पुढे फ्रान्सचा राजदूत म्हणून तो लंडनला गेला. नंतर लूई फिलिपच्या राजवटीत तो निवृत्त झाला. त्याने उर्वरित काळ ले मेम्वार दुत्रतॉंब हे आत्मचरित्र लिहिण्यात घालविला.

फ्रेंच साहित्यातील स्वच्छंदतावादाचा तो एक आद्य प्रणेता मानला जातो. १८११ साली फ्रेंच अकादमीचा सदस्य होण्याचा मान त्याला मिळाला. पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Evans, Joan, Chateaubriand, London, 1939.  

             2. Maurois, Andre, Chateaubriand, Paris, 1938.  

            3. Sieburg, Friedrich, Trans. MacDonald, V. M. Chateaubriand, New York, 1962.

कुलकर्णी, अ. र. टोणगावकर, विजया